तू खरंच आहेस का?

तू खरंच आहेस का?

विश्वास.. किती महत्त्वाची गोष्ट!
आणि ताकदवानही..
या विश्वासावरच तर जग चालायचं
निदान पूर्वी तरी. 
असतीलही काही थोडेफार
तेव्हा घात करणारे..
पण तेवढ्याने तडा जात नव्हता...
तुझ्या अस्तित्त्वाला.
गुण्यागोविंदाने चालायचं जग तेव्हा..
एकमेकांवर विश्वास ठेवून.
आणि आता??
काय चाललंय कळतच नाही.
पण जगरहाटी बदललेय नक्की.
सगळं सगळं वेगळं झालंय..
पूर्वी डोळे मिटून ठेवली जाणारी गोष्ट,
आता..प्रश्न निर्माण करते
प्रथम मनात..
विश्वास ठेवावा की नाही?
पूर्वी घात करणारे असतील,
हाताच्या बोटाएवढे...
आणि आता? 
न बोललेलंच बरं.
त्या ताकदवान गोष्टीच्या शक्तीची
शंका येते आता मनात.
'तू खरंच आहेस का रे?' अजूनही.

मग कधीतरी येतात अनुभव असेही..
जे जातात मस्त सुखावून.
मग मात्र ती चुकचुकणारी पाल,
काढून टाकावी वाटते मनातून.
'तू खरंच आहेस का?' 
या प्रश्नाऐवजी...
'तू खरंच आहेस की' अजूनही...
खात्री वाटते अशी.

किती विश्वास आहे ना...
त्या एका वेलांटीतसुद्धा!

जस्मिन जोगळेकर 

पूर्वी एका ग्रुप मध्ये 'तू खरंच आहेस का?' ही ओळ दिली होती. त्यावरून कविता लिहायचा उपक्रम होता. त्यातली ही कविता. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक