......

त्या छोट्याशा टेकडीवरच्या घराबाहेर व्हरांड्यात ती एकटीच झोपाळ्यावर झुलत बसली होती. तिची नजर समोरच्या डेरेदार वृक्षावर होती. त्या हिरव्यागार, ऐसपैस पसरलेल्या, फुला-फळांनी बहरणाऱ्या वृक्षाकडे पाहून तिच्या मनात विचार येत होते.. कोणासाठी हा वृक्ष एवढा बहरत असेल? याची हिरवीगार पानं डोळ्यांना थंडावा देतात...याची सावली शरीराला, मनाला शीतलता देते...याची फुलं परिसर किती प्रफुल्लित करतात...फळं तर काय..आहाहा..मधुरतेची परिसीमाच...
    पण हे सगळं दुसऱ्याला मिळावं असा विचार करुन का हा वृक्ष बहरत असतो?? हाच विचार तिच्या मनात येत होता. या प्रश्नाचं उत्तर तिच्या मनाने 'नाही' असंच दिलं. एका इवलूश्या बी पासून एवढा डेरेदार वृक्ष होईपर्यंत तो स्वतःसाठीच जगत होता, हे तिला स्पष्ट जाणवलं. 
    फक्त स्वतःसाठी जगताना दुसऱ्यांना किती उपयुक्त ठरत होता तो वृक्ष..मग असं वागणं आपल्याला का जमू नये? पटकन वाटून गेलं तिला. आपण आपलं आयुष्य जगताना दुसऱ्याचा किती विचार करत असतो. असं केलं तर याला काय वाटेल आणि तसं केलं तर त्याला काय वाटेल. या आणि अशा अनेक गोष्टी..या सगळ्यात आपण स्वतःसाठी काय करतो? आपल्या स्वतःसाठीच आपल्याकडे वेळ नसतो. या जगात येताना आपण एकटेच तर श्वास घेत येतो आणि जगातून जातानासुद्धा. मग या दोहोंच्या मधले श्वास..ज्याला आपण आयुष्य म्हणतो, त्यातले काही श्वास केवळ आपल्यासाठी का ठेवत नाही? दुसऱ्यांसाठी, दुसऱ्याचं करताना आपण आपल्या मनालाच खुरटं करतोय याकडे आपलं दुर्लक्ष होतं. 
     त्या वृक्षाकडे पाहून या सगळ्याची जाणीव तिला होत होती आणि तिच्या प्रश्नांची उत्तरंही मिळत होती. त्या वृक्षासारखं स्वतःसाठी जगण्याचा आनंद घेत दुसऱ्यांनासुद्धा आनंदी करणं चांगलं की, फक्त दुसऱ्याचा विचार करत आपलं स्वतःसाठी जगणं नाकारणं चांगलं आणि एवढं करुन तो दुसरा आनंदी होईल याची काय खात्री..
    या दोन पर्यायातून तिनं तिचा पर्याय निवडला होता. आता तीसुद्धा नुसत्या या विचारानेच त्या वृक्षासारखीच टवटवीत, प्रफुल्लित दिसायला लागली होती.

जस्मिन जोगळेकर. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक