कथा -- कुछ तो लोग कहेंगे
विषय – शीर्षकावरून कथा लेखन
शीर्षक – कुछ तो लोग कहेंगे
अक्षय इरावतीचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघेही उच्चशिक्षित होते, दोघांनाही मोठ्या कंपनीत नोकरी होती. अर्थातच त्यांच्या लग्नाला घरातून विरोध असण्याचं काही कारणच नव्हतं. त्यामुळं एक छानसा मुहूर्त बघून दोघांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात साजरं झालं. लग्नाची धावपळ, वर्षभराचे सण समारंभ सगळं इरावती नोकरी सांभाळून एन्जॉय करत होती.
करियरच्यादृष्टीने अक्षय आणि इरावतीने काही प्लॅन्स आधीच करून ठेवले होते. योग्य वयात बाळासाठी प्रयत्न करायचे हा त्यातला अग्रक्रमी असणारा एक मुद्दा होता. त्यांनी ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यातच एक दिवस बाळाची चाहूल लागली आणि सगळेच अतिशय खुश झाले. अक्षयच्या घरी त्याच्या धाकट्या भावानंतर इतक्या वर्षांनी येणारं हेच बाळ होतं. त्यामुळं त्याची आई इरावतीच्या कौतुकात बुडून गेली होती. अक्षय आणि त्याच्या घरच्यांना तर नऊ महिने नऊ दिवस वाट बघणंसुद्धा जड जायला लागलं होतं. सगळ्यांच्या कौतुकात न्हाऊन जाताना इरावतीला भविष्यातले सुखस्वप्न दिसत होते. तिच्या बाळाचे होणारे लाड, त्याची घेतली जाणारी काळजी…आपल्याला पुढची काही चिंता नाही हे तिला समजून चुकलं, त्यामुळं ती एकदम आनंदात होती. असेच दिवस सरले आणि इरावतीने एका गोड, गुटगुटीत मुलाला जन्म दिला. बाळ हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तर वेळ, काळ कशाचा पत्ता न लागता दिवस अजूनच जोरात सरायला लागले. अक्षय आणि इरावतीच्या आवडीचं 'हर्षित' नाव बाळाला दिलं गेलं. नोकरी करत, सासूबाईंच्या मदतीने हर्षितला सांभाळताना दोन वर्ष कधी सरून गेली इरावतीला कळलंच नाही.
त्यादिवशी काही कारणाने इरावतीने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. हर्षितच्या खाण्याची वेळ झाली म्हणून ती त्याला हाक मारत होती. हॉलमध्येच तर बसला होता, ओ का देत नाहीये म्हणून इरावती बघायला बाहेर गेली तर हर्षित त्याच जागी खेळत बसला होता. त्याच्या शेजारी जाऊन इरावती हाक मारत होती तरी हर्षितला समजलं नव्हतं. खेळात एवढं कसं ते गुंग व्हायचं म्हणत इरावतीने त्याला हाताने हलवल्यावर मग राजे तंद्रीतून जागे झाले. तसंही इतर मुलांसारखा हर्षित अजूनही नीट चालायला लागला नव्हता. इतरांशी तुलना केली तर त्याची प्रत्येक गोष्ट म्हणजे पालथं पडणं, पुढं सरकणं, उभं राहणं उशिराच सुरू झालं होतं. त्याचं बोलणंही एखाददुसऱ्या शब्दापुरतं मर्यादित होतं अजून. त्याबद्दल काही बोलणं झालं तर, असते एकेकाची वाढ उशिरा अशी इरावतीच्या सासूबाई तिची समजूत घालायच्या. मोठा होईल तसा सुधारेल असं वाटून इरावतीही ही गोष्ट डोक्यातून काढून टाकायची. पण मोठा होईल तसं सुधारायच्याऐवजी हर्षित हळूहळू बिघडायलाच लागला. तो तीन वर्षाचा होऊन गेल्यावरही समोर कोणी बोललं तरी त्याला रिस्पॉन्स द्यायचा नाही. त्याला काही विचारलं तर उत्तर देण्याऐवजी तेच वाक्य परत बोलायचा. सुरुवातीला याचं प्रमाण कमी होतं, पण नंतर ते वाढत चाललंय लक्षात आल्यावर अक्षय आणि इरावती त्याला घेऊन डॉक्टरकडे गेले. इरावतीला प्रचंड टेन्शन आलं होतं. हर्षितची ही लक्षणं पाहता तिला मनातून भीतीही वाटत होती. शेवटी तेच झालं ज्याची तिला भीती वाटत होती. निदान झाले…ऑटिझम.
डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि इथूनच सुरुवात झाली एका नव्या प्रवासाला. आता डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हर्षितला कसं सांभाळायला हवं याचा अभ्यास इरावतीने सुरू केला. ऑटिझमबद्दल जितकी माहिती मिळेल तितकी ती घेऊ लागली. त्याचा योग्य सांभाळ व्हावा म्हणून तिने घरच्यांचा विरोध पत्करून नोकरी सोडली. हातातली चांगली नोकरी सोडताना अर्थातच तिला खूप वाईट वाटले, पण नोकरीपेक्षा तिला मुलगा आणि त्याचं भविष्य जास्त महत्त्वाचं होतं. पुढं हर्षितचा आजार जसा वाढत गेला तसं वेळीच नोकरी सोडली याचं तिला बरं वाटलं. कारण पूर्वी हर्षितचं कौतुक करणाऱ्या तिच्या सासूबाई त्याचा हा आजार वाढत गेल्यावर दुसऱ्या सुनेच्या बाळंतपणाचे निमित्ताने ज्या तिच्या घरी गेल्या त्या परत इकडे आल्याच नाहीत. त्यांचा हेतू लक्षात आल्यावर अक्षय इरावतीने त्यांना बोलवायचं सोडून दिलं. आता घरातलं बघून हर्षितला सांभाळायचं काम इरावतीच्या एकटीच्या अंगावर पडलं. तसं सासूबाई तिकडे गेल्यावर अक्षय घरी असेल तेव्हा तिला मदत करायचा. पण हल्ली त्याच्यावर ऑफिसमधला कामाचा लोड वाढला होता. त्यात घरी हर्षितचं वागणं आणि इरावतीकडून दिवसभराचा पाढा वाचून दाखवणं यामुळं अलिकडे अक्षय चिडचिडा झाला होता. अक्षयच्या या वागण्यामागचं कारण न कळण्याइतकी इरावती काही दुधखुळी नव्हती. हर्षितच्या ऑटिझमवरून अक्षयला दुखावणारे बरेच जंतू त्याच्या आजूबाजूला होते. असा आजार असलेला मुलगा आपल्याला आहे याची आता लाज वाटण्याएवढी अक्षयची मजल गेली होती. लोक काय म्हणतील या भीतीने हल्ली अक्षय आपल्याच जिवाभावाच्या दोघांना टाळत होता आणि इरावतीला हे कळत होतं. सकाळी हर्षित उठायच्या आधी इरावती अक्षयचा डबा, नाश्ता बनवून टेबलवर ठेऊन द्यायची आणि अक्षय घरात असेपर्यंत इरावती हर्षितला घेऊन खोलीत बसायची. संध्याकाळीही अक्षय यायच्या वेळी हर्षितला घेऊन ती खाली पार्किंगमधे जायची. तेवढीच दोघांनाही मोकळी हवा हवी म्हणून. पण तिथलं वावरणं तरी इरावतीसाठी कुठं सुखाचं होतं! ज्यांना पूर्वी ती जिवलग मैत्रिणी समजायची त्याच आता हर्षितबरोबर तिला पाहून नाक मुरडायच्या. खेळायला येणाऱ्या मुलांसाठी तर हर्षित म्हणजे विदूषकच झाला होता. त्याचं तोंड वेडवाकडं करणं, मधूनच डोळे फिरवणं, एकच गोष्ट परत परत बोलणं यावर ती मुलं खूप हसायची आणि त्यापेक्षा इरावतीला जास्त वाईट या गोष्टीचं वाटायचं की त्यांच्या आया मुलांना न ओरडता आपणही हळूहळू हसायच्या. पोटच्या गोळ्याची अशी चेष्टा केलेली कोणाला आवडेल हो. पण जर घरातलीच मंडळी साथ देत नसतील तर बाहेरच्यांना तरी काय बोलणार.
अशा सगळ्या परिस्थितीत आता इरावतीचे दिवस कासवाच्या पावलाने पुढे सरकत होते. सगळीकडूनच तिचा कोंडमारा होत होता. तिला समजून घेणारं, ज्याच्यापाशी ती मोकळी होईल असं कोणीही तिच्या आसपास नव्हतं. तिच्या आईबाबांची अशा वेळी तिला तीव्रतेने आठवण येई. पण उपयोग काय…ते तर तिच्या लग्नानंतर काही महिन्यातच एका मोठ्या अपघातात गेले होते. हर्षितशी ती खूप बोलायची. पण तिच्या भावना समजून घेण्याची त्याची तरी कुठं परिस्थिती होती. ते लक्षात आल्यावर इरावती अजूनच दुःखी व्हायची. आपल्या नंतर आपल्या बाळाचं काय होणार या विचाराने ती खचून जायची. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे आता इरावतीने हर्षित आणि तिच्याभोवती एक सीमा आखून घेतली होती. त्याबाहेर ती कधी पडायची नाही आणि त्या सीमेच्या आत यायला तर कोणी…..
पण अशा लोकांच्या गर्दीत एक सुहृद व्यक्ती मात्र होती, जिचा इरावतीला आधार वाटायचा. त्या म्हणजे हर्षितच्या डॉक्टर काकू. इरावती हर्षितला घेऊन त्यांच्याकडे गेली की त्या तिची खूप समजूत घालायच्या. या तपासणीच्या वेळी त्यांना इरावती मनाने खूप खंगलेली दिसली. एकतर आता हर्षित मोठा झाला होता. त्याला सांभाळणं तिला खरोखर अवघड होत होतं. त्यात आपल्या नंतर याचं काय होणार हा पोखरणारा प्रश्न. डॉक्टर काकूंकडे गेल्यावर यावेळी इरावतीचा बांध फुटला. त्यांच्यासमोर ती प्रचंड रडली. शेवटी डॉक्टरनी त्यांच्या बाकीच्या सगळ्या अपॉइंटमेंट रद्द केल्या आणि तिला मोकळी होऊ देऊन समजावत राहिल्या. "अगं इरा, भविष्याचा विचार करून तू तुझा आणि हर्षितचा वर्तमान का नासवते आहेस? तुला एकटीलाच यातून जायचं आहे हे आता एकदा कळलं आहे ना तुला. मग त्यासाठी खंबीर मनाने सिद्ध हो ना. पूर्वीची धाडसी इरावती आठव आणि तिला जागं कर. लोक काय बोलतात त्यावरून तू तुझे निर्णय बदलू नकोस. तुला ती लाटांना अडवणारी किनाऱ्यावरची मर्यादवेल आवडते ना. पण कळतंय का तुला…तू तीच तुमच्या दोघांभोवती वाढवून ठेवली आहेस. कशाला हव्यात या मर्यादा? बाहेर पडून बघ यातून. असं खुरटून घेऊ नकोस स्वतःला." डॉक्टर खूप समजावत राहिल्या आणि इरावती ऐकत राहिली. घरी परत येतानाही रिक्षात इरावती अस्वस्थच होती. तेवढ्यात रिक्षात लागलेलं गाणं तिच्या कानावर पडलं… 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना..' आणि तिचे डोळे लकाकले. डॉक्टर म्हणताहेत तसं खरंच आपणच आपल्याभोवती वाढवलेली ही मर्यादवेल उपटून टाकली तर? लोक काय काहीही केलं तरी बोलणारच. पूर्वीच्या इरावतीला आता उठवायला हवंच असं तिला प्रकर्षानं वाटू लागलं आणि ती त्यादृष्टीने विचार करू लागली.
त्यादिवशी घरी आल्यावर मात्र इरावती आणि अक्षयचं हर्षित वरूनच जोरात भांडण झालं. हल्ली त्यांच्या भांडणाचा विषय तोच तर झाला होता. अक्षयचं म्हणणं होतं हर्षितला ऑटिझम झालेल्या मुलांना सांभाळणाऱ्या आश्रमात ठेवावं आणि इरावतीला ते अजिबातच पसंत नव्हतं. त्यांचं हे भांडण शेवटी इतक्या विकोपाला गेलं की, इरावती त्याला म्हणाली आम्ही दोघं तुला नको झालो असलो तर सोडून दे आम्हाला किंवा विष तरी घाल दोघांना. इतक्या टोकाचा विचार करणारी इरावती नव्हती खरंतर.
एवढं भांडण होऊनही फक्त लोक काय म्हणतील या भीतीने अक्षयने त्यांना सोडलं नाही आणि लोक काय म्हणतील ते म्हणू देत, त्यांच्या बोलण्यावर मी आमचं दोघांचं आयुष्य का वाया घालवू असा विचार करून आता मी माझ्या बाळाला सोबत घेऊनच उंच भरारी मारणार या स्वतःच्या निर्णयावर इरावतीही ठाम राहिली. बाकी सगळ्यात हर्षितची प्रगती कमी असली तरी त्याची सुरांची जाण मात्र जबरदस्त होती आणि त्यावरच लक्ष केंद्रित करायचे इरावतीने ठरवले. हर्षितला गायक म्हणून तयार करताना आता तिला शारीरिक आणि मानसिक कितीही कष्ट पडत असले तरी पूर्वीची खंबीर इरावती तिच्या पाठीशी कायम उभी होती. हे आव्हान तिने स्वीकारलं आणि समर्थपणे पेललं देखील. जशी हर एक सुबह की शाम होती है तशी प्रत्येक रात्रीची एक पहाटही असतेच की. तीच प्रसन्न पहाट आता इरावती आणि हर्षितच्या आयुष्यात उगवू पहात होती.
जस्मिन जोगळेकर.
कथा जागर उपक्रम
१९/०९/२०२३
अत्युत्तम, छान!
उत्तर द्याहटवामन:पूर्वक धन्यवाद 🙏
हटवा