पुस्तक परिचय.... द हाऊंड ऑफ बास्करव्हिल्स
सर आर्थर कॉनन डॉयल आणि शेरलॉक होम्स यांचं नातं अजबच. ही पुस्तकं वाचत किती पिढ्या मोठ्या झाल्या असतील आणि होत राहतील! एकदा का पुस्तक हातात घेतलं की कानांची भोकं आपोआपच बंद होऊन जातात…हो ना? कोणी हाक मारो किंवा आणि काही…पुस्तकाचा फडशा पाडल्याशिवाय उठणे नाही. लहान असताना हे जमू शकायचं,पण आता नाही. त्यामुळं अशी रहस्यमय पुस्तकं वाचायला घेणं कमी झालं आहे. माझ्या लेकीने जेव्हापासून शेरलॉक होम्सची पुस्तकं वाचायला सुरुवात केली तेव्हापासून मी ही ती वाचावीत असा तिचा कायमच आग्रह असायचा. पण यावेळी लेकीने पुस्तक हातातच ठेवलं आणि वाचच म्हणून जाम पिच्छा पुरवला. ते ही पुप साठी सातमधलं हे एक पुस्तक असायला हवं असं बजावून. बहुतेकांनी शेरलॉक होम्सची पारायणं केली असतील नक्की. पण लेकीचा आग्रह मोडवेना.
तर….
सर चार्ल्स बास्करव्हिल यांच्या मृत्यूपासून सुरुवात होते. सर चार्ल्स यांचे मित्र डॉ. मॉर्टिमर ही केस घेऊन शेरलॉक होम्सकडे येतात. त्यांच्याकडे बास्करव्हिल घराण्याची काही कागदपत्र असतात. त्यात लिहिलेली असते एक ऐतिहासिक दंतकथा. काय असते ती दंतकथा? सर चार्ल्स यांच्या मृत्यूनंतर त्यांचे संपत्तीचे वारस सर हेन्री लंडन मध्ये येतात. डॉ. मॉर्टिमर त्यांची शेरलॉक होम्सशी भेट घडवून आणतात. ते लंडनमध्ये आल्या आल्या त्यांच्या जीवाला धोका असल्याचे एक पत्र त्यांना मिळते. ते ही हाती लिहिलेले नाही, तर वर्तमानपत्रातल्या बातमीमधून कापून घेतलेले शब्द जोडून पत्रावर चिकटवलेले. कोणी पाठवलेलं असतं हे पत्र? त्यानंतर हॉटेलमध्ये सर हेन्री यांचा नवीन कोरा करकरीत बुटातला एकच बूट चोरीला जातो. नंतर हा नवा बूट सापडतो, पण जुन्यातला एक चोरीला जातो. एकच बुटाची चोरी कशासाठी आणि कोण करत असतो? डॉ. मॉर्टिमर आणि सर हेन्री शेरलॉक होम्सच्या घरुन परत जाताना कोणीतरी बग्गीतून त्यांच्यावर पाळत ठेऊन असतो. शेरलॉक होम्सच्या लक्षात आल्यावर तो बग्गीचा पाठलाग करतो. पण हाती काही सापडत नाही. पाळत ठेवणारी व्यक्ती कोण आणि कशासाठी हे करत असते? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर वाचायला हवं द हाऊंड ऑफ बास्करव्हिल्स.
तिथून सर हेन्री डेव्हेनशायर इथल्या आपल्या परंपरागत भव्य बास्करव्हिल हॉल मध्ये रहायला जायला लंडन सोडतात. त्यांच्या सोबत गरज लागलीच तर मदतीला म्हणून डॉ. वॉटसन जातो. घराची देखरेख करणारं बॅरीमोर दांपत्य आणि आसपासचे शेजारी यांची हळूहळू ओळख होते. जीवाला धोका असल्याचं पत्र मिळालं असलं तरी आणि त्यांच्या घराण्याबद्दल दंतकथा ऐकली असली तरी सर हेन्री न घाबरता या भल्या मोठ्या बास्करव्हिल हॉलमध्ये रहायला आलेले असतात. नंतर आसपास काहीतरी गूढ घडतंय असं वाटायला लावणाऱ्या घटना घडायला लागतात. मध्यरात्री हलक्या पावलांनी घरातल्या पॅसेजमध्ये कोणाचं तरी फिरणं, कधीतरी रात्री घरातून स्त्रीच्या रडण्याचा आवाज येणं…सर हेन्री आणि वॉटसन या घटनांचा शोध घेतात. त्यातून त्यांना कळतं तरी काय? अपरात्री रडणारी स्त्री सापडल्यावर तिने सांगितलेल्या गोष्टी ऐकून धक्का, चीड अशा संमिश्र भावना सर हेन्रीच्या मनात येतात. त्याच रात्री एका व्यक्तीच्या शोधात ते दोघे बाहेर पडतात. घराजवळच्या त्या गूढ माळरानातून जाताना त्यांना एक भयानक आवाज ऐकू येतो. कुठून येतोय ते कळत नाही, पण त्या आवाजाने मनात भीती मात्र वाटायला लागते आणि ते परत फिरतात. तेवढ्यात वॉटसनला टेकडीवर अजून एक वेगळीच व्यक्ती पाळत ठेऊन असलेली दिसते. त्या माळरानावर एवढं गूढ काय असतं? जिचा शोध घ्यायला वॉटसन आणि हेन्री जातात ती व्यक्ती कोण असते? परत येताना वॉटसनला टेकडीवर दिसलेली व्यक्ती कोण आणि तिथं काय करत असते? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर वाचायला हवं द हाऊंड ऑफ बास्करव्हिल्स.
गावातल्या लोकांची माहिती काढायची जबाबदारी शेरलॉक होम्सने वॉटसनला दिलेली असतेच. एकदा फिरताना त्याची गाठ स्टेपलटन नावाच्या शेजाऱ्याशी पडते. स्टेपलटनच्या आग्रहावरून वॉटसन त्याच्याबरोबर त्याच्या घरी निघालेला असताना स्टेपलटन पाकोळीच्या मागे पळत गेलेला पाहून एक स्त्री पटकन येऊन घाईगडबडीने थोडं घाबरत तुम्ही इथून निघून जा. तुमच्या जीवाला इथे धोका आहे असं सांगायला लागते. ती स्त्री कोण असते आणि ती असं का सांगते? पुढे स्टेपलटन तिची ओळख कोण म्हणून करून देतो? ती स्टेपलटनला घाबरत का असते? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर वाचायला हवं द हाऊंड ऑफ बास्करव्हिल्स.
पुढे काय काय घटना घडतात? बास्करव्हिल घराण्याची दंतकथा खरी असते का? सर हेन्री यांच्या जीवाला धोका देणारं कोण असतं? सर चार्ल्स यांचा मृत्यू कसा झालेला असतो? सर हेन्री यांचा मृत्यू होतो का? हे सगळं कोण आणि कशाप्रकारे घडवून आणत असतं? ती शेवटी कशी आपल्यात अडकते? या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर वाचायला हवं द हाऊंड ऑफ बास्करव्हिल्स.
सर आर्थर कॉनन डॉयल यांची वर्णन करण्याची शैली अफाट आहे. ट्रेनमधून डेव्हेनशयरचा प्रवास, तिथे पोहोचल्यावर बास्करव्हिल हॉल पर्यंतचा प्रवास आणि तेव्हा दिसणाऱ्या आसपासच्या प्रदेशाचे वर्णन डोळ्यासमोर चित्र उभं करतं. गूढ माळरानाचं वर्णन वाचून अरे बापरे..खरंच तिथं काय असेल वाटायला लागतं. शेरलॉक होम्स हे काल्पनिक पात्र आहे हे विसरायला लावून हे सगळं तेव्हाच्या लंडनमध्ये खरंच घडलं आहे असं हळूहळू वाटायला लागतं. लेखकाचं हेच सगळ्यात मोठं यश आहे. आपल्या कोणत्याही वयात ही पुस्तकं हातात आली तरी एका दमात वाचून काढावीत असं वाटायला लागतं. मला आलाय असा अनुभव. तुम्हाला आलाय?
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा