पाऊस.....

तुझ्या अंगणातला आणि माझ्या अंगणातला 
पाऊस सारखाच आहे का गं?
तुझ्याही मनात आठवणींचा पाऊस
धुंवाधार बरसतोय का गं?

माझ्या अंगणातला पाऊस आत्ता
जुईच्या नाजूक देहाला भिजवतोय 
आणि आठवणींचा पाऊस..
भिजून गेलोय त्या रोमांचित क्षणांमधे..
जिथे मनाच्या मुठीतून सुटलेली माझी नजर
गुंतलेय तुझ्या पाणीदार नजरेमधे..
तुझ्या ओलेत्या केसांमधला जुईचा दरवळ
भरभरून घेतलाय मी श्वासामधे..
आह!...त्या आठवणीमध्ये तू ही अजून 
रेंगाळते आहेस का गं? 
तुझ्या अंगणातला आणि माझ्या अंगणातला 
पाऊस सारखाच आहे का गं?

माझ्या अंगणातला पाऊस आत्ता
मातीच्या रोमरोमाला भिजवतोय 
आणि आठवणींचा पाऊस..
फुलवतोय निखारे माझ्या मनातले..
एकाच छत्रीतला तो हलकासा स्पर्श
आणि भासात अजून अंग अर्धे भिजलेले..
तो पाऊस, ओलेत्या मातीचा दरवळ 
आणि स्पर्शाने अंगागावर शहारे फुललेले..
आह!...त्या आठवणीमध्ये तू ही अजून 
रेंगाळते आहेस का गं? 
तुझ्या अंगणातला आणि माझ्या अंगणातला 
पाऊस सारखाच आहे का गं?

तुझ्याही मनात आठवणींचा पाऊस
धुंवाधार बरसतोय का गं?
तुझ्या अंगणातल्या पावसाला माझ्या अंगणात
सामावून जावं असं वाटतंय का गं? 


जस्मिन जोगळेकर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक