पुस्तक परिचय

जोहार मायबाप जोहार 

प्रत्येक शिक्षित माणूस सुशिक्षित असेलच असं नाही तसं, प्रत्येक निरक्षर माणूस अडाणी असेलच असं नाही. सध्याच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व आलं आहे. पण पूर्वीचा काळ म्हणजे साधारण १४ व्या शतकाचा विचार केला तर तो काळ वेगळा होता. तेव्हाचे लोक चातुर्वर्ण्य व्यवस्था मानत होते, पाळत होते. या व्यवस्थेनुसार चौथ्या वर्णातील लोकांचे जीवन खूप हलाखीचे होते. शिक्षण वगैरे दूरच, पण त्यांच्या सावलीचाही इतर लोकांना विटाळ व्हायचा. इतर लोकांकडून हाड हूड करून घेण्यातच यांचं आयुष्य संपायचं. 

अशा काळात आणि अशा चौथ्या वर्णात एक व्यक्ती मात्र अशी होऊन गेली की, त्यांच्याबद्दल आदर, आश्चर्य मनात भरून आहे…इतकी वर्षं उलटून गेली तरीदेखील. निरक्षर असूनही अभंग रचणारी, नुसती अभंग रचना नाही तर त्या अभंगातली शब्दकळा मनाला थेट भिडणारी, सरस्वतीचा वरदहस्त लाभलेली. घरात दारिद्रय असलं तरी ही शब्दांची संपत्ती मात्र अफाट. खालच्या जातीत जन्माला येऊनही स्वच्छतेची कास कायम धरलेली. सांगायचं म्हटलं तर किती गोष्टींचा उल्लेख करणार! पण या व्यक्तीमत्त्वाबाबत जाणून घ्यायचं असेल तर मात्र मंजुश्री गोखले यांनी लिहिलेलं 'जोहार मायबाप जोहार' हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. हो…संतांच्या मांदियाळीतले महान संत…संत चोखामेळा यांच्या जीवनावर लिहिलेली २७ प्रकरणांची ही कादंबरी. 

संत चोखामेळा यांच्या जन्मापासून आणि त्याची पार्श्वभूमी सांगण्यापासून ही कादंबरी सुरू होते आणि चोखोबांच्या दुर्दैवी मृत्युनंतर संत नामदेवांनी महाद्वारावर बांधलेल्या त्यांच्या समाधीमुळे प्रसन्न झालेल्या पांडुरंगाला आणि नामदेवांना चोखोबांच्या आवाजात ऐकू येणाऱ्या जोहार मायबाप जोहार l तुमच्या महाराचा मी महार ll या शब्दांपाशी संपते. यामधला जातीभेदामुळे बऱ्याचदा खडतर झालेला, खालच्या जातीतले असले तरी घरात विठ्ठल भक्तीचे अधिष्ठान असलेला, पंढरपुरातील संतांनी बरोबरीची, मानाची वागणूक दिलेला, प्रत्यक्ष ज्ञानोबांनी कौतुक केलेला, संत नामदेवांनी शिष्यत्त्वाचा मान दिलेला, प्रत्यक्ष विठ्ठल भेटीचा, दीपमालेचा सोडलेला संकल्प पूर्ण झालेला आणि मृत्यूनंतर अस्थीतूनही विठ्ठल नाम जपणारा हा जो चोखोबांच्या आयुष्याचा प्रवास आहे, तो डोळ्यात पाणी आणत वाचावा लागतो. हे पाणी कधी चोखोबांना दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे दुःखाचे असते तर कधी संतांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि पांडुरंगाची भक्तवत्सलता पाहून सुखाचेही असते. चंद्रभागेच्या वाळवंटात त्यांना दिलेली शिक्षा आणि चोखोबांच्या मृत्यू वेळचे वर्णन वाचताना डोळ्यातून येणारे पाणी मात्र कितीही प्रयत्न केला तरी पापण्यांची आडकाठी न जुमानता अखंड वाहतच राहते. शब्दात किती ताकद असते ना! 

संपूर्ण कादंबरी उत्कृष्ट तर आहेच पण यातली मला जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रकरण संपवताना कधी विठ्ठल रखुमाईच्या मनातले भाव, कधी त्यांच्यातले संवाद असे जे प्रसंग आहेत ना ते मनाला भावून जातात. चोखामेळ्याचा जन्म अपूर्वाईने बघणारा विठ्ठल, त्याला झालेला आनंद बघून समाधानी झालेली रखुमाई असेल किंवा भक्ताची परीक्षा घ्यायची असली तरी किती ताणून बघायची यावरून रागावलेली रखुमाई असेल, घटकाभर का होईना पण हा मुर्तीतून बाहेर पडून कुठे जातो या विचाराने आणि घडीघडी पांडुरंगाच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघून कोड्यात पडलेली रखुमाई असेल… वाचताना वेगळीच मजा येते. त्यातले काही काही प्रसंग तर असे ज्यांचा सध्याच्या काळाशी संबंध नकळतपणे जोडले जातात आणि हसूच येतं. उदाहरण द्यायचं तर…रखुमाईच्या मनात सुरू असतं…"आपला हा भक्तवेडा नवरा मधेच उठून जातो काय, लगेच परत येतो काय, काही योजना सफल झाल्याच्या आनंदात प्रसन्नपणे हसतो काय..रुक्मिणीला काहीच कळलं नाही. काही विचारायला जावं तर त्याला भक्तांच्या मेळ्यातून वेळ नसतो, वेळ असलाच तरी तो उत्तर देईलच आणि खरं उत्तर देईलच याचीही तिला खात्री नसायची." आता हे वाचल्यावर, अरेच्या, म्हणजे सगळे नवरे सारखेच की असं पटकन मनात येऊन गेलं. असं काही मनात आल्यावर हसू येणारच ना. मनात काही योजना आखली आणि ती नामदेवांना न सांगता पूर्ण केली, यावरून आता त्यांचा रुसवा काढावा लागणार किंवा सांगूनसुध्दा चोखोबांकडे तुझं लक्ष नाही म्हणून आता नामदेव आपल्याला रागावणार हे वर्णन वाचून, त्यांचा पांडुरंगावरचा अधिकार आणि पांडुरंगाचे भक्तप्रेम पाहून मनात काही वेगळ्याच भावना दाटून येतात, ज्याचं वर्णन करता येणार नाही. प्रत्येक प्रकरणाचा शेवटचा परिच्छेद अशा प्रसंगांनी नटलेला आहे. म्हणजे वाचताना प्रत्येकवेळी वाटतं, अरे हा तर सर्वव्यापी ईश्वर आहे. मग त्याच्याबाबतीतही सामान्य माणसाच्या आयुष्यात घडतात तशा घटना, तशा भावना येतात हे पाहून कुठं तरी त्याच्याशी जवळीक साधली जाते. या एकेका परिच्छेदाने नक्कीच जादू केली आहे. परत या ही पुस्तकातली भाषा अशीच की जी आपल्याला त्या काळात, प्रत्येक प्रसंगात जातीने घेऊन जाते. आपल्या अवती भवती सगळं घडतंय वाटायला लावते. मग कधी कधी पावसाच्या रुद्रावतारात खोपटात प्रसव वेदनांनी विव्हळणाऱ्या एकट्या असणाऱ्या सोयराच्या मदतीला पाय जाऊ पाहतात, तर कधी चोखोबांच्या खोपटात आलेल्या कलशातल्या तीर्थाची चव पाहण्यासाठी बोटं, जीभ सरसावतात. 

कादंबरीत वर्णन केलेले चोखोबांच्या आयुष्यात घडणारे कितीतरी प्रसंग चटका लावून जातात. त्यांचा मृत्यू आणि त्यानंतर त्यांच्या अस्थी पंढरपुरात घेऊन याव्यात यासाठी नामदेव आणि साक्षात पांडुरंग यांची खटपट वाचून मन हेलावतं. ५०-६० मजुरांच्या अस्थींमधून चोखोबांच्या अस्थी ओळखायच्या तरी कशा या नामदेवांना पडलेल्या प्रश्नाला पांडुरंगाने दिलेले उत्तर आणि त्याने सांगितल्याप्रमाणे अस्थीतूनही येणारा 'विठ्ठल विठ्ठल' हा गजर त्यांच्या श्रेष्ठत्वाची साक्ष देऊन जातो. विठ्ठल आणि त्याचे भक्त यांचं नातं काही वेगळंच. पुस्तक वाचून संपलं तरी मनात कायम वाटत राहतं….आपण किती भाग्यवान की अशा भूमीत जन्माला आलो जी अनेक श्रेष्ठ व्यक्तिमत्त्वांमुळे पावन झाली आहे, त्यातलेच एक…संत चोखामेळा. 🙏


जस्मिन जोगळेकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक