याला जीवन ऐसे नाव
याला जीवन ऐसे नाव..
पाणी... नुसतं पाणी असं म्हटलं तरी डोळ्यापुढं पाण्याची वेगवेगळी किती रुपं त्या प्रवाहासारखीच झर्रकन् सरकून जातात न. कधी शांत जलाशय ध्यानमग्न साधू सारखा भासतो आणि मन शांतावतं, उंच डोंगरकड्यावरून झेपावणारं पाणी कधी बिनधास्तपणाची जाणीव करुन देतं, छोट्या छोट्या दगड-गोट्यातून वाहणारं पाणी दिसताच एखाद्या अवखळ बाळाची आठवण मनाला गुदगुल्या करुन जाते, शांत, विशाल सागर बघून कधी एकदम कोषात गुरफटून घ्यावं वाटतं. तर तोच खवळलेला समुद्र कुठंतरी पोटात गोळा आणून जातो. कोसळणाऱ्या सरी बघून लग्गेच मनात आठवणींच्या सरी बरसायला लागतात. पाणी तेच...पण त्याची रुपं मात्र अगदी वेगवेगळ्या मूडमध्ये घेऊन जाणारी..
पाण्याची ही सगळीच रुपं मला आवडून जातात. फक्त लांबून बघायला..त्या पाण्यात मी अगदी मिसळून जाते पण.. काठावरून. भिजायला मला कधी आवडलं नाही. पाण्याजवळ गेल्यावर दंगा, आरडाओरडा करणं ही कल्पनाही आता मला करवत नाही. ते पाणी शांत असो अथवा कितीही खळाळणारं.. मी एकदम शांत, फक्त माझी होऊन जाते पटकन.
आता जे आपुलकीचं झालंय त्याच पाण्याची लहानपणी मात्र फार भीती वाटायची. आठवड्यातून एकदा तरी समुद्रावर चक्कर असायची. पण तेव्हा मीच एक लक्ष्मणरेषा ओढून ठेवायचे. समुद्रापासून लांब कोरड्या वाळूत उभी रहायचे जिथून ती लाट विरुन गेलेली ओली कड सुद्धा दिसणार नाही. कोणी पाण्यात गेलं तरी इकडून माझा दंगा सुरू व्हायचा. येणारी प्रत्येक लाट आपला जबडा वासूनच पुढं येतेय असा मॅड विचार डोक्यात यायचा. समजा ३० मि. किनाऱ्यावर असले तर त्यातली सव्वा एकोणतीस मि. माझा दंगा सुरू असायचा. उरलेली मिनिटं इतरांचं सामान, चपला राखताना लक्ष विचलित व्हायचं. पण पुढं कन्याकुमारीला गेलो तेव्हा एकदमच माझ्यात बदल झाला आणि तिथं पाण्याच्या प्रेमात पडले ती कायमचीच.
आता नदीचा विचार जरी मनात आला तरी पटकन आठवते ती नर्मदा. खरंतर फक्त एकदाच मी तिच्यावरुन मी ट्रेनने प्रवास केलाय. किती ते कमी वेळाचं तिचं दर्शन..पण काय माहित..मनात इतकी खोल जाऊन बसलेय ती की बस..जसं एखाद्या व्यक्तीशी आपले जिव्हाळ्याचे संबंध बनू शकतात, तसं हिच्या बाबतीत झालंय. एकदम इतकी जवळची झालेय की, कधी कधी तिच्या आठवाने डोळ्याच्या कडा ओलावतात. तिच्या काठावरच्या एखाद्या दगडावर शांत बसून तिचं आणि आजूबाजूचं रुप न्याहाळावं असं फार वाटतं.
समुद्राचं ते भव्यदिव्य रुपं तर कितीही साठवून ठेवलं तरी अपुरचं पडतं. काही केल्या समाधान होत नाही. त्यातही सकाळचा समुद्र वेगळा, अस्ताला दिसणारा वेगळा आणि पौर्णिमेचा तर काय भन्नाटच. आकाशातली चमचम पहावी की पाण्यातली..अशा द्विधेत पकडणारा..
किनाऱ्यावर जाताना कायम मनात येतं हं की..तिथं शांतपणे आपल्याला काहीतरी नक्की लिहिता येईल. पण तिथं पोहोचल्यावर मात्र.. सगळं सगळं कोरं होऊन जातं. काही सुचणं तर दूरच, पण आपलं असणंही विसरुन जातं. परतताना इतकं काही भरुन घेतलेलं असतं की, लिहिता न आल्याचं रितेपण उरतच नाही आणि तिथं जे भरलं गेलेलं असतं ते बाकी कोणासाठी नाही फक्त माझं माझ्यासाठी असतं.
या पाण्याचं वागणं आवडतं मला. ते जिथून वाहत असेल तिथलं रंग-रुप धारण करतं. झाडीतून वहात असेल तर तिचा हिरवा रंग घेईल, किंवा विस्तीर्ण मोकळ्या पठारावरून वहात असेल तर आकाशाचा निळा रंग धारण करेल. पण बाहेरुन जरी वेगळं दिसत असलं तरी आतून मात्र ते आपलं स्वत्व टिकवून असतं. असं कायम वाटतं मला. कसं बघा न..पाणी कुठल्याही आकारात कुठंही स्वतःला ऍडजेस्ट करतं. पण असं असलं तरी ते कुठं साठून रहात नाही. आपला मार्ग आपण शोधून वाहतं रहातं.
हं...कधी काय मनात येईल सांगता येत नाही. पण एवढंच वाटतं..शिकायला पाहिजे न असं आपणसुद्धा.
जस्मिन जोगळेकर.
Sundr
उत्तर द्याहटवाथँक्यू 🙂
हटवाअनुभवांना रीत कथन असल्याने ते मनाला खूपच भावते
हटवाआधारीत
हटवाथँक्यू 🙂🙏
हटवा