पुस्तक परिचय...भारताची अणुगाथा
मला असं वाटतं की काही काही विषय किचकट असतात. म्हणजे आपला त्या विषयाशी फार ओळख नसेल तर असं होऊ शकतं. त्यातले काही विषय असेही असतात की त्याबद्दल लिहायचं तर त्याची भाषा जड जाते. अशी पुस्तकं मग वाचली जात नाहीत आणि महत्त्वाच्या विषयाला आपण मुकतो. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होऊ शकतं.
भारतातल्या वैज्ञानिक संस्थांमधली एक महत्त्वाची आणि यशस्वी संस्था म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र. इथे नेमकं काय चालतं याची उत्सुकता असेल तर ती भारताची अणुगाथा पुस्तकाद्वारे पूर्ण केली जाईल आणि ते ही सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत. या केंद्राच्या आतल्या विश्वाचे दर्शन घडवणारे मराठी भाषेमधले हे पहिलेच पुस्तक. लेखक श्री. आल्हाद आपटे हे १९७२ साली इथे वैज्ञानिक अधिकारी म्हणून रुजू झाले. या नोकरीत पुढे ४० वर्षं त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पात पुढाकार घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१२ मध्ये ते उत्कृष्ट वैज्ञानिक आणि संगणक प्रभाग प्रमुख म्हणून तिथून निवृत्त झाले. त्याच संस्थेत इतकी वर्षं काम केल्यावर BARC मधलं काम ते उत्कृष्टरित्या आणि अधिकारवाणीने नक्कीच या पुस्तकातून सांगू शकतात. अणु कार्यक्रमाचा इतिहास, त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टी लेखकाने रंजकतेने सांगितला आहे.
लेखकांनी त्यांच्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे या पुस्तकात सगळी मिळून नऊ प्रकरणं आहेत. पहिली दोन अणुउर्जेचे बीज रुजून कसं भक्कम झालं याची माहिती देणारी आहेत. तिसरे आणि चौथे प्रकरण भारतीय अणुभट्ट्यांची जीवनकहाणी सांगणारी आहेत. अणु इंधनाची माहिती पाचव्या प्रकरणात आणि ही अणु विज्ञानाची कहाणी आंतरराष्ट्रीय प्रवाहांशी कशी जोडली गेली हे सहाव्या प्रकरणात सांगितले आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या दालनांना भेट देणारी सात आणि आठ ही प्रकरण आहेत. हे सगळं लिहिताना लेखकाच्या मनात उमटलेले पडसाद नवव्या प्रकरणात वाचायला मिळतात. पुस्तकात नेमकं काय आहे हे थोडक्यात समोर यावं म्हणून लेखकाने कोणत्या प्रकरणाचा विषय काय आहे ते सांगितले आहे. पुस्तकाचा विषय तसं म्हटलं तर गुंतागुंतीचा पण सर्वांनी जाणून घ्यावा असा आहे.
अणु उर्जेची शोधकथा, TIFR ची स्थापना, भारतातल्या पहिल्या अणु भट्ट्या, अणुविद्युत केंद्राची सुरुवात, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची स्थापना, पोखरण, परदेशात झालेल्या दुर्घटना, आण्विक केंद्राचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास असे कितीतरी मुद्दे, विषय या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणातून वाचायला मिळतात. असा जड विषय साध्या सोप्या भाषेत समजावून सांगणे खरं तर अवघड आहे. इथेही काही वेळा काही गोष्टी समजण्यासाठी परत परत वाचाव्या लागू शकतात. विज्ञानाच्या भाषेतले शब्द मराठीत आले की थोडा गोंधळ होण्याची शक्यता असते. अर्थात तळ टिपेत त्याबद्दल सांगितले आहेच. हे सगळं सांगताना काही हलक्या घटनांचा उल्लेखही जाता जाता विषयाच्या अनुषंगाने यात आलेला आहे. रशियाच्या बाहेर आशियातली पहिली अणुभट्टी जेव्हा सुरू झाली, तेव्हा त्यातून निघणाऱ्या निळ्याशार सेरेन्कोव्ह किरणांचे सौंदर्य पंडित नेहरूंना प्रभावित करून गेले. त्याची तुलना त्यांनी अप्सरेच्या सौंदर्याशी केली…तिचं नाव अप्सरा. कॅनडाशी अणु विज्ञान सहकार्याची सुरुवात झाल्यावर भारतातल्या ४० जणांना एक वर्षाचे ट्रेनिंग घेण्यासाठी कॅनडाला पाठवलं. आता त्या लोकांच्या भारताविषयी काय काय समजुती होत्या त्या काळात. ही मंडळी महाराजांची पगडी घालून येतील असं त्यांना वाटत होतं. गेलेल्या लोकांची नावं उच्चारण अवघड जायचं म्हणून त्यांनी त्याचे शॉर्टफॉर्म केले..जसं सुंदरमचं सँडी, नरहरीचं हॅरी वगैरे. पण त्यात दोन नावं अशी होती की त्याचं काही होईना म्हणून सरळ त्यांना ती लोकं टॉम आणि जेरी म्हणायला लागली.
अणु उर्जेची ओळख होऊन जेमतेम साधारण पाऊण शतक उलटून गेलं असेल. या विषयात काम करणाऱ्या संस्थांभोवती एक गुप्ततेचं वलय तयार होतं. अगदी सुरुवातीला संस्थेचा लोकांशी थेट संपर्क असायचा कारण आठवड्यातून एक दिवस या केंद्राला सर्वसामान्य लोकांना भेट देता यायची. पण नंतर बदललेले वातावरण, पंजाब, काश्मीर मधल्या घटना इत्यादी कारणांमुळे हे बंद पडलं. पण या गुप्ततेमुळे लोकांच्या मनात कसे विचार येतात….कोण या कामाकडे आदराने बघतात, तर काय चाललंय सांगत नाहीत म्हणजे एकतर काम होतच नसणार किंवा त्यात घोटाळे असणार असाही विचार करणारे असतात. पण या सकारात्मक, नकारात्मक विचारधारा असल्या तरी आणि आणखी कितीतरी अडचणींना तोंड देत आपल्या शास्त्रज्ञांनी खूप मोठा पल्ला गाठला आहे ही गोष्ट नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा