पुस्तक परिचय अवनत होई माथा


पुस्तक – अवनत होई माथा

लेखक – डॉ. संजय ओक 

प्रकाशन – श्रीविद्या प्रकाशन, पुणे

पृष्ठसंख्या – १८९

किंमत – २५० रु.


गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळात कोविडमुळे डॉ, औषधं, वेगवेगळ्या तपासण्या यांच्याशी आपला जास्त संपर्क आला. सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड, एक्सरे असे शब्द आणि त्याचा वापर वगैरे गोष्टी टीव्ही मालिका, पिक्चरमधून बघून किंवा अनुभवातून जाऊन तर सगळ्यांच्या अगदी परिचयाचे झाले आहेत. अगदी खेड्यातला एखादा अडाणी पेशंटसुद्धा डॉक्टरकडे गेल्यावर 'फोटू काढाया लागलं का?' असं सहज विचारतो. हॉस्पिटलमधली बरीचशी आयुधं आपल्याला माहीत असतात, त्यांचे उपयोग माहीत असतात. पण हे सगळं बनवण्याचं आणि त्याचा असा उपयोग करण्याचं पहिल्यांदा कोणाला आणि कसं सुचलं? हे आपल्याला माहीत नसतं. अवनत होई माथा या पुस्तकातून हीच सगळी माहिती डॉ. संजय ओक यांनी सांगितली आहे. 2004 साली लोकसत्ता पेपरच्या लोकरंग पुरवणीत त्यांनी या लेखांची मालिका लिहिली होती. त्याचेच संकलन म्हणजे हे पुस्तक. वैद्यक शास्त्राचा त्यांना उलगडलेला हा इतिहास आहे. लोकरंगमध्ये लिहिताना प्रत्येक लेखाला जी शीर्षके त्यांनी दिली होती, ती पुस्तकातही तशीच ठेवली आहेत. त्यातली काही शीर्षक वाचून लेखाचा विषय कळत नाही, म्हणून पुस्तकात परिशिष्ट जोडले आहे. 

आता बघा...चष्मा ही वस्तू आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे! चष्मा डोळ्यावर नसता तर मी हे लिहू शकले नसते. चष्म्याचा शोध कोणीतरी लावला म्हणून ही दिव्यदृष्टी मिळाली. पण त्याचा शोध लागण्यापूर्वी डोळ्यांनी नीट दिसत नसेल तर लोक काय करायचे? तेव्हाच्या एक रोमन नेत्याच्या पत्रावरुन कळते की, त्यांना गुलामांवर अवलंबून रहावे लागायचे. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातला सेनेका पाण्याने भरलेला काचेचा गोलक अक्षरं मोठी करण्यासाठी वापरायचा. मग हळूहळू भिंगाचा शोध लागला. चष्मा तयार करण्याचे श्रेय साधारण 2000 वर्षांपूर्वीच्या चिनी वंशांच्या लोकांकडे जाते. भुतांपासून रक्षण करण्यासाठी ती लोकं चष्मा वापरायची. नंतर दृष्टी अधू झालेली म्हातारी लोकं याचा वापर करु लागले. पण याचा शोध नेमका कोणी लावला याची माहिती कुठे उपलब्ध नाही. 1280 च्या दरम्यान पहिल्यांदा फ्लोरेन्स मध्ये चष्मे वापरले जाऊ लागले आणि मग त्याचा प्रसार सगळीकडे होऊ लागला. चष्मा बनवणारी पहिली कंपनी 1629 मध्ये इंग्लंडमध्ये सुरु झाली. तेव्हाचे त्याचे रुप आणि तेव्हापासून सुधारणा होत होत चष्म्याने आता जे आधुनिक रुप घेतले आहे तो प्रवास 'दृष्टीचे वरदान' या लेखात वाचायला मिळतो.

आता माधुरी दीक्षितला पाहून तरुणांचं (की सगळ्यांचं?) दिल जोरात धकधक करतं माहितेय आपल्याला आणि त्यासाठी कोणत्या डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते. पण रुग्णाच्या हृदयाची धडधड तपासणं मात्र गरजेचं असतं. स्टेथोस्कोप आणि डॉक्टर यांचं नातं अतूट असतं. जेव्हा स्टेथोस्कोपचा जन्म झाला नव्हता तेव्हा डॉक्टर काय करायचे? तर डायरेक्ट रुग्णाच्या छातीला आपला कान लावायचे. ही पद्धत जरा विचित्रच म्हणावी लागेल. अर्थात तेव्हा काही दुसरा पर्यायही नव्हता. मग स्टेथोस्कोपचा शोध कसा लागला. तर त्याचा जन्मदाता रीने थिऑफिस हायसिंथ लीनॅकला रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांचा खेळ आठवला. एका लांब सळीच्या एका टोकाला एक मुलगा कान लावायचा आणि तेव्हा दुसऱ्या टोकाकडून दुसरा मुलगा काही बोलायचा. झालं...याचाच वापर लीनॅकने स्टेथोस्कोप बनविण्यासाठी केला. आहे न गंमत! तेव्हाचा स्टेथोस्कोप वेगळा होता, त्यात हळूहळू सुधारणा होत सध्याच्या रुपात तो दिसतोय. 'स्टेथोस्कोप' चा मूळ ग्रीक भाषेतला अर्थ आहे, 'मी छातीच्या पोकळीत बघतो आहे.' 

अशा कितीतरी जन्मकथा या पुस्तकात वाचायला मिळतात.  डायपर, व्हीलचेअर, मायक्रोस्कोप, अँब्युलन्स, थर्मामीटर आणि अशा बऱ्याच गोष्टींचा प्रवास या पुस्तकातील वेगवेगळ्या लेखातून मांडला आहे. आपल्या आयुष्याला वरदान ठरलेल्या वैद्यक शास्त्रातील हे शोध आणि त्यांचे जनक यांचे स्मरण करणे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे नै का… स्मरण करताना आपला माथा अवनत होणार हे नक्की. 

जस्मिन जोगळेकर 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक