पत्रलेखन २५

ऐसा एक दिन आयेगा...

………


तुझ्या नावाआधी ‘प्रिय’ लिहिण्यासाठी हात खूप मागे लागला होता. पण “प्रिय म्हणण्याइतपत आपली ओळख अजून झालेली नाहीये असं तू म्हणणार”, असं वाटून हाताला एकदम बंदी घातली मी. नुसतंच नावही लिहायला मग नको वाटलं. अशावेळी ही टिंब मदतीला येतात बघ. समोरचा त्याच्या मनाने अर्थ लावून त्यात शब्द भरतो. तसा तू ही भरशील. तू तिथे कोणते शब्द भरशील याला मी काही आक्षेप घेऊ शकत नाही, तसंच माझ्या मनात तिथं काय भरायचं होतं याला तू ही. हो ना? 

आपली पहिली भेट मला लख्ख आठवतेय. आता हे पत्र वाचताना ‘मला आठवतेय का?’ असा प्रश्न तू स्वतःला विचारला नाहीस तरी ‘लख्ख म्हणजे केवढं लख्ख?’ हा तरी विचारला आहेस ना? मिट्ट काळे ढग कोसळून, विरुन गेल्यावर निळंभोर आकाश जेवढं लख्ख दिसतं ना तेवढं. ‘मला टिटवीचं ओरडणं फार आवडतं. तिचा हा गूढ आवाज शांतता असेल तेव्हा तर…त्यात रात्रीची निरव शांतता असेल तर फारच भुरळ पाडतो.’ म्हणालीस तेव्हा चमकून पाहिलं होतं मी तुझ्याकडे. ज्या आवाजाला लोकं अशुभ मानतात त्याला ही मात्र…..विचित्रच आहे जरा म्हणून तेव्हा जरा तुझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. पण टिटवी बद्दल ज्ञानेश्वरी, भारुड यात आलेले उल्लेख आणि काय काय सांगितलं होतंस तू तेव्हा! पण नंतर एका रात्री अशीच दुरुन ओरडत येत परत दूर जाणारी टिटवी ऐकली आणि काय माहीत मी ही त्या आवाजाच्या प्रेमात पडलो. तू त्या आवाजाच्या प्रेमात होतीस म्हणून मी ही पडलो का हे मात्र सांगू शकणार नाही मी. 

पण नंतर जशी ओळख वाढली किंवा असं म्हणू तुझी माहिती मिळत गेली तसं मात्र मी स्वतःला तुझ्या प्रेमात पडण्यापासून रोखू शकलो नाही… तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपली फारशी ओळख नसताना देखील. आपल्या ज्या एक दोन भेटी झाल्या, त्याही अगदी जशाच्या तशा आठवताहेत मला अजूनही. केसातला मोगऱ्याचा गजरा सुकून गेल्यावर काढला तरी त्याचा दरवळ जसा नंतरही कितीतरी वेळ केसांना लपेटून राहिलेला असतो ना तशा. मनात आठवणी साठवून ठेवायची ही सोय फार आवडते मला. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीतल्या बारीक सारीक गोष्टी अशा आठवणीत राहणं हे प्रेमात पडल्याचं लक्षण होऊ शकतं ना? की प्रेमात पडल्यावर त्या गोष्टींकडे लक्ष जाऊन त्या आठवणीत राहतात? ते जाऊ दे…माझ्या बाजूने निष्कर्ष काय कळलाय मला मग उगीच गोंधळ वाढवत नाही आता. 

मोगऱ्याच्या गजऱ्यावरुन आठवलं…त्या दिवशी स्टेट्सला ठेवलेला जुईच्या फुलांचा गजरा करतानाचा तुझा फोटो किती गोड होता…त्या जुई सारखाच! माझ्या मेसेजला काय उत्तर दिलं होतंस…इतकी नाजूक आहेत ही फुलं की सुईच्या टोकाने त्याच्या देठांना इजा करायला नको वाटतंय खरं तर.  परत एकदा तुझ्या प्रेमात पडायला तूच हे उत्तर देऊन कारण दिलंस बघ. माझी काय चूक यात? आणि मग नंतरच्या एका फोटोत जुई एका छानशा कोपऱ्यात, छानशा प्लेटमध्ये ठेवलेली दिसली. त्याक्षणी तुझ्या घरात सुगंध कसा दरवळत असेल याच विचारात रमून गेलो मी. मलाही आवडेल माझं घर असं सुगंधी करून दिलंस तर. रोजच असं काहीतरी छान स्टेट्सला ठेवत जा ना. बोलायला कारण दे ना मला. आपली ओळख जुनी आहे असं मला वाटत असलं तरी तुला वाटत नाहीये ना. मग ती तशी करायला तरी तुझ्याशी बोलायला हवं. 

आत्ता या क्षणी एक काळाकुट्ट, पाण्याने टच्च भरलेला ढग डोक्यावर विसावलाय माझ्या. पाण्याचं हे एवढं ओझं घेऊन किती वेळ हा भटकणार असं मनात येतंय तोवर वाटून गेलंच…मी तरी या क्षणाला काय करतोय? तुझ्याबद्दलच्या

विचारांनी मनातले ढग इतके गच्च भरलेत(ते काळेकुट्ट नाहीयेत बरं का) की कधी एकदा तुझ्यापुढे त्यांना मोकळं करीन असं झालंय. वाटलं तरी गडबड अजिबातच करणार नाहीये मी. जो तो क्षण त्याच्यासाठीची योग्य वेळ आल्यावर साजरा केला ना की, हिऱ्यासारखा अनमोल वाटायला लागतो. यावर ठाम आहे मी. आता ही हिऱ्याची उपमा दिलेली तुला आवडणार नाही माहितेय मला. मग तुझा मोगरा, जुई सारखा अनमोल म्हणतो..मग तर आवडेल ना?

आज अगदी अनावर झालं म्हणून हे पत्र लिहायला घेतलं खरं. पण तुला पाठवणार नाहीये लगेच. आपली ओळख जुनी आहे असं तुला जेव्हा वाटेल (जी मला आपल्या पहिल्या भेटीतच वाटली होती.), टिंबांच्या जागी माझ्या मनात जे शब्द आहेत तेच जेव्हा तुलाही भरावेत असं वाटतंय अशी माझी खात्री होईल तेव्हा हे पत्र तुझ्या हातात असेल. अर्थातच त्या क्षणाची मी वाट बघतोय. आता तो क्षण येईपर्यंत मधल्या क्षणांची केवढी मोठ्ठी माळ होईल मला माहीत नाही. पण असू दे…घाई नाहीये मला. पण तेव्हापासून तुझ्या उत्तराची वाट बघेन (टिंब टिंब नसलेल्या). 


                                           ………….


ता. क. 

पाकिटावर लिहिलेल्या ‘फ्रॉम’ मधून पत्र कोणी लिहिलं आहे ते लक्षात येईलच तुझ्या. पत्र तुझ्या हातात असेल तेव्हा या शेवटच्या टिंबांच्या जागी मला हवंय ते तू वाचलं असशीलच. 



जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक