पुस्तक परिचय...सुरस कथा जैव संशोधनाच्या
United Company of Barbers and Surgeons या नावाची एक संयुक्त संस्था सन १७४५ नंतर अस्तित्वात होती. माहीत आहे तुम्हाला? नेमकं काय काम होतं या संस्थेचं? तर शल्यचिकित्सक होऊ इच्छिणाऱ्या लोकांना ही संस्था जुजबी प्रशिक्षण द्यायची. मग यात बार्बर शब्द का? असा प्रश्न पडला का? त्या काळात शल्यचिकित्सा करणारे कोणी डॉक्टर नव्हते. तेव्हा केस कापणारे लोकच अशी शस्त्रक्रिया करायचे. वाचून कसंतरीच वाटतंय न! ही गोष्ट आहे १६ व्या शतकामधली. तेव्हा सलूनच्या बाहेर निळ्या पांढऱ्या पट्ट्यांनी रंगवलेला एक सोटा लोंबकळत ठेवलेला असायचा. तो केशकर्तनकार शस्त्रक्रिया करतो हे समजण्यासाठी आणि निळ्या पट्टया रक्त वाहून नेणाऱ्या नीलांसाठी तर पांढऱ्या पट्टया बँडेजचे प्रतीक म्हणून. अँब्रोइस पारे नावाचा एक केस कर्तनकार तेव्हा शस्त्रक्रियेत पारंगत होता. १५४५ साली त्याने पुस्तकही लिहिले होते म्हणे.
१८८९ साली जर्मनीतील मेहरिंग आणि मिकोव्हस्की या डॉक्टर मित्रांनी पैज जिंकायची म्हणून एका कुत्र्याचे स्वादुपिंड शस्त्रक्रिया करून काढून टाकले. पुढे त्या कुत्र्याचे काय होते याच्याशी त्यांना काही कारण नव्हते. पण त्यांचा सहाय्यक आणि रखवालदार मात्र त्या कुत्र्याची नंतरही काळजी घेत होता. एक दिवस त्याच्या लक्षात आलं की हा कुत्रा जिथे लघवी करतोय त्या जागेला मुंग्या लागताहेत. डॉक्टरांना त्याने तसं सांगताच असं लक्षात आलं की कुत्र्याच्या लघवीतून मोठ्या प्रमाणात साखर बाहेर टाकली जात आहे. स्वादुपिंड काढल्यावर हे होऊ लागलं होतं. त्यांच्या लक्षात आलं की म्हणजेच स्वादुपिंडात अशा पदार्थाची निर्मिती होत असावी की ज्यामुळे रक्तात आणि लघवीत असलेल्या साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवलं जात असणार. यावर आणखी पुढे संशोधन होत होत इन्सुलिनचा शोध लावला गेला.
अशा अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतील सुरस कथा जैव संशोधनाच्या या पु. के.चितळे यांच्या पुस्तकात. बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न पडतातच ना की, हे पहिल्यांदा कोणी शोधलं असेल? किंवा हा असा विचार मुळात डोक्यातच कसा काय आला असेल? काही गोष्टींचा अगदी अचानक, अनपेक्षितपणे शोध लागला आहे, काही गोष्टींच्या मागे प्रचंड अभ्यास करून त्यांचा शोध घेतला गेला आहे. गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात तसे काही शोध लागले. ॲनास्थेशिया, पेनिसिलीन, रंग अंधत्व, प्लास्टिक सर्जरी आणि अशा अजून काही गोष्टी कशा शोधल्या गेल्या हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचावं लागेल.
ओटो लोएवी नावाच्या ऑस्ट्रियन शास्त्रज्ञाच्या बाबतीत तर मजेदार किस्सा झाला आणि त्यामुळं त्याला शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. तो चेतासंस्था विषयी काही प्रयोग करत होता. पण आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी प्रयोगातून त्याला काही पुरावा सापडत नव्हता. पण एके रात्री झोपेत त्याला आपला प्रयोग यशस्वी झाला आणि तो सिद्ध करण्यासाठी भक्कम पुरावा मिळाला असं स्वप्न पडलं. खाडकन जागं होऊन त्याने प्रयोगशाळेत स्वप्नाप्रमाणे प्रयोग केला आणि तो खरंच यशस्वी झाला. पुढे त्याच्या या महत्त्वाच्या शोधासाठी त्याला नोबेल पारितोषिक मिळालं.
खिडकी असलेलं पोट हा लेख थोडा वाचताना विचित्र वाटतं. बंदुकीची गोळी लागून पोटाला आणि जठराच्या पिशवीला भोक पडतं. टाके घालायला तो तयार नसतो म्हणून डॉक्टर मलमपट्टी करून जखम नुसती बांधून टाकतात. आता हा माणूस काही २४ तासांनी या जगात नसणार यावर ते ठाम होतात. पण त्यानंतरही त्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यावरही हा जिवंत राहतो. मधल्या काळात त्याच्या पोटातून जठरात उघडणारी खिडकी तयार झालेली होती. खिडकीच्या आतल्या बाजूला एक पडदा तयार झालेला होता, पण तो बाजूला केला की त्याच्या पोटात डोकावायला यायचं. त्या डॉक्टरांनी त्या माणसाला आपल्याकडे नोकरीला ठेऊन घेतलं आणि त्यावर बरेच प्रयोग करून शोध घेतले. सहा वर्षाहून अधिक काळ त्यांनी वेगवेगळे २३८ प्रयोग त्याच्यावर करून डॉक्टरांनी जठर आणि जठर रसाबद्दल एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. रुग्णांच्या उपचारासाठी आणि त्यांना त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयीबद्दल सल्ला देण्यासाठी डॉक्टराना या प्रयोगांचा उपयोग झाला.
आपली उत्सुकता शमविणाऱ्या अशा गोष्टी या पुस्तकातून आपल्याला समजतील. जैव संशोधनाच्या बाबतीतल्या कथा मराठी भाषेत फार उपलब्ध नाहीत. या विषयासंबंधी माहिती देणाऱ्या २३ सत्यकथा वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या होत्या त्याचे हे पुस्तक. लेखकाच्या म्हणण्यानुसार यात समाविष्ट सर्व संशोधन जैव शास्त्राशी संबंधित असलं तरी त्यात वेगळेपणा आहे. काहीतून संशोधकांचे अथक परिश्रम कळतात तर काहीतून शोध कसा नाटकिय पद्धतीने झाला ते कळतं. पण यातल्या रंजक माहिती बरोबरच महत्त्वाची अशीही बरीच माहिती आपल्याला मिळते.
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा