मंगळागौर

अखेर काल बाईपण भारी देवा बघून आले. उलट सुलट परिक्षणांमुळे बघावा की नाही या संभ्रमात होते खरंतर. पण पहायचा ठरवला आणि पाहून आलेही. पण सिनेमा कसा होता यावर ही पोस्ट मुळीच नाहीये. इतर ठिकाणी बराच किस पाडला जातो आहेच. पण यात दाखवलेला आणि माझा आवडीचा विषय म्हणजे मंगळागौर. मंगळागौरीचे खेळ हा अगदी लहानपणापासून आवडीचा, जिव्हाळ्याचा आणि पारंपरिक पद्धतीने मला खेळताही येणारा खेळ. कोकणात असताना पहाटेपर्यंत जा मंगळागौरी अजूनही आठवताहेत. येतात ते खेळ झोकून खेळायचे, नवीन असतील तर शिकून घ्यायचे यात ती वर्षं सरली, मग कोकणही सुटलं आणि हळूहळू हे खेळ खेळण्याचं प्रमाण कमी झालं. हे सगळं मागं पडलं तरी मनात कायम जागंच होतं. ते कळलं केव्हा तर २०१२ साली….गावातल्याच एका काकूंच्या प्रोत्साहनामुळे आम्ही मैत्रिणींनी जागर मंच नावाचा पारंपारिक खेळांचा ग्रुप तयार केला. जो अजूनही छान सुरू आहे. अर्थात मधली पुराची आणि कोविडची काही वर्षं सोडता. श्रावण जवळ येऊ लागला की आम्ही मैत्रिणी एकदम उत्साहात येऊ लागतो. साधारण दीड दोन महिने आधी आमची प्रॅक्टिस सुरू होते. खेळता येईल का? अंग हलेल का? त्रास तर होणार नाही ना? असं दर वर्षी पहिल्या दिवशी वाटतं. पण एकदा का खेळायला सुरुवात केली की, सगळं विसरून जायला होतं. दुपारचे ते दोन तास आमचे असतात. या वेळात प्रॅक्टिस तर होतेच, पण त्या सोबतीने हसणं खिदळणं आणि थोडं फार गॉसिप. बायका म्हटल्यावर तेवढं तर पाहिजेच ना! पण एकूणच हा वेळ म्हणजे नुसतं आनंदात डुंबणं असतं. श्रावणातले मंगळवार जवळ येऊ लागले की, कपाटातून हळूहळू नऊवारी साडी (शिवलेली नाही बरं का), पाटल्या बांगड्या, नथ, चिंचपेटी, बुगड्या अशा अनेक गोष्टी डोकावू लागतात. हातावर मस्तपैकी मेंदी काढून, बांगड्या भरून झाल्या की खेळायला आम्ही तय्यार. या खेळांमुळे आम्हाला मानसिक सुख मिळतंय, व्यायाम होतोय, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपली ही संस्कृती जतन केली जात आहे. यावर्षीही खेळाच्या चार सुपाऱ्या मिळाल्या आहेत. तीन वर्षांच्या ब्रेक नंतर आता जोरात तयारी सुरू केली आहे. पूर्वी जवळपास ६०-६५ खेळ खेळायचो. आता दिलेल्या वेळात खेळ संपवायचे म्हणून ते थोडे कमी केले आहेत. साधारण ४५-५० असतील. पण उत्साह, जोम काही कमी झालेला नाहीये. १२ सप्टेंबर पर्यंतचे दिवस म्हणजे आनंदी आनंद. जस्मिन जोगळेकर.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक