संवाद

धुक्याच्या मिठीने शहारलेल्या सकाळी
गवतावर अल्लद पावले उमटवत
तुला चालताना पाहिले,
तुझ्या पायातल्या नाजूक पैंजणाची 
गोड किणकिण ऐकली आणि वाटले….
आता ओठांवरल्या शब्दांनी सरळ मौनात जावे आपले. 

पाऊसधारांनी आळसावलेल्या सकाळी
ओलेत्या रस्त्यावरुन पावले सावरत 
तुला चालताना पाहिले, 
गालांवरून ओघळणाऱ्या थेंबांना
नजाकतीने दूर करताना तुला पाहिले आणि वाटले….
आता ओठांवरल्या शब्दांनी सरळ मौनात जावे आपले.

वसंताच्या मोहाने बहरलेल्या सकाळी
दरवळत्या रस्त्यावरून पावले रेंगाळत
तुला चालताना पाहिले,
नाजूकशा फुलांना नाजूकतेनेच 
केसांत माळताना तुला पाहिले आणि वाटले….
आता ओठांवरल्या शब्दांनी सरळ मौनात जावे आपले.

वाऱ्याच्या नशेने धुंदावलेल्या सकाळी
भिरभिरत्या पाचोळ्याला न जुमानता पावले टाकत
तुला चालताना पाहिले,
वाऱ्याच्या मुजोरीशी सामना करत 
उडणाऱ्या पदराला सावरताना तुला पाहिले आणि वाटले….
आता ओठांवरल्या शब्दांनी सरळ मौनात जावे आपले. 

शरदाच्या चांदण्याने मधाळलेल्या रात्री
झुलणाऱ्या झुल्यावर पावलांना शांतवत
तुला बसलेली पाहिले,
माझ्या चोरट्या नजरेला तुझ्या मोहक नजरेत 
अडकवत तू ही मला पाहिले आणि वाटले….
बरं झालं शब्द मौनात गेले कारण
जे शब्दांना नसते जमले ते नजरेच्या संवादाने जमले. 

जस्मिन जोगळेकर
०४/०१/२०२४.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक