कथा ---- सफल प्रेम

सफल प्रेम


खरंतर ती दुपारची वेळ होती. पण दिवस मात्र पावसाळ्यातले होते. त्यामुळे खूप अंधारून आलं होतं. ढगांची शिवण कधीही उसवून त्यातून पाऊस कोसळण्याची शक्यता दाट होती आणि झालंही तसंच. आता त्या अंधारलेपणाला सोबत होती ती फक्त नि फक्त कोसळणाऱ्या पावसाची. बाकी वातावरणात एक नि:स्तब्ध शांतता पसरून राहिली होती. आभाळातून झाडांच्या शेंड्यांवर कोसळणाऱ्या आणि पानांवरून खाली ओघळत जाणाऱ्या पावसाच्या जड थेंबांना झेलता झेलता झाडांची पानही जडावून खालच्या दिशेने वाकत होती. छोट्या छोट्या वाड्यांना जोडणारे डांबरी रस्तेही त्या कोसळणाऱ्या पावसात मनमुराद भिजत होते. अधून मधून असणाऱ्या रस्त्यांच्या गालावरच्या खळ्या मातकट पाण्याने भरून वाहत होत्या. झाडांवर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज वेगळा होता, घराच्या कौलांवर कोसळणाऱ्या पावसाचा आवाज वेगळा होता आणि पागोळ्यांमधून पडणाऱ्या पाऊस माळेचा आवाज वेगळा होता. हे सगळे आवाज कानांनी टिपत आणि ते नि:स्तब्ध वातावरण अनुभवत ती घराच्या व्हरांड्याच्या जाळीत निवांत बसली होती. जेवण आवरून स्वयंपाक घराची झाकपाक झाली होती आणि दुपारच्या कॉफीला अजून वेळ होता. ही जी मधली वेळ होती ती कायम तिची स्वतःची. यात ती कधी लिखाण करत बसायची तर कधी वाचत. पण व्हरांड्यातली ही तिची खास आवडती जागा. आजच्यासारखा पाऊस पडत असेल तर मात्र ती तिच्या बाकी सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून फक्त पाऊस बघत बसायची कितीही वेळ… न कंटाळता. पाऊस म्हटलं की लोकांना भिजायची, त्यात दंगा करायची हौस असते. पण ही मात्र त्या सगळ्यांपेक्षा वेगळी. पावसाचा आवाज जसजसा वाढत जाईल तसतशी ही आतून शांत शांत होत जायची. भिजायला चल म्हणून आग्रह करणारंही तिच्या घरी कोणीच नव्हतं, कारण एकटीच तर राहत होती ती घरात. 

पावसाळ्यातलं असं वातावरण असलं की, तिला एकटचं राहणं अधिक आवडायचं. तिच्या समाधीत कोणाचाही व्यत्यय तिला चालायचा नाही. अर्थात तसा त्रास देणारं कोणी नव्हतंच तिच्यापाशी… तरीही. पण त्या दिवशी दुपारी मात्र तिच्या या समाधीत अचानक व्यत्यय आला. अंगणातल्या बेड्यावरून,  वाटेत साठलेल्या पाण्यातून उड्या मारत एक चिंब भिजलेली व्यक्ती तिच्या घराच्या भिंतीलगत येऊन उभी राहिली. पावसात पूर्ण भिजलेली असली तरीही आता मात्र पागोळ्यांपासून शरीराला सांभाळत ती व्यक्ती भिंतीला अधिकाधिक चिकटत होती. जाळीतल्या तिच्या जागेवरून ती व्यक्ती हिला व्यवस्थित दिसत होती, पण पावसापासून आडोसा मिळवण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीला मात्र ही दिसली नव्हती.आपल्या समाधीत कोण हा अचानक उपटला म्हणून खरंतर ती नाराज झाली, पण  केसांवरून पाणी ओघळणाऱ्या त्याच्या चेहऱ्याकडे तिचं लक्ष जाताच ती अचानक थबकली. हा चेहरा तोच होता जो तिला मागच्या आठवड्यात बाजारच्या वाटेवर दिसला होता. तेवढी एक गोष्ट आठवताच बाकी गोष्टी पटापट तिच्या नजरेसमोरून सरकत गेल्या. झाडाचं एखादं वाळलेलं पान नदीच्या वाहत्या प्रवाहात पडलं तर कसं पटकन नजरेआड होईल ना त्या गतीने तिने मागच्या त्या आठवड्यातल्या गोष्टी पाहून घेतल्या. मागच्या आठवड्यात बाजारातून परत घरी येताना वाटेत हाच तर कॅनव्हास आणि रंग-ब्रशचा पसारा घेऊन बसलेला तिला दिसला होता. अचानक काही छान नजारा दृष्टीस पडल्यावर गडबडीने बसला असणार हे त्याच्या स्थितीवरून तिने ओळखलं होतं. पण त्याच्या चित्र रेखाटण्यात मात्र ती गडबड कुठेही दिसून येत नव्हती. कॅनव्हासवरची ती फ्रेश रंगसंगती, त्यावरचे त्याचे ते सहज स्ट्रोक्स, हळूहळू जिवंत होत जाणारं चित्र…हे सगळं पाहून ती भोवताल विसरूनच गेली. आपण अशा अवस्थेत किती वेळ उभ्या आहोत हे देखील तिला कळलं नाही. डोळ्यांसमोर वाजणाऱ्या टिचकीने ती भानावर आली. थोडे खजिल भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले पण त्यापेक्षा इतकी छान कलाकारी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचा आनंद त्यावर जास्त होता. त्यानं भानावर आणल्यावर काय बोलावं हे न कळून ती फक्त मंद हसत त्याच्याजवळून निघून गेली. ती जात असलेली वाट आणि तिची पाठमोरी आकृती याकडे तो बराच वेळ बघत उभा राहिला. शेवटी त्याची नजर तर कलाकाराचीच होती ना.

हे सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू फुटलं खरं, पण त्याला घरात घ्यावं की नाही हा संभ्रम त्यावर जास्त उठून दिसत होता. कलेवरच्या प्रेमानं तिला दार उघडायला भागच पाडलं. दारात तिला उभी पाहून त्याची अवस्थाही काही वेगळी झाली नव्हती. दारातून तो आत येईपर्यंत ती आतून टॉवेल घेऊन आली आणि त्याला अंग पुसायला टॉवेल देऊन कॉफी करण्यासाठी ती आत वळली. गॅस शेगडीजवळ उभी असताना तिच्या मनात हळूहळू वेगवेगळ्या भावनांचे वारे वाहायला लागले. त्या भरातच केलेल्या कॉफीचे दोन मग ट्रेमधून घेऊन ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा व्हरांड्यातल्या दोन आरामखुर्च्या थोडं अंतर ठेवून शेजारी शेजारी ठेवलेल्या तिला दिसल्या. पाऊस अजून थांबला नव्हता, पण त्याचा जोर मात्र कमी झाला होता. आता पागोळ्यातून पडणाऱ्या पाऊस माळेचे मणी दिसत होते. दोघं काही न बोलता शांतपणे पाऊस बघत गरम कॉफीचे घोट घेत होते. शब्द नसले तरी नजर आणि चेहऱ्यावरचे भाव तर गप्प राहू शकत नव्हते. यात तिचा चेहरा अधिक बोलका. कॅनव्हासवरच्या रंगांमुळे तिच्या आयुष्यात रंग उधळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण….निसर्गातले अनेकविध रंग जरी त्यांना मोहात पाडत असले तरी आयुष्यातल्या या रंगात मात्र….तो कलाकार होता आणि ती जाणकार दर्दी. त्यादिवशी त्याला चित्र काढताना तिने पाहिलं होतं. कलेशी त्याचं एकरूप होणं, निसर्ग जे मुक्तहस्ते देतोय ते मुक्तपणे कॅनव्हासवर चितारणं यावरच तर ती मोहून गेली होती. त्याच्या स्ट्रोक्स वरून तिच्या लक्षात आलं होतं की, हा काही कुठल्याही बंधनाला पाळणारा, बंधनात राहणारा कलाकार नाही. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधणारा, पाहणारा आहे हा. कलाकार म्हणजे तसाच हवा ना! एकाच फुलाच्या सौंदर्यात कधी फुलपाखरू अडकत नाही. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर भिरभिरत राहतं म्हणून तर ही सृष्टी रंगीन होते. 

तिचं मन त्याच्याकडे धावत होतं, पण मनाला आवर घालण्यासाठी तिला काही कष्ट करावे लागले नाहीत. कारण तिला माहीत होतं की, बंधनात अडकवून ठेवणारं प्रेम काही खरं प्रेम नाही. एकत्र आयुष्य नाही घालवलं तरी त्याच्या कलेवरचं आणि त्या अनुषंगाने त्याच्यावरचं माझं हे प्रेम काही कमी होणार नाही नक्कीच. मग मी कशाला त्याला अडकवून ठेऊ. जेवढी मुक्तपणे तो भरारी घेईल तेवढी त्याची झेप उंच असेल. मनातल्या मनात ती खूप बोलत होती आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याला हळूच न्याहाळत होती. पण तो मात्र स्वतःतच रमलेला होता. इकडे पाऊसही थांबत आला होता. मनात घोंघावू पाहणारं वादळ तिने शांत केलं होतं. दुपारचं अंधारलेपण जाऊन आता ताजी संध्याकाळ उमलायला लागली होती. पाऊस उघडल्यानंतरची शांतता आता पसरली होती. आवाज येत होता तो फक्त पागोळ्यांमधून खाली साचलेल्या पाण्यात पडणाऱ्या एखाद दुसऱ्या थेंबाचा. तो तिचा निरोप घ्यायला उठला तशी तिनेही उठून त्याचा निरोप घेतला…नावही न विचारता. आला तसा तो भराभर निघूनही गेला. आता परत त्या घरात उरली ती एकटी आणि त्याच्या अस्तित्वाची तात्पुरती खूण…त्याच्या ओल्या कपड्यांमुळे ओले झालेले आरामखुर्चीचे कापड. 


जस्मिन जोगळेकर.

कथा जागर उपक्रम

पुस्तकप्रेमी समूह

१४/७/२०२३.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक