स्वप्नातली स्पर्धा

रामनगर नावाचं कोकणातलं एक छोटुसं गाव. छोट्याशा गावातली ती शाळा देखील छोटुशी. चिरेबंदी, शेवाळलेल्या कौलांची आणि आजूबाजूच्या हिरवाईने वेढलेली. तिच्या व्हरांड्याच्या भिंती वेगवेगळ्या चित्रांनी, सुविचारांनी नटलेल्या. शाळा छोटी असली तरी तिचं लाल मातीचं मैदान मात्र ऐसपैस पसरलेलं होतं. पसरलेलं असलं तरी थंड झालेल्या लाव्ह्यासारखं चित्रविचित्र ओघळलेलं नव्हतं. तर नीट आखीवरेखीव होतं. बरोब्बर मधोमध झेंडावंदनाची जागा, कडेने वेगवेगळी झाडं लावून सुशोभित केलेलं असं होतं ते मैदान. लालभडक मातीमुळे तर खासम् खासच दिसायचं. 

त्याच मैदानाला आज अजून सजवलं होतं. मुलांनीच केलेल्या रंगीबेरंगी, त्रिकोणी पताका या टोकापासून त्या टोकापर्यंत लटकवलेल्या होत्या. एका बाजूला वर्गातली टेबलं खुर्च्या नीट मांडलेल्या होत्या आणि लाल मातीवर समांतर अशा चुन्याच्या पांढऱ्या रेषा ओढलेल्या होत्या. होय होय...बरोब्बर ओळखलंत..शाळेच्या मैदानी स्पर्धांचीच ती सगळी तयारी होती. मुलं उत्साहाने बागडत होती. स्पर्धेत भाग घेतलेल्या काही मुलांच्या चेहऱ्यावर बिनधास्त भाव होते तर काहींच्या पोटातला गोळा चेहऱ्यावरुन दिसत होता. काहीजण लिमलेटच्या गोळ्या मिळणार म्हणून खुश होते तर कशातच भाग न घेतलेली मुलं 'प्रेक्षकही पाहिजेतच की स्पर्धा बघायला' असं सांगत खूप मोठा त्याग केल्याच्या भावात इकडे तिकडे फिरत होती. त्यामागचं खरं कारण सगळ्यांनाच माहीत होतं...ओपन सिक्रेटच की एकप्रकारचं. अशात शिक्षकांची धावपळ सुरु होती. निकाल लिहायची पॅड तयार करणं, गळ्यात शिट्ट्या अडकवणं, पंच म्हणून तयारी करणं आणि त्यातच मुलांना शांत बसवणं. अखंड आवारात नुसती पळापळ, गडबड चालू होती जणू काही एखादी लगीनघाईच. शिपाई काकांची या सर्वांपेक्षा जास्त लगबग. शाळेत कोण महत्त्वाचं, मानाचं असेल तर ते हे शिपाई काकाच असतात बघा. शिक्षक, मुलांपासून अगदी मुख्याध्यापकांपर्यंत सगळ्यांनाच यांची मर्जी सांभाळावी लागते. तर या शाळेतही दामू काकांना तो मान मिळत होता. 

तर अशी सगळी जय्यत तयारी झाल्यावर प्रत्यक्ष स्पर्धांना सुरुवात झाली. जोरदार आरडाओरड्यात मुलं जोशात खेळत होती. प्रेक्षक मुलं आपापल्या मित्रांना चियरअप करत होती. प्रेक्षक मुली शेजारच्या मुलींबरोबर काहीतरी खुसुपुसू करत तोंडावर हात धरुन हसत होत्या. शिक्षक सर्वांवर लक्ष ठेऊन होते आणि सकाळपासून धावपळ करुन दमलेले दामू काका कोपऱ्यातल्या झाडाखाली घटकाभर विश्रांती घेत बसले होते. त्यावेळचं तिथलं चित्र एकंदरीत असं होतं. आता ऊन हळूहळू सरकू लागलं होतं. सकाळी स्पर्धा सुरु होतानाच उत्साह आता त्या सूर्याबरोबरच मावळू लागला होता. स्पर्धेचे निकाल जाहीर व्हायची वेळ आली. बक्षीस मिळालेली मुलं आनंदी चेहऱ्यानं पण जड पाय ओढत ओढत जाऊन बक्षीस घेऊन येत होती. सकाळच्या जोरदार टाळ्यांचा आवाज आता पिचकल्यासारखा येत होता. बक्षीस वाटप होईपर्यंत अंधारुन आलं आणि सगळ्यांनाच इतका वेळ विसर पडलेल्या घरी जायची घाई लागली. मुलं घरी गेल्यावर शिक्षक मंडळीही हळूच पटकन कसं सटकता येईल हे बघायला लागली. मागची आवराआवरी करायची होती पण कोणातच त्राण उरले नव्हते. त्यामुळं 'टेबल खुर्च्या आता राहू द्यात मैदानातच, मी रात्री झोपतो इथंच' या दामू काकांच्या विचाराला सगळ्यांनीच जोरदार उचलून धरलं आणि ज्याने त्याने आपल्या घरचा रस्ता धरला. 

आता शाळेत उरले एकटेच दामू काका. सगळं कसं शांत शांत झालं होतं. बाहेरच्या झाडीमुळे वातावरण हळूहळू गार व्हायला लागलं होतं आणि घरुन आलेल्या डब्यामुळे दामू काकांचं पोटही थंड झालं होतं. पेंग यायला ही कारणं पुरेशीच असतात की. मग काय...दामू काकांनी बिथरला अंछाना….आपलं अंथरला बिछाना नि दिली ताणून. दामू काका घोरत पडले होते व्हरांड्यात आणि मैदानावर टेबल खुर्च्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या आता. त्यांनी पण सकाळपासून मुलांचा दंगा पाहिला होता. धावतीची स्पर्धा पाहिली होती. मग त्यातल्या एका टेबलला काय झालं काय जाणे..पण त्याच्याही मनात आलं की, आपल्याला पाय आहेत तर आपणही आपल्या धावतीच्या स्पर्धा का घेऊ नयेत? झालं...एकदा असं वाटल्यावर मग काय! त्याने उरलेल्या सगळ्या टेबल खुर्च्यांना आपली कल्पना सांगितली. काहींना ती भन्नाट, युनिक वाटली तर काहींना खुळेपणाची. पण स्पर्धा भरवायची तर संधी आजच होती. कारण ते सगळे आज मोकळ्यावर होते. एरवी वर्गात बंद असताना काही करता येत नसे त्यांना. बऱ्याच जणांनी टेबलाची ही आयडियेची कल्पना उचलून धरली. मात्र काहींनी प्रेक्षक होणं पसंत केलं. झालं...मैदानावर विस्कटलेली असली तरी थोडीफार तयारी होती तशी. चुन्याच्या पांढऱ्या रेषांना आता सरळ, समांतर रहायचा कंटाळा आला होता. अंगाला आळोखेपिळोखे देत त्याही जरा सैलावल्या होत्या. टेबल खुर्च्यांची त्याबाबत काही तक्रार नव्हती. मग त्यांच्यात एक खुर्ची पंच बनून काम करायला तयार झाली. बाकी तयारी झाल्यावर स्पर्धेला सुरुवात झाली. गटागटाने सगळे एका ओळीत उभे राहिले. सगळे ओळीत शांतपणे उभे राहिले तर त्या शाळेतल्या टेबल खुर्च्या कसल्या! एक खुर्ची तिच्या शेजारच्या टेबलाला म्हणाली, 'अरे ए कसला अघळपघळ रे तू! जरा आवरुन उभा रहा की.' त्यावर चिडलंच की ते टेबल आणि मागच्या पायाने खुर्चीच्या पेकाटात लाथ मारली. खुर्ची लागली आय आय आय करत ओरडायला. त्यांचा दंगा ऐकून पंच खुर्ची पळत पळत गेली त्यांच्याजवळ. 'परत भांडण कराल तर स्पर्धेतून बाद करेन', असा दम देऊन जागेवर गेली. मग एकदाची स्पर्धा सुरु झाली आणि प्रत्येकजण आपापल्या गतीने पळायला लागले. त्यात एक लंगडी खुर्चीही होती. गुरुजींनी शिकवता शिकवता तिचा झोपाळ्यासारखा वापर केल्यामुळं बिचारी मागच्या पायांनी लंगडी झाली होती. तरी उत्साह मात्र खूप होता हं तिच्याकडे. पण तिला तशी पळताना पाहून हसणारेही होतेच की आसपास. ते मगाचं अघळपघळ टेबल मागे वळून वळून तिला चिडवत होतं. 'अगं लंगडे, गप बसायचं की बाहेर. ही पळतीची स्पर्धा आहे, लंगडीची नव्हे. या स्पीडने पळत राहिलीस तर उद्या उजाडेल आणि मग गुरुजींना वर्गात झोपाळा कुठला मिळणार?' ती बिचारी खुर्ची गरीब, भोळीभाबडी….गप्प ऐकून घेत होती सगळं. तिची बाजू घेऊन परत मगाचची खुर्ची भांडायला गेली. पण पंचांचं लक्ष होतंच दोघांवर. त्यांनी डोळे वटारलेले पाहून दोघे धुसफुसत गप्प बसले. एका टेबलचा एक पाय जन्मजातच जरा आखूड होता. वर्गातसुद्धा ते सारखं डुगडुगत असायचं. त्यानं स्पर्धेत भाग घेतला नव्हता. पण त्याची जोडीदार खुर्ची मात्र जोरदार पळत होती. तिला प्रोत्साहन देण्यात ते टेबल पुढं होतं. 

असं करता करता एकदाची ती अनोखी स्पर्धा पार पडली. सगळ्यांना जाम धाप लागली होती. दामू काकांनी सकाळी माठात भरुन ठेवलेलं पाणी तर पूर्ण संपलं होतं. पण मैदानावर झाडाखाली दामू काका गोळ्यांचं पाकीट विसरुन गेलेले एका खुर्चीनं हळूच पाहिलं होतं. ते पाकीट अजूनही होतं तिथं. तिने भराभर जाऊन ते आणलं आणि सगळ्यांना त्यातल्या गोळ्या वाटल्या. मग जरा सगळे शांत झाले. आता निकालाची वेळ जवळ आली तसे सगळे एकदम गप्प झाले. कोणाचा नंबर येईल याची उत्सुकता तर होतीच, पण सगळ्यांच्या पोटात गोळाही आला होता. अशात पंचांनी निकाल घोषित केला. तो ऐकून नंबर आलेले उड्या मारु लागले. त्या अघळपघळ, भांडकुदळ टेबलाचा नंबर आला नव्हता त्यामुळं ते चिडलं होतं. पळताना सगळ्यांना चिडवण्याच्या नादात, अति आत्मविश्वासापोटी ते मागं पडलं होतं. जसं ते भांडकुदळ होतं, तसंच गुंडही होतं. नंबर आला नाही म्हटल्यावर लागलं मारामारी करायला. पंचांना आणि कोणालाच आवरेना ते. सगळ्यांना धक्काबुक्की करत इकडेतिकडे पळत राहिलं. पळता पळता दुसऱ्या एका टेबलाचा त्यानं पाय मोडला, एका खुर्चीचा हात मोडला. आटोक्यात येईनाच की बाबा! मग काय...सगळेच मैदानभर सैरावैरा पळायला लागले. अख्ख्या मैदानावर दे धमाका नुसता… सकाळी मुलांचाही नव्हता इतका जोरदार दंगा. मग काय! त्या आवाजाने व्हरांड्यात घोरत पडलेल्या दामू काकांना खडबडून जाग आली. उठून डोळे चोळत त्यांनी मैदानावर नजर टाकली तर, सगळं आपलं जसं होतं तसंच अस्ताव्यस्त होतं. मग आवाज कसला होता तो? कुठलं काय..सावळा गोंधळ चालला होता तो दामू काकांच्या डोक्यात.. सकाळपासूनच्या दंग्याच्या विचारांचे त्यांच्या मनात गुंतलेले ते जाळे होते..खरी स्पर्धा नव्हे त्यांच्या स्वप्नात आलेले चाळे होते ते. 

जस्मिन जोगळेकर. 
(शिक्षण विवेक अंकात प्रकाशित झालेली कथा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक