बाराखडी
नवीन काही शिकायला लागल्यावर त्यात प्रयोग किंवा त्याचा सराव करायची इच्छा तर होतच असते. गझल प्रकाराबद्दल उत्सुकता निर्माण झाल्यावर त्याबद्दल माहिती गोळा करणं सुरू केलं. गुगल काका त्यात आघाडीवर. तिथंच एक पोस्ट दिसली, ज्यात बऱ्याच वृत्तात एकेक ओळ दिली होती सरावासाठी, लिखाणासाठी. त्यापैकी दोन ओळी घेऊन हा साधासा प्रयत्न केला आहे.
३.
जिथे रमले कधी नाही तिथे रेंगाळते आहे
मुक्याने एकटेपण भोवती मी पाळते आहे
कशाला चौकशा या अन् कशासाठी दिलासाही
तसेही मीच गर्दीला अताशा टाळते आहे
खऱ्या खोट्या जगाची निश्चिती मग व्हायची केव्हा
विचारांच्या मृगजळाशी जरा मी खेळते आहे
जमा होई अकाली आत गर्दी फार शब्दांची
नकोशा अक्षरांना आज मी फेटाळते आहे
उभ्या गर्दीत साऱ्या ओळखीचा भासही नाही
अहोरात्रौ इशाऱ्यांना उगा धुंडाळते आहे
नसे हंगाम कुठलाही वदंतेच्या सुगीसाठी
बघ्यांची व्यर्थ गर्दी या इथे घोटाळते आहे
नसे गर्दीस काही काय चालू भोवती सारे
उधारीवर जमा अश्रू फुका ती ढाळते आहे
अचानक मेघ काळे आसमंती का उभे झाले
पुरावे मत्सरांचे फुंकणीने जाळते आहे
तिथे तेव्हाच का रेंगाळणे मी टाळले नाही बघितले जे उजेडी स्वप्न ते ढेपाळते आहे
जस्मिन जोगळेकर
१०/०१/२०२३
(वृत्त - वियदगंगा
लगागागा लगागागा लगागागा लगागागा)
******
४.
आठवाने धुंद झाला श्वास नुसता
स्पर्शगंधाचा तुझ्या आभास नुसता
लाजली काया जरी हा स्पर्श खोटा
या मनाला भावनांचा त्रास नुसता
अंगणी ह्या चांदणे घालेल पिंगा
फार नाही मागणे तू हास नुसता
आस आहे की तुझ्या मीठीत यावे
आड येतो हा वियोगी फास नुसता
घातला मी बांध आता पापणीला
चातकाला पावसाचा ध्यास नुसता
का हवा साधार प्रेमाचा खुलासा
आठवावा श्रावणाचा मास नुसता
ठेंगणे होईल मज आभाळ तेव्हा
लाभला थोडा जरी सहवास नुसता
वाटतो मज ओळखीचा हा शहारा
चांदणे आहे खरे की भास नुसता
जस्मिन जोगळेकर
१८/०१/२०२३
(वृत्त मंजुघोषा
गालगागा गालगागा गालगागा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा