पुस्तक परिचय ओरिजिन


पुस्तक – ओरिजिन

लेखक – डॅन ब्राऊन

अनुवाद – मोहन गोखले

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठसंख्या –  ६०२ 

किंमत – ७२० रु. 


पुस्तक परिचयाच्या माझ्या याआधीच्या सत्रात मी डॅन ब्राऊनच्याच एंजल्स अँड डेमन्स या पुस्तकाचा परिचय दिला होता. त्यांनी लिहिलेली पुस्तकं खूप आवडतात मला. म्हणून या सत्रातही त्यांचंच ओरिजिन नावाचं पुस्तक घ्यावं वाटलं. ही पुस्तकं वाचत वाचत जेव्हा पानं पलटली जातात तेव्हा पुस्तकातली गोष्ट खरी वाटायला लागते. पात्र जिवंत होतात आणि आपल्या आसपास संवाद सुरु आहेत असं वाटायला लागतं. आपण इतके त्या गोष्टीत गुंगले जातो. अशा गोष्टी वाचायला कोणाला आवडणार नाहीत? आणि विषय तर इतके भन्नाट, कल्पनाही करु शकणार नाही असे असतात. त्या कादंबरीतून खूप माहितीही मिळते म्हणजे इतिहासाबद्दल असेल किंवा टेक्नॉलॉजीबद्दल असेल, सायन्सबद्दल असेल… ती सगळी माहिती, गोष्टीतील इतर उल्लेख जसे की, ठिकाणं, धार्मिक संस्था, कला, स्थापत्य या गोष्टी खऱ्या असतात. त्यांच्या आधारे एक काल्पनिक गोष्ट लिहिण्यात डॅन ब्राऊन यांचा हातखंडा आहे. त्यांची पुस्तकं चित्तथरारक असतात, पुढं काय होईल याची उत्कंठा वाढवणारी असतात बरोबरीने बौद्धिक आव्हानं ही त्यात असतात. 

ओरिजिन ची गोष्टही अशीच गुंतागुंतीची आणि उत्कंठावर्धक. माणसाची उत्क्रांती आणि माणसाचे भविष्य यासंबंधी एडमंड कर्षने काही शोध लावलेला असतो. अतिशय गुप्ततेने केलेलं काम आता सर्वांपुढे आणायची वेळ झालेली असते म्हणून त्याचं प्रात्यक्षिक कर्ष गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात दाखवणार असतो. पण कार्यक्रमापूर्वी थोडा वेळ आधीच कार्यक्रमाच्या ठिकाणीच त्याची हत्या होते. हत्या करुन हल्लेखोर अर्थातच पळून जातो. मग कर्ष चं हे काम जगापुढे आणण्यासाठी प्रोफेसर रॉबर्ट लँग्डन आणि त्या वस्तू संग्रहालयाची मुख्य अँब्रा व्हिडाल कामाला लागतात. ही अँब्रा स्पेनच्या भावी राजाची होणारी वधू असते. पण त्यासाठी त्यांना कर्षचा महासंगणक, त्याचा पासवर्ड आणि मुख्य म्हणजे त्या महासंगणकाची जागा शोधण्यापासून सुरुवात करायची असते. याच्याबरोबरीने घडणाऱ्या घटना यात एकामागोमाग एक, जलद गतीने समोर येत राहतात. कमी वेळात बरंच काही घडणारी गोष्ट असं म्हणता येईल. गोष्टीची सुरुवात होते ती कर्ष आणि स्पेनमधील बडं प्रस्थ..कॅटालोनिया इथल्या अति प्राचीन मॉनेस्ट्रीमधील बिशप अँटोनियो वाल्डेस्पिनो यांच्या भेटीने. कर्ष हा गेम थिअरी आणि कम्प्युटर मॉडेलिंगमधला तज्ञ. सनातन कॅथॉलिक मूल्य जपणारा एकजण, त्याचे दोन साथीदार आणि एक निरीश्वरवादी कर्ष...सगळ्यात आधी त्या तिघांना आपण लावलेला शोध सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी कर्ष त्यांना भेटतो. आपला शोध ऐकून ही मंडळी आणि नंतर जगही हादरेल ही खात्री त्याला असते. एक महिन्याने या शोधाचे प्रात्यक्षिक जगापुढे सादर करणार असं तो त्यांना सांगतो, पण प्रत्यक्षात या भेटीनंतर तीनच दिवसात तो ते जगासमोर मांडणार असतो. गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयात हे प्रात्यक्षिक होणार असते आणि त्यासाठी जगभरातून काही निवडक लोकांना आमंत्रण दिलेले असते, ज्यात त्याचे पूर्वीचे गुरु रॉबर्ट लँग्डनलाही आमंत्रण असते. आमंत्रण निवडक लोकांना असले तरी परिषदेचे थेट प्रक्षेपण टीव्ही आणि इंटरनेटवर होणार असते. त्यामुळं सगळं जग त्यावर डोळे लावून बसलेलं असतं. पण प्रात्यक्षिक सादर करण्यापूर्वीच तिथेच कर्ष ची हत्या होते, ज्यामुळे लँग्डन आणि अँब्रा यांना धक्का बसतो. इथूनच दोघांची शोधमोहीम सुरु होते आणि त्यांना कर्षने बनवलेला विन्स्टन नावाचा महासंगणक मदत करतो. रॉबर्ट तो शोध जाहीर करण्याचे प्रयत्न करतोय कळल्यावर कर्षच्या हल्लेखोराला रॉबर्टचीही हत्या करण्याची सूचना दिली जाते. मुळात विन्स्टन आहे आणि तो कुठे आहे हेच माहीत नसतं. त्यामुळं शहरातल्या वेगवेगळ्या ऐतिहासिक इमारतींमधून घेत चाललेला विन्स्टनचा शोध, मग त्याचा ४२ आकडी पासवर्डचा शोध असे टप्पे पार पाडत ते त्यांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतात. या दोन टोकांमधल्या सगळ्या थरारक, उत्कंठावर्धक घटना ओरिजिन या कादंबरीत वाचायला मिळतात. कर्षची हत्या कोण आणि कशी करतो, विन्स्टनची बुद्धिमत्ता, राजपुत्राची भावी वधू म्हणून अँब्राची परिस्थिती, त्यांच्यातील समज-गैरसमज आणि कर्षचा शोध याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पुस्तक वाचायला हवं. 

डॅन ब्राऊन त्यांच्या कथेत येणारी ठिकाणं, वेगवेगळ्या इमारती, इतर गोष्टी यांचं अगदी बारकाईने आणि सविस्तर वर्णन करतात. त्यांच्याबरोबर आपण त्या त्या ठिकाणी भेट देत आहोत असेच वाटून जाते. ओरिजिनची कथा बार्सिलोना आणि आसपास घडतेय. गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील कलाकृतींचं खूप छान वर्णन यात आलं आहे. इतर ठिकाणांची माहिती, वर्णन असं येतं की गोष्ट खरी घडतेय वाटायला त्यामुळं मदत होते. त्यामुळेच डॅन ब्राऊन यांची पुस्तकं वाचून संपली तरी मनात रुंजी घालत राहतात. 

जस्मिन जोगळेकर







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक