वारी
मनाची गं वारी। कुणी ना सोबती।
अखंड फिरस्ती। दाही दिशा।।
रंगीत पाखरु। कधी होऊ पाहे।
मुक्ततेचे दोहे। गाऊ लागे।।
फुलावे सुगंधी। असे वाटे त्याला।
नमन देवाला। त्याचे आधी।।
कधी रिमझिम। येई बरसत।
सुखाचेच गीत। मुखी त्याच्या।।
भटकून येई। कधी वनातून।
जाई मोहरुन। मन त्याचे।।
कधी होई मन। किरण सोनेरी।
धुक्याच्या झालरी। संगे खेळे।।
जाते जेव्हा मन। मायेच्या अंगणी।
भिजवे पापणी। सय तिची।।
संपणार नाही। विचारांची वारी।
मन वारकरी। ताल धरी।।
ना आवरु वाटे। भ्रमंती मनाची।
लाट आनंदाची। फिरे देही।।
**********************************
एकदा वाटलं विठ्ठलाला…
कमरेवर हात ठेवून नुसतं उभं राहण्यापेक्षा
सामील व्हावं आपणही वारीत…
मग काय…देवच तो
गेला की सुटाबुटात वारकरी बनून.
सुटाबुटातला वारकरी बघून
वळल्या की त्याच्याकडेच
सगळ्यांच्या नजरा…
मग काय…तो ही मिरवत राहिला
दिमाखात आपलाच तोरा.
घुमत होते आजूबाजूला त्याच्या
टाळ-मृदुंगाचे बोल नि होत होता
विठूनामाचा गजर…
पण हा मात्र चालत होता अलिप्त
घेऊन कोरडी नजर.
बघत होता वारकऱ्यांना
कुठेही बसताना, मिळेल ते जेवताना
दगडाची उशी करुन झोपताना…
घ्यावी वाटली मग त्याला त्यांची परीक्षा
मनातल्या मनात बोलताना.
मग काय…दुपारच्या वेळी वारकऱ्यांना
ऑफर केले त्याने पटकन
चाट, पिझ्झा नि बर्गर…
पण मोहात पडेल तो सच्चा वारकरी कसला!
खुणावत होती त्यांना कोरडी चटणी-भाकर.
शरीराने सुरकुतलेल्या वारकऱ्यापुढं
दिमाखात उभी केली त्याने
आपली आलिशान गाडी…
मग स्वाभिमानी नजर म्हणाली त्याला
दणकट आहे माझी पायांची जोडी.
अखंड वारीमध्ये चालताना
हर तऱ्हेने मोहात पाडत होता तो
सगळ्या वारकऱ्यांना…
पण जवळ करत होते सगळेच
फक्त नि फक्त विठूनामाला.
साध्याभोळ्या भक्तांची ही भक्ती पाहून
शेवटी भरुन आला त्याचा गळा,
गहिवरुन आला तो ही…
हृदयात यांच्या अबाधित आपलेच स्थान
हे कळले मग त्यालाही.
पंढरीत गेल्यावर सुटातल्या विठोबाने विचारले
का घेताय तुम्ही एवढे कष्ट?
मी आहे की तुमच्याच हृदयात…
हसलेच मग सगळे वारकरी
या प्रश्नाला मनातल्या मनात.
तू नको काळजी करु आमची
काहीही जरी म्हणालास तू
तरी आम्ही येणार दरवर्षी…
वारीतच तर होत असतो संवाद
आमच्या मनाचा आमच्याच मनाशी.
जस्मिन जोगळेकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा