कथा ---शिंच्या

*कथा जागर उपक्रम*
*कथा प्रकार -- विनोदी कथा*
*शीर्षक - शिंच्या* 


    'नाद करायचा नाय' ग्रुप, तारकपूर या पाटीखाली बाकावर आम्ही पाच-सहाजण गप्पा मारत बसलो होतो. चौकातला हा बाक असा होता की, त्याला कधी मोकळेपणी श्वास पण घेता यायचा नाही. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कोणी ना कोणी यावर बसलेलं असायचंच. पहाटे फिरायला जाणारी मंडळी घरी परतताना यावर टेकायची, शाळेत जाणारी मुलं इथंच एकत्र भेटून शाळेत जायची, भरदुपारीही उद्योग नसणारी लोकं इथं टाईमपास करायची आणि संध्याकाळी तर बघायलाच नको. इथं एकदा भेट दिली की, गावातल्या-गावाबाहेरच्या सगळ्या महत्त्वाच्या बिनमहत्त्वाच्या बातम्या समजायच्या. त्यामुळे गावातला प्रत्येकजण या चौकाला एकदातरी भेट द्यायचाच. 
    त्यादिवशी आम्ही पाच-सहा जण असेच बसलो होतो. रविवारमुळे दुपार शांत होती. आमच्या इकडच्या-तिकडच्या गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात समोरुन कोणीतरी नवीन पाहुणा येताना दिसला. गुढघ्यापर्यंतची अर्धी चड्डी, टीशर्ट, पाठीवर सॅक, डोळ्याला गॉगल आणि गळ्यात कॅमेरा असा त्याचा पेहराव होता. एकंदरीत त्याचा अवतार बघता तो परदेशातला असावा असं आम्हाला वाटलं. पण आमचं गाव काय असं जगाच्या पाठीवरचं प्रेक्षणीय स्थळ नव्हतं. त्यामुळे हा परदेशी इथं कशाला कडमडायला येईल असं वाटलं. आम्ही आपली त्याच्याबद्दल चर्चा करत होतो तोवर तो आमच्याजवळ आलाच. डोळ्यावरचा गॉगल काढून तो आमच्याशी इंग्लिशमधे बोलायला लागला. त्यानं गॉगल काढला आणि आमचा अंदाज बरोबर ठरला. तो मिचमिच्या डोळ्याचा, चपट्या नाकाचा चिनी किंवा जपानी माणूस होता. तो आमच्याबरोबर इंग्लिश बोलायला लागल्यावर आमची तंतरलीच की हो...पण आमच्यातला त्यातल्यात्यात शिकलेला म्हणजे बारावी नापास गण्या शायनिंग मारायला त्याच्याशी बोलायला लागला. पण त्याचं ते यास फ्यास इंग्रजी गण्याला तरी कुठलं कळणार. आता माघार तरी कशी घ्यायची ना. परदेशी बोलला की, आमचा गण्या आपला माहित असलेले इंग्रजी शब्द इज, वॉज घालून फेकायचा. परदेश्याला जरा अंदाज आल्यावर मग तो नुसतं हॉटेल म्हणाला. मग गण्यालाच काय आम्हालासुद्धा चांगलंच कळलं की तो हॉटेल शोधतोय. तेव्हा आमच्या गावात नुकतंच एक हॉटेल सुरु झालं होतं. आता गण्या त्याचा पत्ता कसा सांगणार याकडं आमचं लक्ष लागून राहिलं. 'गो स्ट्रेट, देन तिथं एक गार्डन, मग टेक लेफ्ट' असं त्याचं सांगणं. त्यातसुद्धा लेफ्ट आणि राईटमधे तो इतका गोंधळ घालत होता की बस. प्रत्येकवेळी सांगताना तो आधी जेवायचा हात की धुवायचा हात ते बघायचा आणि मग बरोब्बर उलटं सांगायचा. त्यामुळे गोंधळ वाढत होता. तो परदेशी आपल्या बावळटच असलेल्या चेहऱ्याने बघत होता. शेवटी मी गण्याला सुचवलं की, असं सांगण्यापेक्षा त्याला पोचवूनच ये  तिकडं. गण्याला पण ती आयडियेची कल्पना आवडली आणि दोघांची वरात हॉटेलच्या दिशेनं निघाली. 
    गावाच्या थोडं बाहेर गावातल्याच बबन्यानं हॉटेल काढलं होतं. तारकपूर मधलं हॉटेल म्हणून त्याचं नाव स्टार हॉटेल. आमचा बबन्या तसा लहानपणापासूनच हुशार. राहण्या-खाण्याची सोय असलेलं छान ए.सी. हॉटेल काढायचं असं त्यानं कधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे १२वी नंतर शहरात जाऊन, त्यातलं शिकून त्यानं माया गोळा केली आणि मग गावात येऊन मस्त हॉटेल काढलं होतं. आता एवढं पॉश हॉटेल काढल्यावर त्याला बबन्या म्हटलेलं आवडेनासं झालं. मग तो स्वतःला बॉब म्हणवून घेऊ लागला. पण गावातली लोकं काय विचारता.. सुटाबुटात असला तरी त्याला बबन्याच म्हणायची. 
   अशा बबन्याच्या ताब्यात त्या पाहुण्याला देऊन गण्या परत बाकाकडं आला. आल्याबरोबर पाहुण्याबरोबरच्या चर्चेबद्दल बाता मारु लागला. तो चीनहून आला असून त्याचं नाव शिन चू चँग यो असं काहीतरी आहे असं आम्हाला कळलं. आता एवढं मोठं नाव कोण लक्षात ठेवणार? आणि सरळ नावानं हाक मारणं इथं कोणाच्या बापाला जमतंय. त्यामुळे गणेशचं गण्या, प्रकाशचं पक्या होतं तसंच या पाहुण्याचं नाव आम्ही 'शिंच्या' करुन टाकलं. आणि काय सांगू.. तो पाहुणा एवढा जवळचा वाटू लागला की बस.
     तो रविवार असाच पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाहेरचा गलका ऐकून जाग आली. काय झालं म्हणून बघितलं तर शिंच्याच्या मागं गावातली बारकी पोरं गलका करत चालली होती. त्या पोरांशी तो खाणाखुणांनी बोलत होता. पण कोणाचं कोणाला काही कळत नव्हतं. असा मिचमिच्या परदेशी या शेंबड्या पोरांनी पहिल्यांदाच पाहिला होता. त्यामुळे गम्मत वाटून ती त्याच्यामागे जात होती. शेवटी आमचा गण्या तिथं उगवला आणि त्यानं त्या पोरांना पिटाळून लावलं. पोरांबरोबरच्या खाणाखुणांची भाषा आता गण्याबरोबर सुरु झाली. थोडावेळ गोंधळात गेल्यावर मग दोघांचं एकदम जमलंच. एवढं जमलं की गण्या बाकाकडं फिरकलाही नाही. दोघं कधी एकटे-एकटे दिसलेच नाहीत. कायम बरोबरच. मग आम्ही त्यांना लेंगा-झब्बा असंच नाव ठेऊन दिलं. झब्ब्याला लेंग्यावाचून करमंना आणि लेंग्याचं झब्ब्यावाचून जमंना. 
       एकदा फारच झाल्यावर आम्ही लेंग्याला ओढून आपलं...गण्याला ओढून बाकावर घेऊन आलो. नाराजीनंच आला तो थोडावेळ. त्याच्याकडून मग कळलं त्या शिंच्याबद्दल. तो इथं महिनाभर राहायला आला होता. आंबे एक्स्पोर्ट करणाऱ्या एका कंपनीत कामाला होता. सगळीकडच्या बागा बघून त्यातल्या चांगल्या बागा एक्स्पोर्टसाठी निवडणार होता. म्हणून रोज सकाळी शिंच्या बाहेर पडायचा आणि आमचा गण्या त्याला त्या बागा फिरवायचा. 
   पण तो शिंच्या म्हणजे एकदम पाद्र काम होतं. एक बाग बघायला म्हणून बाहेर पडायचा. पण डोंगरावरचे चढ उतार आणि तापणारं ऊन यानं जाम हैराण होऊन जायचा. मग कुठलं काम अन् काय..जेमतेम अर्धी बाग झाली की गण्याला म्हणायचा, 'मी आपला आता हॉटेलवर परत जातो आणि ए.सी.त मस्तपैकी विश्रांती घेतो. उरलेली बाग उद्या पूर्ण करु.' त्याच्या स्पीडनं महिनाच काय दोन महिने काम सुरु राहणार असं आम्हाला वाटलं. इथं कोणाला गडबड होती. तो जास्त राहिला तर बबन्याची चांदी होती आणि शिंच्याच्या बापाचं तरी काय जात होतं. खर्च कंपनीच देणार होती. थोड्यावेळानं गण्या सटकला आणि आम्ही आपलं शिंच्याच्या बापाचं नाव काय असेल याची चर्चा करत बसलो.
    अशा तऱ्हेनं दिवस मावळतीकडं झुकल्यावर शिंच्याचा उद्योग काय? तर गण्याबरोबर गावाच्या परिसरात भटकायचं. गावातले लोक, त्यांचे वेष, भातशेती हे सगळं त्याला आवडलं होतं. हिंडताना तो या सगळ्यांबरोबर सारखे फोटो काढायचा. बघावं तेव्हा शिंच्या आपला फोटो काढताना दिसायचा. भातशेतातली बुजगावणी तर त्याला एवढी आवडली होती की बस. बहुतेक सगळ्या शेतातल्या सगळ्या बुजगावण्यांबरोबर त्यानं सेल्फी काढला असेल. हा सेल्फी प्रकार एवढा डोक्यात बसला होता की, एकदा तर मी एका शेताजवळून जात असताना बुजगावणंच सेल्फी काढतंय असा भास झाला. तरी बरं शिंच्या सकाळी लवकर बाहेर हिंडत नव्हता. नाहीतर आणि कशा कशाबरोबर सेल्फी काढले असते त्यानं अशी धास्ती आम्हाला वाटून गेली.
    असेच दिवस पळत होते. गण्या आणि शिंच्याचं रोजचं वेळापत्रक आता ठरुन गेलं होतं. सकाळी बागांमध्ये फिरायचं, दुपारी विश्रांती, रिपोर्ट लिखाण आणि संध्याकाळी गावात भटकंती. हल्ली हल्ली तर तो गण्याच्या मागे लागून आमच्या बाकावर पण येऊ लागला होता. आता शिंच्या गावासाठी पाहुणा राहिला नव्हता. आम्ही ठेवलेलं त्याचं नाव सगळ्यांनाच आपलंस वाटल्यामुळे सगळे त्याला त्याच नावानं हाक मारत होते. त्यालासुद्धा ते छोटसं नाव अर्थ माहित नसल्यामुळे आवडलं होतं. एकदा असंच नावावरुन विषय निघाल्यावर शिंच्यासारखीच छोटी छोटी छान नावं सांगा म्हणून मागे लागला. आता बाकावर बसणारी पोरं कधी सरळ असतात का.. भ, भा, भो च्या सगळ्या शिव्या त्यांनी शिंच्याला नावं आहेत म्हणून सांगितल्या. त्याला पण ती नावं एवढी आवडली की, तो हॉटेलवर परत जाताना ती लक्षात राहावीत म्हणून मोठमोठ्याने घोकत गेला. गावातल्या लोकांनी काय झालं असेल ते ओळखलं आणि त्याची मजा बघत बसले.
    आता शिंच्या गावात छानच रुळला होता. गाववाल्यांनीही त्याला हवी ती सगळी मदत केली होती. बबन्यानं तर त्याची छानच बडदास्त ठेवली होती. तीसुद्धा अगदी वाजवी दरात. रोजचे कार्यक्रम शिंच्या नीट ठरल्याप्रमाणे पार पाडत होता. आणि अशातच एक दिवस गण्यानं सांगितलं की आता दोन दिवसात शिंच्याचं काम संपणार आहे. मग तो परत जाईल. इतक्या दिवसांची आमची छान मैत्री झाली होती त्यामुळे तो जाणार म्हटल्यावर वाईट वाटलं. पण आता तो जाणार कळल्यावर त्याला सेंड ऑफ द्यायचं आम्ही ठरवू लागलो. बाक ही त्याची पण खुप आवडती जागा झाली होती त्यामुळे कार्यक्रम बाकावरच करायचा ठरवला.
      तो जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही बाकावर पार्टी ठरवली. बाकावर नेहमी असणारे मेंबर्स आणि गावकरी यांना आमंत्रणं गेली. सगळ्यांकडून थोडी थोडी वर्गणी घेऊन वडा पाव आणि शिऱ्याचा बेत केला. इथं आल्यापासून शिंच्याला या पदार्थांची चटकच लागली होती. म्हणून त्याच्या आवडीचे हे दोन पदार्थ ठरवले. सगळ्या बेताला गावकरीही मोठ्या खुशीनं तयार झाले. जय्यत तयारी झाली आणि कार्यक्रमाची वेळ झाली. बाकाजवळ सगळे जमले होतेच. गण्या जाऊन शिंच्याला घेऊन आला. सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं जोरदार स्वागत केलं. एका जेष्ठ काकांनी शिंच्याला हार घातला, शाल देऊन त्याचा सन्मान केला. एवढी लोकं आणि असा सत्कार पाहून शिंच्या भारावूनच गेला. नंतर बबन्या आणि बागांचे काही मालक यांची भाषणं झाली. ती मराठीतली भाषणं गण्या त्याला त्यांच्या नेहमीच्या भाषेत सांगत होता. मग सगळ्यांनी गण्याला बोलायचा आग्रह केला. आता शाळेत भाषण करणारा गण्या आम्हाला माहित होताच की. स्टेजवर उभं राहून समोरचे श्रोते पाहिले की तो घाबरुन घट्ट.. पण आता या जवळच्या मित्राविषयी बोलायला अगदी अत्र्यांसारखा फर्डा वक्ता असल्याच्या थाटात उभा राहिला. इंग्रजी पेरत त्यानं जोरदार भाषण केलं. शिंच्याबरोबर राहून गण्याचं इंग्रजी मात्र थोडं सुधारलं होतं. नंतर या सगळ्या कौतुक सोहळ्यामुळे सद्गदित होऊन शिंच्या भाषण करायला उभा राहिला. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन दिलं खरं, पण आता तो काय बोलणार हे कोणाच्या बापाला कळणार... असं प्रत्येकजण मनात म्हटला असणार. पण शिंच्या पुढं आला आणि त्यानं सुरुवातच भो××× अशी केल्यावर सगळ्यांनी जो 'आ' वासला तो त्याचं भाषण संपेपर्यंत तसाच. शिंच्या चक्क अस्खलित मराठीत भाषण करायला लागला की हो. तो भाषणात सगळ्यांबद्दल खुप छान बोलला. पण इथं भाषणाकडं लक्ष कोणाचं होतं. प्रत्येकजण आपलं महिनाभरात आपण शिंच्यासमोर काय काय बोललो हे आठवण्यात दंग. पण शिंच्यानं सगळ्यांना माफ केलं होतं ते सगळ्यांनी त्याच्यावर केलेल्या प्रेमामुळं. त्याचं मराठीत बोलणं ऐकून तर आता तो खुपच जवळचा झाला. बाकावरच्या मित्रांनी त्याला आठवण म्हणून बुजगावण्याची छोटी प्रतिकृती दिली. एकंदरीत या सगळ्या बेतावर खुश होऊन आनंदी मनानं शिंच्या परत गेला.
    नंतर बाकावर बसलं की, रोज त्याची आठवण निघायचीच. त्याला आमची ही बाक संस्कृती एवढी आवडली होती की, त्यानं त्याच्या गावात पण हीच संस्कृती रुजवली असेल असं समजून आम्ही आपलं त्यानं त्याच्या बाकाला काय नाव दिलं असेल असा विचार करत बसायचो.

जस्मिन जोगळेकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक