जाता जाता

नात्यामधले उरले टाके तू उसवुन जा जाता जाता 

कात तुझी ही अबोल इथली तू घेउन जा जाता जाता


मनात माझ्या फुलून येण्या वसंतास मी केली बंदी

आसपासचा रंग गुलाबी तू बदलुन जा जाता जाता 


प्रसववेदना अविरत आता होतील सुरू मज विरहाच्या

सोसण्यास त्या उपाय मजला तू सांगुन जा जाता जाता


कशी लागली मला कळेना आत वाळवी या नात्याला

ओलाव्याची दारे सारी तू मोडुन जा जाता जाता


नेहमीच रे मजवर येतो डाव विषाचा खेळामध्ये

अमृतप्याला डोक्यावरती तू ठेउन जा जाता जाता 


शिशिरामधल्या पानांवरती भाव जाणवे का तृष्णेचा

पहिल्या प्रहरी थेंब दवाचे तू देउन जा जाता जाता


खिडक्या दारे सताड उघडी मनास करते हवेशीर मी

आठवणींच्या भेगा साऱ्या तू बुजवुन जा जाता जाता 


जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक