मध्यंतरी.....

मध्यंतरी काय झालं होतं कुणास ठाऊक…
विचार सगळे गोठून गेले होते एखाद्या हिमनगासारखे,
शब्द सगळे निखळून गेले होते तुटत्या ताऱ्यासारखे
आणि बिचारं मन….
एकाकी उभं होतं शिशिरातल्या निष्पर्ण वृक्षासारखं.

मध्यंतरी काय झालं होतं कुणास ठाऊक…
लय वेडीवाकडी जात होती घाटातल्या वळणांसारखी,
सूर घसरत होते पावसाळ्यातल्या दरडीसारखे
आणि बिचारा आवाज…
सुना झाला होता शिशिरातल्या निष्पर्ण वृक्षासारखा.

मध्यंतरी काय झालं होतं कुणास ठाऊक…
रेषा विरून गेल्या होत्या वाळूतल्या पावलांसारख्या,
रंग उडून गेले होते मावळून गेलेल्या क्षितिजासारखे
आणि बिचारी बोटं…
निष्प्राण भासत होती शिशिरातल्या निष्पर्ण वृक्षासारखी.

पण तरीसुध्दा…
एक जाणीव उफाळून येऊ पाहत होती ज्वालामुखीसारखी,
सृजनाची भावना पसरत होती लाव्ह्यासारखी
मन, आवाज, बोटं, सारा सारा भवताल….
रंगीन होऊ पाहत होता सप्तरंगी इंद्रधनूसारखा…
वसंत जो येऊ लागला होता. 

जस्मिन जोगळेकर
०७/०१/२०२४.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक