अलक
*अलक*
*संयम*
आज बऱ्याच दिवसांनी त्याला समोर पाहून तिला त्याला खूप काही सांगावं वाटलं. तिच्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचविणारे कितीतरी साजिरे शब्द तिच्या मनात रुंजी घालायला लागले. पण एका क्षणात तिने ते शब्द संयमाने परतवले. कारण मग स्पर्श, नजर यांना काय किंमत उरली असती…
****************
घरट्यातल्या अंड्यांवर ती रोज लक्ष ठेऊन होती, त्या अंड्यांमधून इवली इवली पिल्लं बाहेर कधी येतील याची आतुरतेने वाट बघत होती. पण एके दिवशी त्या घरट्यातून अंडी गायब झालेली पाहताच कावळ्याच्या ओरडण्यामागचं कारण तिच्या लक्षात आलं आणि मनात कावळ्याविषयी राग उफाळून यायला लागला. पण तो राग क्षणात संयमाने काबूत आणताना तिने विचार केला… हे निसर्गचक्र आहे. ते बदलवणारी ती कोण?
******************
केवळ तिला विरोध करायचा म्हणून तो तिची कोणतीही गोष्ट पटवून घ्यायचा नाही आणि त्यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. त्यादिवशीही त्याच्या पाल्हाळिक लिखाणावरून विषय वाढायला लागला. त्याच्या या वागण्याची आता सवय झाल्यामुळे तिने संयमाने स्वतःला शांत ठेवले. त्यानंतर काही महिन्यातच तिचा स्वतःचा अलक संग्रह प्रकाशित झाला आणि तो फक्त नावाजला गेला नाही तर अनेक पुरस्कारांनी सन्मानितही झाला. त्याला शब्दापेक्षा कृतीने उत्तर दिल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर पसरून राहिलं.
******************
हल्ली त्याच्या दर्शनाला मंदिरात दिवसभर खूप गर्दी होत होती. जो तो काही न काही अपेक्षेने त्याच्यापुढे हात जोडायचा. या गर्दीत त्याचा खऱ्या भक्ताचा शोध घेणं चालूच होतं. फक्त ही एक अपेक्षाच त्याने मनात धरली होती. खरंतर ती त्याच्या संयमाची कसोटीच होती. पास होईल का तो त्यात?
******************
“कितीही मोठी संकटं आली तरी त्यांना संयमाने, धीराने तोंड द्या”... प्रवचनात ती हे ऐकत होती आणि मनात मात्र म्हणत होती…अनुभवलं असेल तर कळेल…सांगण्याएवढं सोपं आहे होय ते. खरोखरच फक्त संकटांचा सामना करण्यासाठीच आपला जन्म झाला आहे असं हल्ली तिला प्रकर्षानं वाटायचं. संयम टिकवण्याचा संयमही कधीतरी सुटू शकतोच ना! शेवटी माणूसच आहे ती.
*******************
हॉटेलमध्ये गेल्यावर भरपूर पदार्थ मागवून शेवटी पोटावरून हात फिरवत, ढेकर देत उरलेलं अन्न सरळ टाकून देणारी कितीतरी माणसं ती बघत होती. तेव्हाच जंगलात हरणांच्या मोठ्या कळपात घुसून फक्त एकच हरिण पकडून मारणाऱ्या वाघाला देखील तिने पाहिलं होतं. कोणी कोणाकडून शिकायला हवा संयम?
*******************
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा