पुस्तक परिचय....कुलरक्षिता जिऊ

 
आज एका ९० पानी छोट्याश्या पुस्तकाचा छोटुसा परिचय. 
आपल्या सगळ्यांचा शालेय प्रवास शिवाजी महाराज, पेशवे यांचा इतिहास शिकत पूर्ण झालाय. सनावल्या वंशावळ यासारख्या गोष्टी मला तेव्हा फार त्रास द्यायच्या, अजूनही देतात. पण असो..मुद्दा तो नाहीये. आज जे पुस्तक परिचयाला घेतलं ते आहे कुलरक्षिता जिऊ. इतिहासातल्या साडेतीन शहाण्यांमधले अर्धे शहाणे नाना फडणवीस यांच्या या नवव्या पत्नी. त्यांच्याच घराण्यातल्या सध्याच्या पिढीतल्या वैशाली फडणीस यांनी हे पुस्तक जिऊबाईंच्या आत्मकथनाच्या रूपात लिहिले आहे. 

नाना फडणवीस हे पेशवाई मधले बुद्धिवान व्यक्तिमत्त्व. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल, कर्तृत्त्वाबद्दल आपण वाचून आहोतच. जिऊबाई ह्या त्यांच्या शेवटच्या पत्नी. लग्न म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात त्याकाळी लग्न होत असत. जिऊबाईंचं तसंच झालं. अर्थात त्या दोघांच्या वयात खूपच अंतर होतं. घराण्याला वारस असावा ह्या कारणाने हे संबंध जुळून आले होते. पण ते घडणार नव्हतंच. कारण लग्न झाल्यानंतर अगदी काही वर्षातच नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. जिऊबाई तेव्हा जेमतेम १०-१२ वर्षांच्या होत्या. नानांच्या उमेदीच्या काळात पेशवाईत त्यांना आदर आणि त्यांचा वचकही होता. पण राजकारणात वेगळ्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आणि नानांच्या पश्चात तर ती उतरंडीलाच लागली. त्यावेळी जिऊबाईंचे वय लहान होते. पतीच्या मृत्यूनंतर त्यांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला. घराण्याची जप्त केली गेलेली मालमत्ता आणि घराण्याचा मान परत मिळवण्यासाठी त्या खूप धैर्याने पुढे आल्या. पण या जिऊबाईंबद्दल कागदोपत्री माहिती तशी कमी आहे. त्यामुळं हे चरित्रात्मक पुस्तक विस्ताराने लिहिता आलं नाहीये. 

जिऊबाईंचे माहेरची परिस्थिती बेताची पण सुखाने राहणारी. फडणविसांचे स्थळ वयाने, मानाने थोर होते, पण लेकीच्या कल्याणाचा विचार करून ही सोयरिक जुळून आली. आधीचा दारिद्र्याचा अनुभव आणि आता एवढी श्रीमंती. जिऊबाईंचा जीव त्यात रमला खरा, पण हे सुख अगदीच थोड्या वर्षांचे सोबती निघाले. लग्नानंतर फडणवीस घराण्याच्या चालीरीती, तिथलं वावरणं जिऊबाई त्यांच्या मोठ्या सवत बयाबाई यांच्याकडून शिकत होत्या. लग्नानंतर माहेरपणाला गेल्यावर तिथे सगळ्यांकडून मिळत असलेला मान पाहून त्यांना आनंद होत होताच. पण थोडा मिठाचा खडा हवा की. नानासाहेबांचे वय आणि त्यांचे आधीचे इतके विवाह यावरून एका मैत्रिणीने जिऊबाईंना टोकल्यावर त्यांचे मन उदास झाले आणि नानासाहेबांची सगळी माहिती घ्यायची त्यांनी ठरवलं. त्यांच्या आईला हे कळल्यावर त्यांनी ही सोयरिक जुळवलेल्या जोशीमामांना बोलावून जिऊबाईंचे मनातील सर्व प्रश्नांचे निराकरण करायला सांगितले आणि त्यातूनच जिऊबाईंना फडणविसांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल कळत गेले आणि त्यांच्याबद्दल आदर दुणावत गेला. यातून आपल्यालाही नानासाहेबांचे कर्तृत्व, त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, हाती तलवार न घेताही शत्रूला नामोहरम करण्याची हातोटी कळून येते. 

या करून घेतलेल्या माहितीचा जिऊबाईंना पुढे फार उपयोग झाला. कारण लग्नानंतर तीन चार वर्षातच नानासाहेबांचे निधन झाले आणि त्यानंतर चौदा दिवसातच बहिणीसारखी असणारी सवतीचेही निधन झाले. इतका मोठा धक्का पचवणे त्या लहान वयात खरंतर अवघड. पण आसपासच्या विश्वासू आणि नानासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या लोकांच्या साथीने त्या सावरल्या. पुढे सभोवतालच्या गढुळलेल्या वातावरणात जिऊबाईंनी फडणवीसांची मालमत्ता आणि घराण्याचा मान परत मिळवण्यासाठी किती खटपट केली हे या पुस्तकातून अगदी थोडक्यात लक्षात येते. लेखिकेने म्हटल्या प्रमाणे जिऊबाईंची विस्तृत माहिती कुठे उपलब्ध नसल्यामुळे हे पुस्तकाचे स्वरूप अगदी छोटेखानी झाले आहे. त्या संदर्भातली कागदपत्र शोधण्यासाठीही त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली. भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे नगर वाचन मंदिर येथून तरी फडणवीस घराण्याचे मोडी कागदपत्र वगैरे मिळाली आणि लेखिकेला स्वतःला मोडी लिपी अवगत असल्यामुळे त्यांना पुस्तक लिहिण्यास त्याचीही मदत झाली. 

तर एकंदरीत असं हे पुस्तक.... असंही पुस्तक आहे हे माहित व्हावं म्हणून आजचा हा परिचय.

आज नानासाहेब फडणवीस यांचा स्मृतीदिन...त्यांना विनम्र अभिवादन 🙏

जस्मिन जोगळेकर.
१८/०३/२०२५

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक