काही क्षण

कसे असतात ना काही काही क्षण…

इतके सुखाचे... इतके सुखाचे की,

ग्रीष्मातही श्रावण सरी बरसवून जातात.

रखरखत्या संध्याकाळी सुगंधित मरव्यासारखं आपलं आयुष्यही सुगंधित करून जातात. 

दव ओले पंख सुकल्यावर या फुलावरून त्या फुलावर भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखे आपल्या भोवती भिरभिरत असतात. 

पैंजण पायांनी नाजूकपणे सतत सभोवती किणकिणत असतात.

कसे असतात ना हे सुखाचे क्षण!…..

असे क्षण कधीच निसटू नयेत असं वाटत असतानाच ते मात्र कधी निसटून जातात कळतही नाही, ऊन पडल्यावर विरुन जाणाऱ्या धुक्यासारखे. 


कसे असतात ना काही काही क्षण!…

इतके दुःखाचे... इतके दुःखाचे की, 

शिशिरातही पानगळी ऐवजी या क्षणांना 

चैत्रपालवीसारखे धुमारे फुटतात.

भिजल्या मातीवरून चालताना देखील पायाला निखाऱ्यावरून चालल्यासारखे चटके बसतात.

अखंड कानापाशी डासांसारखे गुणगुण करत असतात. 

कसे असतात ना हे दुःखाचे क्षण!....

असे क्षण काढत्या पायांसारखे निसटावेत असं वाटत असतानाच ते मात्र कधी घट्ट चिकटून बसतात कळतही नाही, पायाला लागलेल्या एखाद्या जळवेसारखे.


कसे असतात ना हे सगळे असे क्षण!...

यालाच आयुष्य म्हणतात ना…

दोन्ही क्षणांनी विणलेली शाल पांघरूनच जपून चालावे लागते हो आयुष्यात.

जशी दुःखी क्षणांशिवाय सुखी क्षणांची किंमत कळणार नाही, तशीच सुखी क्षणांशिवाय दुःखी क्षणांची. 

आयुष्याची भाषा, व्याकरण, आयुष्याचा अनुवाद करणं 

सोपं नाही, पण कठीणही नाही जितकं आपण समजतो. 

आलेल्या प्रत्येक क्षणाला हसून सामोरं गेलं की तो क्षणही हसरा होऊन जातो.

हेच क्षण म्हणजे आयुष्य…हो ना?


जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक