कथा ----- माझे जगणे होते गाणे

*कथा जागर उपक्रम* 
*कथाप्रकार :- open ended*
*शीर्षक:- माझे जगणे होते गाणे*
*लेखिका :- जस्मिन जोगळेकर*

छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन भास्कर गेला.
दिवसकार्य झाले. आलेली सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. फक्त मुलगा आणि सून राहिले होते.
गेले दोन तीन दिवस रेवती बघत होती की मुलगा आणि सून तिचीही बॅग भरत होते. तिच्या साड्या,भरतकाम विणकामाचं साहित्य, गाण्याच्या वह्या. स्पष्ट बोलणं झालं नसलं तरी मुलगा त्याच्या घरी घेऊन जात असणार असा रेवतीचा अंदाज होता.
 
एकदोनवेळाच पाहिलेलं त्याचं अलिशान घर तिच्या डोळ्यासमोर तरळून गेलं…
 "उद्या सकाळी लवकर आपण निघणार आहोत" रात्री झोपतांना मुलाने सांगितलं.
ती बरं म्हणाली.. पण मुलाची अलिशान कार जेव्हा मुंबईच्या बाहेर पडली तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण  मुलाच्या घरी चाललेलो नाही.
 कुठे चाललोय आपण ? तिने विचारलं
"कळेल" मुलाचं अल्पाक्षरी उत्तर...
गाडी आता कशेडी घाट उतरत होती. घाटातल्या वेड्यावाकड्या वळणांप्रमाणे तिच्या डोक्यातले विचारही वळत होते. अनिरुद्ध…तिचा अनि आपल्याला वृद्धाश्रमात ठेवणार नाही याची तिला पक्की खात्री होती. फक्त मुलावरच काय रेवतीचा तिच्या सूनेवर प्रियावरही विश्वास होता. मग आपल्यापासून लपवून ही दोघं आपल्याला कुठं घेऊन चालले आहेत हा प्रश्न मात्र वारंवार तिच्या मनात येत होता. पण याचं उत्तर ठिकाणावर पोहोचल्यावर मिळणार होतं. 

कशेडीचा घाट उतरून त्यांची गाडी महाडवरून बिरवाडी गावाकडे वळली. रस्त्यावरच्या पाट्या बघून आपण कुठं चाललो आहोत हे तर रेवतीला कळत होतं. पण का चाललोय हे मात्र…अखेर बिरवाडी गावाच्या जरासं बाहेर मोठं कंपाऊंड घातलेल्या आवाराबाहेर अनिने गाडी थांबवली, बाहेर उतरून तो अवघडलेलं अंग आळस देऊन मोकळं करू लागला. तोवर रेवतीही त्याच्या जवळ येऊन उभी राहिली. त्या मोठ्या आवारात मागे एक छोटंसं पण टुमदार घर बांधलेलं दिसत होतं. त्याच्या दुसऱ्या टोकाला साधसं पण पक्कं बांधकाम असलेलं आणखी एक घर दिसत होतं. बाकी सगळं आवार पूर्ण मोकळं. सध्या मोकळ्या असलेल्या त्या आवारात वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावण्याची तयारी मात्र चालू असलेली रेवतीला दिसली. तिला अजूनही कशाचा उलगडा होत नव्हता. तेवढ्यात तिथल्या घरातून एक माणूस पळत त्यांच्याकडेच येताना रेवतीला दिसला. तो जवळ आल्यावर नमस्कार चमत्कार झाले, त्याने गेट उघडल्यावर अनिने गाडी आत घातली आणि त्या टुमदार घरापाशी नेऊन लावली. तोवर धोंडीबा…तोच तो मगाशी पळत आलेला माणूस घराची किल्ली घेऊन आला. ती किल्ली अतिशय प्रेमाने आईच्या हातात देत अनि म्हणाला, "तुम्हाला दोघांना सरप्राइज द्यायचं ठरवलं होतं. कधी शहरातल्या गर्दीचा कंटाळा आला, निवांत रहावं वाटलं तर तुम्हाला इथं येऊन राहता येईल म्हणून खरंतर हे घर बांधून घेतलं होतं. इथं येऊन बाबांना खुश पाहण्याचं भाग्य मला मिळालं नाही. आवडेल तुला इथं रहायला?" 

घर आणि परिसर अनि म्हणत होता तसा शांत, सुंदर होता. पण इथं आपल्याला एकटीला ठेवायचा विचार अनि करतोय की काय अशी तिला शंका आली. तोवर अनिने एक पत्र काढून तिच्या हातात दिलं. पत्र देतानाचे अनि आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव रेवतीच्या नजरेतून सुटले नाहीत, त्याने ती अजूनच गोंधळात पडली. पण जसजशी ती ते पत्र वाचत गेली तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे खुशीचे भाव बघताना अनि आणि प्रियाला खूप आनंद वाटत होता. 

"अरे अनि, कधी आलंय हे पत्र? मला कसं माहीत नाही? तुझ्याकडे कसं आलं? किती दिवस आम्ही दोघं या पत्राची वाट बघत होतो माहितेय…" रेवतीचा तिच्या आनंदावर ताबा राहिला नव्हता. भास्करच्या आठवणीने तिचे मन पुन्हा कातर झाले. "अगं आई, बाबा गेले आणि चौथ्या दिवशी पोस्टमनने हे पत्र आणून दिलं होतं माझ्याकडे. आधी मला माफ कर, कारण तुला न विचारता ते फोडून मी वाचलं. पण त्यावरचा विद्यापीठाचा शिक्का बघितल्यावर मला राहवेना. मी ही वाट बघत होतोच की आणि बघ आपल्या मनासारखं झालं. म्हणून आम्ही दोघांनी लगेच तुला इथं आणायचा निर्णय घेतला. आता अगदी शांतपणे इथं राहून तू तुझा प्रबंध पूर्ण करू शकशील. तुला हव्या त्या सगळ्या सोयी करून मग आम्ही इथून निघू." 

अनि बोलत होता पण रेवतीचं लक्ष कुठं होतं त्याच्याकडे. तिचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी तिला मिळाली होती. त्याच स्वप्नात ती गुंतून गेली होती. मुळातच रेवती खूप हुशार, काही अडचणींमुळे लग्नाआधी ती जास्त शिकू शकली नव्हती. तिची हुशारी लक्षात आल्यावर भास्करनेच आग्रहाने तिला शिक्षण पुढं सुरू ठेवायला लावलं होतं. अनि मोठा होत होता आणि रेवती तिच्या शिक्षणाने मोठी होत होती. बायॉलोजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर भास्करला वाटायला लागलं लगे हाथ तिने पीएचडी देखील करावी. रेवतीलाही इच्छा होतीच. त्यामुळं त्यादृष्टीने दोघांनी मिळून तयारी सुरू केली आणि तिच्या विषयाला मान्यता मिळाल्याचं हे पत्र हाती आलं ते मात्र रेवतीच्या एकटीच्या हाती. शिक्षणाबरोबर तिला गाण्याची प्रचंड आवड होतीच, ती विशारदही झाली होतीच. त्यामुळं या दोन्हींची सांगड घालून तिने पीएचडी साठी विषय निवडला होता…"संगीताचा झाडांच्या वाढीवर होणारा परिणाम." अर्थात त्यासाठी जागेचा प्रश्न त्यांच्यापुढे होताच. पण आता अनिने सगळं काम सोप्पं करून टाकलं होतं. भास्कर गेल्यापासून रेवती आज पहिल्यांदा मूडमधे दिसत होती. 

आता रेवतीला पुढची कामं दिसायला लागली. तिने सांगितलेली सगळी झाडं अनिने जवळच्या नर्सरीतून आणली होती. झाडांच्या मधेमधे लावण्यासाठी छोटे स्पीकर्स, त्यासाठी लागणाऱ्या वायरी वगैरे तयारी त्याने  इलेक्ट्रिशियनकडून व्यवस्थित करून घेतली आणि मुख्य म्हणजे आईसाठी भरपूर साऱ्या गाण्याच्या सिडीज आणि एक नवा कोरा सुरेखसा तानपुरा. दोन्ही मुलांच्या या प्रेमाने रेवती भारावून गेली होती. तयार खड्डयापैकी एकात आईच्या हातून पहिले झाड लावून झाल्यावर मगच अनि, प्रिया मुंबईला परतले, ते ही कधीही, काहीही लागलं तर कळव आम्ही लगेच येऊ असं आईला सांगूनच. आवडत्या कामासाठी कुठेही एकटंही राहायची रेवतीची तयारी होती. सोबतीला कायम धोंडीबा आणि त्याची बायको सुमी होतीच की. त्या दोघांच्या मदतीनेच रेवतीने हळूहळू सगळी झाडं लावून घेतली… अगदी धोंडीबाच्या घरापासची जागाही मोकळी सोडली नाही तिने. कंपाऊंडच्या चारी बाजूने भिंतीला त्रास होणार नाही या अंतरावर तिने गुलमोहोर, बहावा, जॅकरांड्रा सारखी मोठी झाडं लावली. घरापाशी सोनचाफा लावला. त्यानंतर मोगरा, मदनबाण, कुंद लावून घेतले. प्राजक्त तर हवाच, तो ही एका बाजूला मिरवत उभा राहिला. एका बाजूला मिरच्या, टोमॅटो, वांगी, पालक वगैरे भाज्यांचे वाफे केले. अनिने सगळीकडे ड्रिपची सोय करून ठेवली होती. वेगवेगळी झाडं जरी तिने लावली असली तरी रेवतीला प्रयोग करायचे होते ते एकाच प्रकारच्या झाडावर. त्यासाठी तिने वेगळी जागा ठेवली होती. त्यातही त्यांचे तीन गट केले होते. एक जागा होती तिच्या अगदी घराजवळ, दुसरी थोडी लांब आणि तिसरी अगदी लांब धोंडीबाच्या घराजवळ. हळूहळू ही सगळी तयारी झाली आणि तिच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. 

रोज सकाळी रेवती लवकर उठायची. बाहेर व्हरांड्यात बसून तिचा गाण्याचा रियाज किमान दोन तास तरी चालायचा. त्यानंतर एखाद्या रागाची सीडी लावून ती झाडांची चौकशी करायला जायची. प्रत्येक झाडाचं निरीक्षण करत, त्यातले बदल टिपत ती पूर्ण बागेतून फिरायची. फिरताना हातात टीपणवही घेतल्याशिवाय बाहेर पडायची नाही. रोजच्या रोज वेळ, तारीख, वारासहित सगळं ती नोंद करून घरी आल्यावर ते व्यवस्थित कागदांवर उतरवून घ्यायची. रेवतीचे सगळे दिवस असेच मजेत, कामात चालले होते. आता ती इथे राहायला येऊन वर्ष होऊन गेलं होतं आणि तिचं कामही अगदी सुरळीत सुरू होतं. अधेमधे अनि आणि प्रिया येऊन जात होते, तर कधी रेवती मुंबईला जात होती. तिचे पीएचडीचे गाईड ही मुंबईचेच होते. त्यामुळं अधूनमधून त्यांना भेटून त्यांच्या मार्गदर्शनखाली तिचं काम सुरू होतं. 

आता तिचं काम अगदी शेवटच्या टप्प्यात आलं होतं. मध्यंतरी तिचे गाईड प्रत्यक्ष येऊन तिचं काम बघून, तिचं कौतुक करून गेले होते. तिच्या बागेत आता खूप फरक जाणवत होता. घरापाशी जी झाडं तिने लावली होती ती रेवतीला जास्त लवकर वाढलेली दिसली. त्यांच्या पानांचा आकारही इतरांपेक्षा मोठा होता. याचं कारण ती झाडं रेवतीचं गाणं ऐकत मोठी झाली होती. दुसऱ्या गटातल्या झाडांची वाढ पहिल्याच्या मानाने थोडी स्लो झाली होती. ती झाडंही गाणी ऐकत होतीच, पण त्यात रेवतीचा सूर मिसळत नव्हता. तिसऱ्या समूहातील झाडं मात्र निम्मी अधिक मरूनच गेली होती. तिथं खुरटी झाडं दिसणं तिला अपेक्षित होतं खरंतर. पण असं का झालं असेल ते एक दिवस तिच्या लक्षात आलं. धोंडीबाच्या घराजवळ तो गट होता. धोंडीबा कामाला तर ताठ होता. पण काम नसेल तेव्हा मात्र बायको बरोबर उगाच भांडण काढत बसायचा. त्यामुळे तिथला गट  इतर दोन गटांपेक्षा निराळा दिसत होता. रेवतीने तिचे निष्कर्ष लिहून काढले. आता सगळं काम आटोक्यात आलं होतं.

आणि तो दिवस उजाडला…. स्टेजवरून रेवतीचं नाव पुकारलं गेलं. टाळ्यांच्या कडकडाटात तिचं, तिच्या अभ्यासाचं, कष्टाचं, चिकाटीचं कौतुक होत होतं…आणि रेवतीचे गाल अखंड भिजत होते भास्करच्या आठवणींच्या अश्रूंनी. 

जस्मिन जोगळेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक