पुस्तक परिचय... निसर्गभान
पुस्तकाच्या नावावरून पुस्तकाचा विषय काय असेल याची कल्पना आली असेलच. निसर्ग आणि पर्यावरण हा सध्या काळजीचा विषय झालेला आहे. अर्थात या दोन गोष्टींचा जे विचार करतात त्यांच्यासाठी. बाकी प्रगती आणि पैसा याकडे धावणारा त्याच्या आड येणाऱ्याला मुळापासून उखडून देतो हे आपण पाहतो आहोतच. पृथ्वीवर उपऱ्या असणाऱ्या माणसाने मूळ पृथ्वीवासियांना किती त्रास दिलाय..देतोय आणि त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेतच. या विषयावर पुस्तके लिहिली गेली, व्याख्याने दिली जात आहेत. पण कधी शहाणा होणार माणूस? आज जे पुस्तक मी परिचयासाठी निवडले आहे ते प्रा.श्री.द. महाजन सरांचे ‘निसर्गभान.’ वयाच्या ९२/९३ वर्षी त्यांचा फिरण्याचा, लिहिण्याचा अमाप उत्साह आश्चर्यचकित करतो. वनस्पती, निसर्ग, पर्यावरण याबद्दल सर इतकं समरसपणे सांगतात की ऐकत रहावं. इतक्या वर्षांचा अनुभव बोलत असतो.
निसर्गभान पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या लेखांचं संकलन आहे. वर्तमानपत्र, साप्ताहिकं यातून पूर्वी प्रसिद्ध झालेले लेख यात आहेत. हे लेख फक्त वाचून सोडून द्यायचे नक्कीच नाहीत. त्यावर विचार होऊन प्रत्यक्षात कृती होणं हीच यामागे अपेक्षा आहे. या लेखांमधून सर वाचकांशी संवाद साधू इच्छित आहेत. एकूण २६ लेखांचं २३२ पानांचं हे पुस्तक. सर म्हणतात त्याप्रमाणे माणसापुढे येणाऱ्या समस्या निदान कमी तरी करण्यासाठी आणि माणसाच्या अस्तित्वासाठी निसर्ग संवर्धनाची गरज आहे. यासंदर्भात वराहपुराणामधला एक दाखला या पुस्तकात दिला आहे.
यावत् भूमंडलात् धत्ते सशैलवनकाननम् l
तावत् तिष्ठन्ति मेदिन्यां संतती पुत्र पौतृकी ll
जोपर्यंत या भूतलावर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत, तोपर्यंत तुमची मुले व भावी पिढ्या सुखाने जगतील.
जीवसृष्टीची उत्पत्ती या लेखाने पुस्तकाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर प्राचीन संस्कृत वाङ्मयातील, दासबोधातील निसर्ग यावर लेख आहेत. यात दिलेली जाबालची गोष्ट कदाचित माहीत असेल. गौतम ऋषींकडे जाबाल ब्रम्हविद्या प्राप्त करण्यासाठी जातो. त्याला गौतम ऋषी अशक्त गाई बैल देऊन एका अगदी अपरिचित भागात जायला सांगतात. त्या अशक्त गाईगुरांची संख्या जेव्हा १००० होईल आणि ती सुदृढ होतील तेव्हा माझ्याकडे परत ये असंही सांगतात. त्यानंतर तुला ब्रह्मविद्या देईन. गुरूंची आज्ञा पाळून जाबाल त्या भागात जातो तर तिथे सगळेच त्याच्या अपरिचित असतं. पण हळूहळू त्या भागाची तिथल्या निसर्गाची तो पूर्ण माहिती करून घेतो आणि काही वर्षांनंतर सुदृढ १००० गाई बैल घेऊन गुरूंकडे परत येतो. या मधल्या काळात त्याला त्या अपरिचित भागाची म्हणजे तिथले वृक्ष, तिथले हवामान, पाणी, तिथली पिकं यांची सखोल माहिती झालेली असते. गुरूंकडे गेल्यावर गौतम ऋषी त्याला पाहून प्रसन्न होतात आणि म्हणतात तुला आता ब्रह्मविद्या प्राप्त झाली आहे. निसर्गज्ञान म्हणजेच ब्रह्मविद्या हेच गौतम ऋषींनी सांगितलं होतं. व्यंकटेश माडगूळकर यांनी सरांना सांगितलेली ही कथा सर सगळ्यांना आवर्जून सांगतात. जेणेकरून सगळ्यांनी आपल्या भोवतालच्या निसर्गाची माहिती करून घ्यावी.
झाडे लावा, झाडे जगवा चा नारा सगळीकडे जोरदार असला तरी कोणत्या भागात कोणती झाडं लावायची याचाही अभ्यास व्हायला पाहिजे. देशी वृक्ष लागवडीचे महत्त्व त्यांच्या लेखात सरांनी स्पष्ट केले आहे. त्या त्या परिसरात नैसर्गिकरीत्या वाढणारी झाडं साहजिकच पर्यावरणाचा समतोल कायम राखतात. पण वन खात्याने पटापट वाढणारी आणि वृक्षारोपण कार्यक्रम उरकण्यासाठी ग्लेरिसिडीया, सुबाभूळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, निलगिरी अशी परदेशी झाडं भारतात आणली आणि त्यांची एकसुरी भरपूर लागवड केली. त्यामुळं झालं काय की जैवविविधता कमी होत गेली, जे पर्यावरणासाठी दाहक आहे. या सगळ्याचे तोटे काय?, देशी झाडं कोणती आणि ती का लावावीत? असे कितीतरी मुद्दे सरांनी या लेखातून मांडले आहेत.
याप्रमाणेच पाणी, सध्या फोफावत चाललेलं निसर्ग पर्यटन, सेंद्रिय शेती या आणि इतर सगळ्या लेखांमधून निसर्गाचं भान कसं ठेवायला हवं ते सरांनी मुद्देसूद आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. हा विषय नक्कीच वरवरचा नाही. समजून विचार करून प्रत्यक्ष कृती करणं आता आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढ्या सुखात राहू शकतील. नाहीतर अल्बर्ट श्र्वाइट्झर म्हणतात तसं ‘कोठे थांबावे याचे ज्ञान व जाण माणसाला नसल्यामुळे तो आता सर्वनाश करूनच थांबेल.’ असं होऊ नये यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं. बरोबर ना?
जस्मिन जोगळेकर
ज स्मिश, नेहमी प्रमाणे खूप साध्या आणि सोप्या भाषेत थोडक्यात निसर्गभान उलगडून दाखवलं आहेस
उत्तर द्याहटवामला जस्मिन म्हणायचं होतं, चुकून जस्मिश लिहीलं गेलय,
हटवाधन्यवाद 🙂
हटवा