पुस्तक परिचय ध्यान विज्ञान
पुस्तक – ध्यान-विज्ञान
लेखक – डॉ.यश वेलणकर
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन
पृष्ठसंख्या – १७८
किंमत – १८० रु.
सध्याच्या या धावपळीच्या युगात माणसाला क्षणाचाही उसंत नाहीये. सतत काम, काम आणि काम. वर्कोहोलिक असणे, पैसा कमावणे वगैरे सगळं ठीक आहे पण किती ते… सगळ्या गोष्टींना काही मर्यादा तर हव्या ना. मग सततच्या धावपळीमुळे आरोग्य साथ देत नाही आणि मग एका मागोमाग एक तक्रारी सुरु होतात. अधूनमधून शरीराला आणि अर्थातच मेंदूला, मनालाही विश्रांती हवीच की. शरीराला विश्रांती देऊ तेव्हा मनाला आणि मेंदूलाही आराम मिळतो असं तर बिलकुल नाही. आपण काम करत नसलो तरी मेंदूत अखंड काही ना काही विचारचक्र तर चालू असतातच की. त्रासदायक विचार असले तर त्याचा परिणाम शरीरावर होतोच, जरी शरीर विश्रांतीच्या मोडवर असले तरी. मग या मेंदूला शांत, मोकळं ठेवण्यासाठी काय उपाय? तर ध्यान…
ध्यान म्हटलं की आपल्या मेंदूत पटकन विचार येतो की हे म्हणजे अध्यात्म, उपासना असलं काही झालं. ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग झाला. साधना करायला आम्ही काय म्हातारे झालो की काय वगैरे वगैरे. पण ध्यानधारणा काही फक्त या गोष्टीशी संबंधित असते असं नक्कीच नाही. डॉ. यश वेलणकर यांनी त्यांच्या ध्यान-धारणा पुस्तकातून नेमकं हेच सांगितलं आहे. ध्यान शब्द उच्चारल्यावर ध्यानाचा जो अर्थ मनात येतो, तो इथं त्यांना गृहीत नाही. या पुस्तकात त्याचा ऐहिक अंगाने विचार केला आहे. ध्यानाचे महत्त्व आता जगात सगळ्यांना पटू लागले आहे, ध्यानाचा शरीरावर, मनावर काय परिणाम होतो त्याचा ठिकठिकाणी अभ्यासही होत आहे. हाच अभ्यास, त्यावर होणारे संशोधन साध्या सोप्या शब्दात या पुस्तकातून मांडले आहे. आपल्याला माहीत आहे की ध्यान केल्याने मेंदूवर चांगले परिणाम होतात. पण फक्त मेंदूच नव्हे तर माणसाच्या पेशींवरदेखील ध्यानाचा परिणाम होत असतो. शरीर म्हातारं होण्याचा वेग त्यामुळं कमी होऊ शकतो. ध्यानाचे खूप सारे अनुकूल परिणाम शरीरावर, मनावर होतात याचे अनुभव कित्येकांनी घेतल्यामुळे त्यांच्याकडून ध्यानासाठी मुद्दाम वेळ काढला जातो.
पुस्तकात कशाप्रकारे मांडला आहे हा विषय? आता ध्यानाचे बरेच प्रकार असतील. पण यात कोणत्या एका प्रकाराची वाहवा केली नाहीये, तर शास्त्रीय अभ्यास करुन जे निष्कर्ष समोर आले ते मांडले आहेत. आधुनिक विज्ञानाच्या मदतीने ध्यानाचा मेंदूवर काय परिणाम होतो हे शास्त्रज्ञांकडून तपासले जात आहे. असे प्रयत्न आणि त्याचे निष्कर्ष या पुस्तकात आहेत. मानसोपचार आणि मेंदूविज्ञान या दोन बाजूंनी ध्यानाचा अभ्यास केला जातोय. वेगवेगळ्या ध्यान प्रकारांचा अभ्यास आणि असा अभ्यास करणारे डॉक्टर, संशोधक यांच्या कथा असे पुस्तकाचे स्वरुप आहे. ध्यानाच्या संदर्भात होणाऱ्या टोकाच्या भूमिका किंवा अंधश्रद्धा समजून घेतले जाणारे आक्षेप याबद्दलही यात उल्लेख आहे. लेखकाच्या म्हणण्यानुसार ध्यान ही सायकल, गाडी चालवणे, पोहणे यासारखे शरीर आणि मनाचे कौशल्य आहे. इतर गोष्टी जशा आपल्या आपण शिकू शकतो तसेच ध्यानही शिकू शकतो. ऑफिसमध्ये काम करता करता फक्त तीन-चार मिनिटांचा ब्रेक घेतला तरी मेंदूला ताजेतवाने करता येऊ शकते. ते कसे हे आणि अशा बऱ्याच गोष्टी यातून समजावून सांगितल्या आहेत. स्वतःला कायम उत्साही, आनंदी आणि स्वस्थ ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक कसे आहे ते यात सांगितले आहे. ध्यान म्हणजे केवळ काही गूढ, अध्यात्मिक गोष्ट नसून ध्यानाकडे एक चिकित्सा म्हणून पाहिले पाहिजे. ध्यान आणि विज्ञान यांची सांगड यात छान घातली आहे.
सुरुवातीला म्हटलं तसं क्षणाचीही उसंत नाही असं म्हणतो आपण. पण आवड असेल तर सवड मिळते असंही म्हणतोच की. नुसतं म्हणतो असं नाही तर आवडीची गोष्ट करण्यासाठी खरंच सवड काढली जाते. किंबहुना ती काढायला हवीच. आपल्याच स्वास्थ्यासाठी या गोष्टीची आवड निर्माण करायला हरकत नाही. मन, मेंदू शांत असले तर शरीर आपोआपच सुदृढ राहील. तसे झाले तरच देवाने दिलेल्या या आयुष्याचा सुंदररीतीने उपभोग घेता येईल.
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा