तिन्हीसांज
दूरवरून अचानक पूरियाचे सूर कानावर पडले आणि एकदम भानावर आले. तुझ्या आठवणींच्या एकेका पानावर रेंगाळत बसले आणि तिन्हीसांज कधी झाली कळलंही नाही. ते ऐकू येणारे पूरियाचे सूर जरी विलंबित लयीत असले तरी क्षण मात्र द्रुत लयीत निसटून चालले होते. त्यातच तुझी आठवण…ती तर समेवरच खिळून होती कधीची. काय करू सांग ना…
ही तिन्हीसांज पण बघ ना कशी… रोज अगदी ठरवून आल्यासारखी तुझ्या आठवणींचा हात धरून येते. मग मनात विचारांचा मंद वारा वाहायला लागतो आणि कधी तंद्री लागते कळतच नाही. मग कितीतरी वेळानं मंदिरातला घंटानाद या तंद्रीतून बाहेर पडायला भाग पाडतो. आणि आज पूरियाचे सूर… लगेच गदिमांच्या गाण्याच्या ओळी मनात आल्या.
“दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया
सांज समयी दुखवितात अंतरास सूर या”
काय करू सांग ना…
कसं आहे ना या तिन्हीसांजेचं…आत्ताच बघ ना…पश्चिमेला रंगांची अक्षरश: कशीही उधळण झालेय. दृष्टी त्या रंगात रंगून जात असताना मन मात्र थोडं काळं करडं होतंय. दिवसभर तळपणारं ऊनही हळवं होऊन गेलंय आणि मग तुझी आठवण सुंदर तान घेत येतेय आणि मनाला सजवतेय. काय करू सांग ना…
कशी आहे ना ही तिन्हीसांज… सोनेरी क्षितीज रेषा लाल व्हायला लागलेय. पक्षी दमलेल्या वेगानं घरट्याकडं परतताहेत आणि तेव्हाच अंधार हळूहळू झाडांच्या फांद्यांशी खेळायला लागलाय. अशी कशी रे ही सांजवेळ…हुरहूर लावणारी पण हवीशीही वाटणारी. आत्ममग्न होऊन जातो ना अशावेळी. असं वाटतं न बोलताही खूप बोलत असतो आपण. आपण एका जागी स्थिर असलो तरी मन मात्र कुठे कुठे गिरक्या घेऊन आलेलं असतं. एकटेपण नाही पण कधी कधी एकटं वाटायला लागतं रे अशावेळी. आठवण येतेय तुझी. काय करू सांग ना…
पण…पण आवडते मला ही तिन्हीसांज…कधी एकटं वाटायला लागलं ना तर माझी बकुळ असते सोबत करायला. वाऱ्याचा आणि तिचा रोज संध्याकाळी काय खेळ सुरू असतो कोण जाणे. त्यानं वाहायचं आणि हिने हळूच मातीत टपकायचं आणि वर त्याला स्वतःच्या सुगंधाची लाचही द्यायची. मग तो त्या सुगंधाला घेऊन मंद दरवळत राहणार. किती मजा ना! अशावेळी वाटतं आपण वारा तरी व्हावं किंवा बकुळ तरी. तेव्हाच यांचा हा खेळ बघताना रातराणी लाजत फुलावं की नाही विचार करत असते. पण नंतर नंतर तिलाही राहवत नाही आणि फुलतेच शेवटी. मग काय…वाऱ्याची दिशा फिरते एकदम. आता बकुळी सोबत रातराणीचा सुगंध…अहाहा…काय करू यांचं….सांग ना.
आणि ते मोगरा आणि कुंद…यांना विसरून कसं चालेल. यांचं तर तिन्हीसांजेवर राज्यच. प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं, सुगंध वेगळा…पण स्वभाव मात्र एकच… आसमंत प्रफुल्लित करणं. मला तर असं वाटतंय तिन्हीसांजेला देवानं दिलेलं हे वरदान आहे. बघ ना…या कातरवेळी मन हुरहुरायला लागतं, कातळकाळ्या विचारांकडे ओढ घ्यायला लागतं तेव्हाच ही फुलं सुगंधाची बरसात करतात आणि मनाला सावरतात. तिन्हीसांजेचं सौंदर्य खुलवतात. दिवसभराचा शीण आणि कातरवेळी मनावरचं मळभ एकदम दूर होऊन जातं. सांजेला मोगऱ्याकडे कधी पाहिलं आहेस? त्या टपोऱ्या कळ्या माझ्या अंगणात चांदण्या होऊन चमकत असतात रे. कधी आलास तर प्रेमात पडशील मोगऱ्याच्या. येशील का? सांग ना…
कशी आहे ना ही तिन्हीसांज… हिची सुरुवात तर क्षितिजावरच्या रंगात रंगून होते, स्वतःत हरवून होते, सुगंधात दरवळून होते….पण शेवट मात्र… तुझ्या आठवणीतच…
काय करू सांग ना…..
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा