असंच काही...
व्हॉट्सॲप वरच्या एका ग्रुपमधे उपक्रम दिला होता. त्यात लिहिलेल्या या तीन कविता. गतवर्षीच्या शेवटच्या दिवसाचा शेवट या कविता लिहून झालाय. तिसरी कविता लिहायचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तशासारख्या अजून लिहिता आल्या तर मजा येईल असं वाटतंय. बघूय कितपत जमतंय. प्रयत्न सुरू ठेवणार. 🙂
नवीन वर्षाच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐
१.
जेव्हा म्हणालास मला
प्रीत डोळ्यात वाच ना
गाली उमटला माझ्या
गोड लाजेचा रक्तिमा
ढाई अक्षरांनी तुझ्या
रोम रोम शहारला
मनातल्या पावसाचा
कसा थांबवू धिंगाणा
लाजलाजून चाखला
तुझ्या प्रेमाचा गोडवा
जणू झाले मीच राधा
कान्हा वाजवितो पावा
आता सुखकर झाल्या
तळपत्या ग्रीष्म झळा
मनातल्या धिंगाण्याचा
लागे मोरपिशी लळा
जस्मिन जोगळेकर
२.
डोळ्यामधला पाऊस
किती घालतो धिंगाणा
उरी दाटली बेचैनी
कुठे साजण दिसेना
रात उलटून गेली
तरी ठाव त्याचा नाही
काय करावे कळेना
दारी कोमेजली जाई
त्याच्या वाटेकडे डोळे
पुनवेच्या चंद्राचेही
लागे चाहूल ना त्याची
चांदणेही फिके होई
बहरली जाई पुन्हा
वेळ गेली अवसेची
धुंद झाली सुगंधाने
रात पुन्हा पुनवेची
पुरे कर तू पावसा
तुझा थांबव धिंगाणा
चालावेच लागणार
काळ कोणाला थांबेना
नको नको रे पावसा
असा अखंड धिंगाणा….
जस्मिन जोगळेकर
३.
साती सुरात आता काहीच मेळ नाही
प्रेमात रंगणे हा बाजारखेळ नाही
आहे तुझी निराळी बघ कोंदणात जागा
ती शोधण्यास तुजला का सांग वेळ नाही?
माहोल गोडव्याचा चाखून जा जरासा
माझ्या तुझ्यात काही का ताळमेळ नाही?
त्या चांदण्यात आता कुठलाच अर्थ नाही
भातूकलीतला हा साधाच खेळ नाही
का पावसा असा रे आलास तू अवेळी
वीजेस पेटण्याला का काळवेळ नाही?
जीवास जीव देणे हा भाव अंतरीचा
वाटे जरी तुला हा पण पोरखेळ नाही
राखेत घेतली मी आता अशी भरारी
गतकाळ तोलण्याला ती शामवेळ नाही
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा