प्रभात

भैरव, बिभास पाठोपाठ आज ललतचे सूर सोबत घेऊन येशील म्हणून वेड्यासारखी वाट बघत होते. उगवतीच्या क्षितिजाला कशी त्या सूर्याची ओढ लागलेली असते ना, तशी मला तुझ्या सुरांची आणि त्यासोबत येणाऱ्या तुझी ओढ लागलेय बहुतेक. स्वप्नातसुद्धा त्यातच रमले होते. हे पहाटेचे राग किती सुंदर आहेत ना! एकदम शांत, मनाला प्रसन्न, टवटवीत करणारे. तुझं आसपास वावरणं देखील असंच आहे…प्रसन्न, टवटवीत करणारं. पण या नादात तू जवळ नाहीस हेच विसरुन गेले. ही ओढ पण ना….

तू आणि तुझे सूर आज जवळ नसले तरी वेळेला बांधील असल्यासारखी जाग त्याचवेळी आली… जेव्हा तानपुऱ्याच्या सुरात तू तुझा षड्ज मिसळतोस. तुझ्या सुरांचे आरोह अवरोह सोबतीला नसले तरी आसपासच्या या चिमण्या पाखरांच्या सुरांनी आज जागं केलं मला. किती नजाकतीने त्यांची आलापी सुरू होती! मधेच कोणाचा धैवत लागतोय, दुसरीकडे कोणाचा रिषभ. कुठल्याही नियमांचं बंधन नव्हतं रे त्यांच्या गायकीला. छान वाटत होतं ते ऐकायला…आणि कोणी ऐको न ऐको…कोणी तारीफ करो न करो…ते आपले आपल्याच विश्वात रममाण होते. जशी मी तुझ्यात रममाण होते. कशी असते ना ही ओढ पण…

तेवढ्यात परसातल्या माडांच्या रांगांमधून गाज ऐकू आली. रात्रभर उधाणून दमली होती बहुतेक. कळत होतं तिच्या आवाजावरून की पाणी ओहोटीला लागलंय. जमलं बघ तिलाही…पहाटेच्या या शांत समयी सुरांना मंद्र सप्तकात खेळवणं. रात्रभर किनाऱ्यावरच्या वाळूशी दंगामस्ती करता करता एकदम शहाणीच झाली की. आता हे शहाणपण किती वेळ टिकतंय बघू. पण निदान आत्तातरी भोवतालात एकरूप झालेय. पण तिच्यासारखे सगळेच शहाणे झाले तर कसं ना…किनाऱ्यावरची वाळू मात्र लाटेवर रुसून बसलेय. खेळायला येतेय..येतेय वाटतंय तिला तोवर ही निघून जातेय माघारी. किती लबाड आहे लाट तरी. आपल्याबरोबर जरासं अंतर घेऊन जातेय वाळूला. पण तेवढंच…. निव्वळ वेडी झालेय तिच्यासाठी. जशी मी झालेय तुझ्यासाठी. का त्रास देते ही ओढ…

तेव्हाच उगवतीकडे चित्र वेगळंच. त्या करड्या ढगांचा नटखटपणा तरी काय! रात्रभर भेट झाली नाही म्हणून सूर्य तरसतोय धरतीला बघायला. तर हे अंतरपाट धरल्यासारखे दोघांच्या मधे उभे. का करावं ना असं? एकदा विजेला लांब ठेऊन बघायला हवं त्यांच्यापासून... म्हणजे कळेल त्यांना. बिचारा सूर्य! किती लगबगीने यायला निघाला होता! पण त्याला थोडाच वेळ जमेल शांत रहायला. नंतर एकदा का आग ओकायला लागला की कोणाची खैर नाही. मग ती संध्याच शांत करणार त्याला. पण आत्ता किती आतुर झालाय तो. कुठल्या ना कुठल्या मार्गानं आपलं अस्तित्व धरतीला जाणवून द्यायला बघतोय. त्या ढगांमधून त्याच्या किरणांचा पिसारा फुलवलाय त्यानं. धरतीही वाटच बघत होती इशाऱ्याची. जशी मी बघतेय. एखाद्या झुळुकीबरोबर पाठव ना तुझे सूर. ही ओढ पण ना…

किनाऱ्यावरच्या सागरेश्वराच्या मंदिरातून घंटानाद ऐकू यायला लागलाय. धूप-दीपाने गाभारा सुगंधित होऊन उजळला असेल आता. मंदिराच्या आवारातला तो देवचाफा…शेजारच्या दीपमालेशी स्पर्धा करत होता आठवतंय ना. पण जसा फुलायला लागला तसा शहाणा झाला तोही. आज देवचाफ्याचंं समर्पण सार्थकी लागलं असेल थेट गाभाऱ्यात देवाच्या पायाशी जाऊन. किती प्रसन्न वेळ असते ना ही! नुसत्या कल्पनेनं देखील मन शांत होतंय. 

आणि…आणि मंदिराच्या सारवलेल्या स्वच्छ अंगणातली ती ठिपक्यांची रेखीव रांगोळी…कोणाला तशी रांगोळी काढताना बघितलं ना की मला काय वाटतं माहितेय…तो प्रत्येक ठिपका बोलका होऊन जातो आणि त्यांना जोडणाऱ्या रेषांची दिशा रांगोळी काढणारीला दाखवत जातो. कुठून कुठे सरळ यायचं, कुठे वळण घ्यायचं वगैरे…ते ही अगदी शांतपणे. पण मनात मात्र काय चालू…. कधी एकदा रेष माझ्यापाशी येतेय आणि मला एका सुंदर आविष्काराचा हिस्सा बनवतेय. किती उतावीळ ना! जशी तुझ्या भेटीसाठी मी उतावीळ. काय करू या ओढीचं…

खरंतर आजच्या दिवसाचा पहिला प्रहर असा प्रसन्न आहे. पण अजूनही प्रसन्न असला असता जर सोबत असते तुझे सूर आणि तू… ही ओढ पण ना…



जस्मिन जोगळेकर 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक