उ र की भ

उ र की भ….. हे काय लिहिलंय त्याचा अर्थ लागत नाहीये ना? लावायचा प्रयत्नही करु नका. सांगूनच टाकते. एका पदार्थाचे नाव आहे हे 🙆. गोंधळात पडलात ना? नाव वाचून कदाचित खावाही वाटणार नाही…कदाचित काय… नाहीच वाटणार. पण मोठं कुठं लिहीत बसा म्हणून हे संक्षिप्त रूप. उरलेल्या रताळ्याच्या कीसाची भजी 😛. 


कसं असतं ना…बायका म्हटल्या त्या मुळातच हुशार 😬. स्वैपाकघरात तर त्यांचंच राज्य आणि खपवा खपवी करण्यात तर काय…बोलायलाच नको. कालच्या उरलेल्या आमटीचे त्या असे एकेक पदार्थ करून खाऊ घालतील की हॉटेलमधले महागडे पदार्थ जातील तेल लावत 😛. तर उ र की भ… हाही असाच पदार्थ. उपवासाला दुप्पट खायला म्हणून कितीतरी पदार्थ केले जातात आणि त्यातलं कधीतरी काहीतरी फ्रीजमध्ये जागा पटकावून बसतं. आता आदल्या दिवशी दिवसभर तेच खाल्ल्यावर साहजिकच लगेच दुसऱ्या दिवशीही तेच खायची इच्छा होईलच असं नाही ना! मग काय…करावी लागते अशी खपवा खपवी. उ र की भ ची एकदम सोपी रेसिपी. त्यासाठी साहित्य म्हणून आपल्याला हवा उपवासाला केलेला रताळ्याच्या कीस 😬. या रताळ्याच्या कीसात थोडं बेसन, थोडी तांदूळ पिठी, ओवा हे साहित्य घालायचं, मुळातल्या कीसाची चव कशी असेल त्याप्रमाणे त्यात काही व्यंजनं वाढवायची असतील तर वाढवायची 😑 चवीला मीठ तर हवेच. ताजी मस्त कोथिंबीर घालून सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि लागायचं तेलात सोडायला. खुसखुशीत भजी तयार. 😋 तुम्हीही बघा करून एकदा. 


टीपा….

१) जर दुसऱ्या दिवशीपर्यंत थांबायचे नसेल तर उपवासाची भाजणी घालूनही ही भजी होऊ शकतील कदाचित. (आपापल्या जबाबदारीवर ट्रायल घ्यावी.)

२) जर तळून नको असतील तर अप्पे पात्रात ही भजी होऊ शकतील कदाचित. सेम वरचा कंस..😛

३) कीस जर जास्त प्रमाणात उरला असेल तर थोड्याच कीसाची भजी करावीत आणि उरलेल्या कीसाचा तुम्ही डोकं लढवून नवीन पदार्थ बनवावा. इथेही सेम वरचा कंस. 😬

४) त्यातूनही भजी ही उरली तर त्याचं काय करायचं हा प्रश्न उद्भवू नये म्हणून वरची टीप आहे. जरी उरली तरी झनझनित कट 😛 करुन त्यात ही भजी सोडून तुम्ही खाऊ शकता किंवा ती कुस्करुन मस्तपैकी खमंग फोडणीची भजी करु शकता, त्यावर भरपूर ओलं खोबरं आणि कोथिंबीर असेल तर बहारच. 

५) उपवास सोडायला गोडाचा शिरा केलात तर त्यासोबत ही भजी जुळवून घेऊ शकतील कदाचित. 

६) उपवासाचा दिवस सरल्यावर जर करणार असलात तर रताळी बारीक चिरलेल्या कांद्यालाही आपल्यात सामावून घेऊ शकतील कदाचित. इथे कंस जोडालच तुम्ही. 😬

७) किती दिवसांपूर्वीचा कीस हवा हा प्रश्न निकालात काढण्यात येईल.

८) यात अजून काही पदार्थ add करायचे असल्यास तुम्ही ट्रायल घेऊन बघावी. 

९) सर्वात महत्त्वाचे आपापल्या जबाबदारीवर ही भजी पोटाला झेपतील इतपतच खावीत. 

१०) जर भजी आवडली तर पुढच्या उपवासाची वाट बघायला हवी असे काही नाही. बाजारात रताळी उपलब्ध झाली तर अधेमधे ही करु शकता.

११) काही अंदाज नाही का, किती उरलाय कीस असे घरच्यांचे बोल आता ऐकून घ्यायची गरज नाही. उद्या भजीसाठी जास्त केलाय असं सरळ सांगून मोकळं व्हावं. 😜

१२) अशाच काही टिप्स हव्या असतील तर जरूर संपर्क करावा. 


आकाशकंदिलापेक्षा त्याच्या खालच्या झुर्मुळ्याच जास्त मोठ्या होऊन लोंबकळायला लागल्याने आता इथे थांबण्यात येत आहे. 😜😬

धन्यवाद. 


जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक