समजेल का कधी त्याला?
समजेल का कधी त्याला?
परतलाटेसारख्या माझ्या डोळ्यांमागच्या
वादळी आवेगी लाटा….
त्याला समोर पाहून उसळणाऱ्या.
समजेल का कधी त्याला?
लुकलुणाऱ्या माझ्या चेहऱ्यामागचे
मनातले टिपूर चांदणे….
त्याला समोर पाहून अमावस्येलाही फुलणारे.
समजेल का कधी त्याला?
दरवळणाऱ्या माझ्या कुरळ्या केसांमधली
त्याच्या हळुवार स्पर्शाची ओढ…
त्याला समोर पाहून लागलेली.
समजेल का कधी त्याला?
भर वैशाखातही माझ्या मनातली
पावसाची धुवांधार बरसात….
त्याला समोर पाहून सुरू झालेली.
समजतील का कधी त्याला?
थंडगार वारा पिऊन मी शांत करणारे
माझे गरम श्वास….
त्याला समोर पाहून फुलून आलेले.
समजेल का कधी त्याला?
माशांच्या स्पर्शापेक्षाही त्याच्या ओढीने
मोहोरणारे माझे मन….
त्याला समोर उभा पाहून.
समजेल का कधी त्याला?
जस्मिन जोगळेकर
२४/१२/२०२३.
उत्तम
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙂
हटवा