जरा गंमत 🙆🤭
नाही सीमा सतत येणाऱ्या तुझ्या आठवणीला
विरहाची तीव्र जाणीव होतेय माझ्या मनाला..
कोण जाणे..तू काय जादू केलीस माझ्यावर
उरला नाही माझाच काबू माझ्यावर..
दिवसेंदिवस तुझ्यात फारच गुंतत चालले मी
तुझ्या आठवणींशिवाय क्षणही काढू शकत नाही रे मी..
कधी जवळ घेशील मला कायमची
आतुरतेने वाट पहातेय त्या गोड क्षणाची...
काय सांगू आता..इतका जीव जडलाय त्याच्यावर की बस्...बरेच दिवस त्याची अन् माझी भेट झाली नाहीये. तळमळतेय अगदी त्याच्यासाठी..संध्याकाळ झाली की, त्याच्या आठवणीने कासावीस व्हायला होतं..आणि त्यात पावसाळी कुंद-धुंद हवा असली तर काही बोलायलाच नको..आता या वयातसुद्धा माझी ही अवस्था म्हणजे किती वेड लावलं असेल बघा त्यानं 😍...मी काय करु? काय करु म्हणजे मिळेल मला तो? कोणीतरी..काहीतरी सांगा ना मला..आता खरंच त्याच्या आठवणीने मन, जीव आणि काय काय असतं ते..पोट म्हणा हवं तर पेटून उठलंय..
होय...होय...मला आता तो हवाच आहे..माझ्या नवऱ्याला सांगणारच आहे की, आता त्याला माझ्याकडे घेऊनच ये म्हणून..
अहो, असे शंकेने काय बघताय माझ्याकडे? मी माझ्या लाडक्या वडा-पाव बद्दल बोलतेय हो..कित्ती दिवसात त्याचं दर्शनसुद्धा झालेलं नाहीये हो..😔
😛😛
****************
पाहता तुला दुरुनि
सूर झंकारले मनी
त्या सूरांनीच ही
बहरली प्रेमकहाणी
जीवा लागे तुझा ध्यास
स्वप्नी माझ्या तुझाच वास
विरघळावे मिठीत आता
मनी जागे हीच आस
स्पर्श तुझा हा उबदार
तप्त होती माझे अधर
आसुसलेल्या जीवास
शांत तू आता कर
तर मंडळी, हे ऐकून (वाचून) तुम्ही विचाराल..'आज हे काय बरं महाराजा?' हं..तर विचारा..
....आज हे काय बरं महाराजा?
हं...तर हे ऐकून (वाचून) तुम्हाला असं वाटतंय ना की, ही प्रेमात आकंठ बुडालेली एक नवयौवना तिची प्रेमभावना व्यक्त करतेय. असं वाटतंय ना? हो म्हणा बरं.
....हो महाराजा.
हं.. मंडळी, ती यौवना तिच्या प्रियकराच्या दर्शनासाठी, त्याच्या स्पर्शासाठी किती आसुसलेली आहे पहा बरं. जेव्हा तिला त्याचा स्पर्श होईल तेव्हाच शांत होईल. असं ती म्हणतेय. पण मंडळी..याचा सरळ सरळ अर्थ असा दिसत असला तरी तो तसा नाहीये. आता तुम्ही विचाराल.. असं कसं महाराजा? म याचा अर्थ कसा? विचारा बरं.
....असं कसं महाराजा? म याचा अर्थ कसा?
सांगतो सांगतो. हे बघा. वरवर पाहणाऱ्याला याचा अर्थ असा वरवरचाच दिसणार. खोलात जाऊन अभ्यास करणं खूप आवश्यक आहे ते यासाठीच. बरोबर की नाही? हो म्हणा बरं.
....हो महाराजा.
हं..तर हे ऐकून (वाचून) जर तुम्हाला असं वाटत असेल की, ही एक प्रेमकहाणी आहे. तर ते चुकीचं आहे. असं मी कसं म्हणेन बरं. ही एक प्रेमकहाणीच आहे. पण तिच्या दृष्टीने तो तिचा प्रियकर कोणी आपल्यासारख्या सोम्या गोम्या नाहीये. आता तुम्ही विचाराल.. म कोण आहे? विचारा बरं.
....म कोण आहे महाराजा?
हं..तर ती आहे एक आयतं मिळालं की खाणारी खाद्यप्रेमी. आणि अजूनही तिचं पहिलं प्रेम आहे..तोच तो वडा पाव. त्या वडापाव साठीच तिचा जीव एवढा आसुसला आहे हो मंडळी. त्याचा तो उबदार स्पर्श तिला हवा वाटतोय. तो मिळाला की ती शांत होणार हो. कळलं का मंडळी? हो म्हणा बरं.
....हो महाराजा.
हं..तर आजचे हे निरूपण आवडले का तुम्हाला? हो म्हणा बरं..😛
पिझ्झा आणा नाहीतर बर्गर आणा..ते खाणारच. पण #एकनिष्ठ वडापावशीच राहणार.
😛😛🤦🏼♀
***************
आज २३ ऑगस्टला जागतिक (🤔) वडापाव दिन असतो म्हणे. या दोन पोष्टी शिळ्या आहेत खरंतर, पण वडापाव प्रेम कायम ताजंच राहणार. 😍❤️😬
जस्मिन जोगळेकर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा