मध्यान्ह
किती आळसावलेली दुपार आहे ही! सगळं कसं शांत, नि:स्तब्ध…सगळ्या परिसरालाच स्टॅच्यू केल्यासारखं. कुठल्याही झाडावर कोणतीही हालचाल नाही, वाऱ्याचा मागमूस नाही की पक्ष्यांचा आवाज नाही. खिडकीतून दिसणारे ते लालभडक गुलमोहर देखील शिक्षा केल्यासारखे ताठ उभे आहेत. काल संध्याकाळी वाऱ्याबरोबर त्याच्या प्रत्येक पाकळीची अखंड बडबड सुरू होती. म्हणून बहुतेक ही शिक्षा मिळाली असेल त्यांना. त्यातली ती एकच वेगळी पण मिरवणारी पाकळी आठवतेय ना…तिचा ताठा उतरवलाय बरं का या उन्हानं. ती ही इतर पाकळ्यांबरोबर निमूट आहे आत्ता. आपण त्या वाटेवर फिरायला गेलो होतो तेव्हा खाऊन बघ म्हणाला होतास ना मला ती पाकळी. एकच का होईना पण नाही खावी वाटली. तिची शोभा तिच्या तिच्या जागीच. नाही मोडावी वाटली. बघ परत काय झालं…. आलासच तू आठवणीत.
सगळं शांत आहे म्हणेपर्यंत एकाचा दंगा मात्र आता कानावर पडायला लागलाय. सिकाडा…. या शांततेत ओरडू की नको असं काही काही वाटत नाही त्याला. बिनधास्त ओरडून मोकळा. आवाज तापायला जरा वेळ लागतोय बहुतेक त्याला. पण एकट्याचा आवाज तरी केवढा रे! आणि जीव तर केवढासा. त्या गुलमोहराच्या अंगावर दिसतही नव्हता तो पटकन. अगदी दोघांनी ठरवून मॅचिंग केल्यासारखं वाटत होतं. तेव्हा व्हिडिओ काढून आणला होता मी त्याचा तुला दाखवायला. केव्हा आठवतंय?…मला त्याला बघायचं होतं एकदा. तुला बरोबर चल म्हणत होते. पण अजून एका शरीराला तापवायचा उन्हाला का त्रास द्यायचा म्हणून तू आला नाहीस. परत तेच…आठवणीचं दार सताड उघडंच. आलासच तू त्यातून….
या शुष्क दुपारी त्या गुलमोहराच्या वाटेवरच्या मातीचा मात्र कण अन् कण तापला आहे. कित्ती छोटुसा त्याचा आकार…पण त्याला थंड करणं मात्र कोणाला सहज शक्य नाही. वळीवच ते करू जाणे. पण येणार कधी तो? मुळात येणार का तो? कसंय ना नातं या मातीचं आणि त्याचं! एरवी कोणी महत्त्व देईल का या वाटेवरच्या मातीला…पण वळीवाचा जरासा शिडकावा जरी झाला तरी एकदम काय जादू होते ना! ते अत्तराचे भाव वगैरे आता गुळगुळीत झालेले शब्द मी वापरणार नाहीये. घाबरू नकोस. तो वळीव आणि मातीचा तो सुगंध…फक्त नि फक्त मूकपणे दीर्घ श्वास घेत अनुभवण्याची ही चैतन्यमय गोष्ट आहे… असं तू म्हणाला होतास ते आठवतंय मला… ते ही आपल्या पहिल्या भेटीत…असाच वळीवाचा पाऊस सुरू असताना. बघ परत…कुठल्या ना कुठल्या मार्गाने डोकावलीच तुझी आठवण….
आता ही अशी रणरणती मध्यान्ह जशी लयाला जायला लागलेय ना तसे पक्षी हळूहळू ताजेतवाने व्हायला लागलेत. शेजारच्या बाभळीवरुन बुलबुल हाक मारतोय. वेड्या राघूंची तारेवर चुळबुळ सुरू झालेय. तो दयाळ तर का दंगा करतोय बघायला पाहिजे जाऊन. घराच्या पूर्वेकडचा तो बहावा… पक्ष्यांचं हे बागडणं बघून खुश झालाय. आता त्याच्यावर पश्चिमेकडे जाणाऱ्या सूर्यकिरणांचं लक्ष गेलंय. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर तो सोनपिवळा बहावा सूर्यकिरणांनी झळाळून गेलाय अगदी. त्या कवितेत म्हटलंय तसं गंधर्वांनी धरतीवरती नक्षत्रांचा झुला बांधलाय असंच वाटतंय.
“नकळत येती ओठांवरती
तुला पाहता शब्द ‘वाहवा’!
सोनवर्खिले झुंबर लेउन
दिमाखात हा उभा बहावा”
कित्ती सुंदर कविता आहे ना! अर्थात तूच ऐकवली होतीस मला. त्याआधी वाचली होतीच. पण तुझ्याकडून ऐकताना… ते ही समोर फुललेला बहावा पाहताना… ती जास्तच आवडून गेली. बहाव्याच्या फुलाच्या स्पर्शासारखंच नितळ, हळुवार होतं तुझं कविता ऐकवणं. आलीच परत….तुझी आठवण रे…
या दाहक दुपारी मनावर हळुवार फुंकर घालणारी एक गोष्ट आठवली अचानक. तुझे ते सारंगाचे शांत सूर. त्यातल्या निषादावर मन फार रेंगाळून राहिलं होतं रे तेव्हा. आरोहातला तीव्र निषाद दुपारची गरमी वाढवतोय की काय असं वाटतंय तोवर त्यावर इलाज म्हणून अवरोहातला कोमल निषाद अवतरत होता. भोवताल शुष्क असला तरी या सुरात ओलावा होता रे. त्यातून बाहेर येऊच नये असं वाटत होतं. त्यात तुझे सूर…मग तर काय!...
एक सांगू? ही मध्यान्ह जरी तापलेली असली तरी तिला तुझ्या आठवणीनं शांत केलंय. डोळ्यांना जरी रखरखीत वाटत असली तरी तिला तुझ्या आठवणीनं हिरवळीचं सुख दिलंय. आली परत परत तरी हरकत नाही मला. तुझी आठवण रे…
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा