देवराज वृत्त

सूर चंद्रमा तुझा पहाट रोज रेखितो
चांदण्यात मी पुन्हा पुन्हा हळूच नाहतो
आर्तता सुरातली जिवास वेड लावते
चांदणे सुरातले किती मधाळ वाटते

रात्र ही अशी कशी उगाच खोड काढते
संपता न संपते पहाट दूर वाटते
सूर साज हा तुझा मनास रोज खेचतो
सूर स्वाद चाखण्यास नीज दूर ठेवतो

मुग्ध गोडवा जणू मलाच साद घालतो
पारिजातकासवे हळूच त्यास झेलतो
चांदणे सुरातले मधाळ वाटते मला
सांग भेटशील तू कधी कुठे कशी मला?

थांबण्यास ना तयार बंधनात फारसे
संयमास सांग मी अजून थोपवू कसे? 
ताल सोबतीस घेत जाउया सुरांसवे
अंतरात तेवतील गीत दीप हे नवे 

जस्मिन जोगळेकर
(देवराज वृत्त)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक