पैंजण

किती वाटायचं मला की,
पानावरच्या त्या दवबिंदूंना
अलगद टिपावं आणि 
गुंफावं त्यांना एका धाग्यात…
करावेत त्यांचे नाजूक पैंजण
आणि मऊशार गवतावरून
हळुवार पावलं टाकत
फिरून यावं उगवत्या सूर्यासोबत.

किती वाटायचं मला की,
झाडाखाली विसावलेल्या बकुळीच्या फुलांना
अलवार वेचावं आणि
गुंफावं त्यांना एका धाग्यात…
करावेत त्यांचे सुगंधी पैंजण
आणि पखरण करावी
सुगंधाची हलकेच अंगणभर
लहरत लहरत वाऱ्यासोबत.

किती वाटायचं मला की, 
खुडून आणाव्यात चांदण्या
अन् गुंफावं त्यांनाही एका धाग्यात…
करावेत त्यांचे चमचमते पैंजण
आणि लखलखून टाकावी
रात्रीची ती शांत धरती
आकाशातल्या चंद्रासोबत.

किती वाटायचं मला की….

जस्मिन जोगळेकर.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक