पुस्तक परिचय... ओंकाराची रेख जना
एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. 'हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच' म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं 'ओंकाराची रेख जना'.
'विठू माझा लेकुरवाळा', 'धरिला पंढरीचा चोर' अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती.
सोसले चटके l पोटी नाही घास l
विठ्ठलाची आस l जनाईला ll
भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l
धाडे आवतान l विठूराया ll
अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा…
नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l
विठूराया ओढी l जनाईची ll
दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते…
गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l
जनी नामयाची l संतांमधे ll
याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏
वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l
ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll
थरारली वीट l कंप राऊळाला l
श्वास ओलावला l क्षणभर ll
आज नाही घाई l विठोबाला काही l
जनाईच येई l चरणाशी ll
शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं 'चौघीजणी' जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता 'ओंकाराची रेख जना' हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात.
प्रसंग सगळे l तपशिलासवे l
डोळ्यात आसवे l वाचुनिया ll
भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l
प्रसंग तो घडे l आसपास ll
एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… 'अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा'...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला 'साजिरी' हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी 'अजून मातीने माया सोडली नव्हती'... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… 'जोहार मायबाप जोहार'.
जस्मिन जोगळेकर.
१८/०३/२०२३
तुम्ही सुंदर लिहिले आहे.तुमच्या रसिक वाचक मनात एक लेखक दडलेला आहे हे प्रत्येक ओळींतून जाणवत होतं.माझंच पुस्तक मला पुन्हा एकदा नव्याने समजलं. धन्यवाद.आता जोहार वाचा आणि अभिप्राय सांगा.
...मंजुश्री गोखले.
एखाद्या पुस्तकाचा आपण परिचय लिहावा आणि त्यावर लेखिकेने कौतुकाची थाप द्यावी याचं समाधान, आनंद काही वेगळाच. 😍 मनापासून धन्यवाद मॅडम 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा