बाराखडी

नवीन काही करण्यासाठी वयाची आडकाठी कधीच नसते. उलट तसं करत राहिलं तरच आयुष्यातला तोच तोचपणा दूर जाऊन उद्याच्या दिवसाची आस लागून राहते. थोड्याशा अनुभवावरून मलाही हे लक्षात आलंय. म्हणून लिखाणातच पण नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अर्थात अजून धडपडतेय त्यात...पण त्याशिवाय काय मजा! तर...कितीतरी दिवस कोणी ना कोणी लिहिलेल्या गझल वाचत होतेच. तरी आपणही हे लिहिण्याचा प्रयत्न करावा असं आवर्जून वाटलं नव्हतं. पण एक दिवस वाटलं तसं. मग काय! वाटल्यावर आत्मा थोडीच स्वस्थ बसणार? या प्रकाराची माहिती तर काही नव्हती. हल्ली गुगल काकांमुळे ते एक बरं झालंय. आलं मनात की दाबा बटण...काय हवं ते समोर हजर. मी ही तेच केलं. पण वाचत असताना मधेच कोणीतरी लिहिलेलं एक वाक्य पुढं आलं...'गझल लिहिण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी आपण उत्तम कवी असायला हवं.' झालं...माझी धडपड आता डळमळते की काय वाटायला लागलं. कारण ते वाक्य तर एकदम बरोबर आणि माझ्या मर्यादा मला माहित आहेत ना. पण तरी म्हटलं असू दे. प्रयत्न करायला काय पैसे पडतात! म्हणून वाचत गेले. नियम वाचले पण प्रत्यक्षात कोणाकोणाच्या गझल वाचताना काही वेगवेगळंच दिसायला लागलं. परत मनात आलं की इथेही बहुधा माझी मर्यादा आड येत असणार. तरी वाटलं...आपण लिहायला लागूया, वाचणारे म्हणतील फारतर 'हिचं काय हे तिसरंच.' 

आणि अशा तऱ्हेने गझलेच्या बालवाडीत मी प्रवेश तरी घेतला आहे. कितपत झेपेल त्याचा विचार आत्ता न करता सध्या आडव्या, उभ्या, तिरक्या रेषा मारायला शिकते आहे. त्यातल्याच या दोन रेषा....


१. 

साती सुरात आता काहीच मेळ नाही

प्रेमात रंगणे हा बाजारखेळ नाही


आहे तुझी निराळी बघ कोंदणात जागा

ती शोधण्यास तुजला का सांग वेळ नाही?


माहोल गोडव्याचा चाखून जा जरासा

माझ्या तुझ्यात काही का ताळमेळ नाही?


त्या चांदण्यात आता कुठलाच अर्थ नाही

भातूकलीतला हा साधाच खेळ नाही


का पावसा असा रे आलास तू अवेळी

वीजेस पेटण्याला का काळवेळ नाही?


जीवास जीव देणे हा भाव अंतरीचा

वाटे जरी तुला हा पण पोरखेळ नाही


राखेत घेतली मी आता अशी भरारी

गतकाळ तोलण्याला ती शामवेळ नाही


जस्मिन जोगळेकर 

३१/१२/२०२२

(वृत्त - आनंदकंद)


२.

काय सांगू तो जगरहाटीपुढे लाचार झाला

मानसीच्या भावनांवर कोरड्याने वार झाला


वेढले मग बाहुपाशी यातनेने संयमाला

पापण्यांना आसवांच्या वाहण्याचा भार झाला


डाग चंद्राला तसा का शाप त्याच्या जीवनाला             

जीवघेण्या टोमण्यांचा डंख आता फार झाला 


सिद्ध झाले चंद्रम्याने छेडले त्या रोहिणीला

चांदण्यांच्या रूसव्याने अंबरी अंधार झाला


बंद डोळ्यांनी भुकेला वाघ शेळीचाच केला

निर्णयाने तागडीच्या उन्मळुन तो गार झाला


जाणली त्याने कितीदा झुंज सारी अंतरंगी

निश्चयाचा भावनांवर तीव्रसा एल्गार झाला


भोवतीच्या बंधनाचा पाश त्याने दूर केला

त्याचवेळी जन्मलेल्या स्वत्वचा विस्तार झाला


झळकली आता तमाच्या त्या किनारी सोनरेषा 

सावळासा श्रीहरी डोळ्यांपुढे साकार झाला 


कोण पाठी काय बोले फिकिर त्याची त्यास नाही

हुंदक्यांचा मार्ग भेदत मुक्ततेने स्वार झाला 


जस्मिन जोगळेकर.

०४/०१/२०२३

(वृत्त - मध्यरजनी)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक