रात्र

आत्ता या रात्रीच्या वेळी अंगणात बसलेय. शेजारी कुंद फुलून अगदी मंद दरवळतोय. लगेच मला कोकणातल्या उन्हाळ्यातल्या रात्री आठवल्या. जेवण, अंगणातली शतपावली घालून झाली की तिथल्याच कॉटवर पडून निरखलेलं ते चमचमतं आकाश, वाटेच्या दोन्ही बाजूला असलेला गच्च फुललेला कुंद… त्या शांत रात्री हवेतला दरवळ इतका मोहवून टाकणारा असायचा न की बस! सुगंधाच्या सोबतीनं आकाशातल्या चांदण्या मोजताना वेळ कसा निघून जायचा कळायचं देखील नाही. ओळखीच्या चांदण्यांचं चमकणं रोजच्यासारखंच आहे का बघायला जावं तर कधी कधी त्या अलोट गर्दीत सापडायच्याच नाहीत त्या. मग त्यांना शोधण्यात किती वेळ जायचा. आणि सापडल्या की…. नजरानजर झाल्यावर जास्त तेजस्वी वाटायच्या. वर आकाशात चमचमत्या चांदण्या आणि शेजारी दरवळत्या चांदण्या…निव्वळ सुख! आणि आज इथल्या आकाशात… तेवढ्याच ओळखीच्या दिसताहेत फक्त. बाकी आसपासच्या काय नाराज आहेत की कोण जाणे. त्या सप्तर्षीतले तारे मात्र आज अगदी ओरडून ओरडून हाका मारताहेत असं वाटतंय. खरंतर आज रागच आलाय त्यांचा….म्हणजे त्यातल्या दोघांचा… पुलह आणि क्रतूचा… माहितेय मला तू उत्तरेकडे आहेस…यांनी का सारखं सांगून आठवण करून द्यावी ना पण. चाबरट कुठले…

हा…आता कळलं त्या छोट्या चांदण्या का दिसत नाहीयेत ते. पूर्वेकडून चंद्राची स्वारी वर यायला लागलेय…आज अगदी शहाण्यासारखा स्वच्छ पूर्ण गोल यायला लागलाय. नाहीतर रोजची काय ती नाटकं…थोड्या थोड्या अंगाला काळं रंगवून घ्यायचं! खोडकरपणा कधी संपणार याचा काय माहित. या चंद्राला पाहूनच लाजल्या असणार त्या. घरातली लहान लहान मुलं नाही का कोणी पाहुणा आला की आईच्या पदराआडून लाजत, लपत त्याचं निरीक्षण करतात…तशा या ही लाजताहेत वाटतं. लाजलेल्या चांदण्या किती छान दिसत असतील असं मनात येऊन त्यांना शोधत होते तर अचानकच एक उल्का पडताना दिसली. तिला पाहून किती खुश झाले सांगू! ते सिनेमात दाखवतात तसलं काही केलं नाही बरं का…डोळे मिटून मनात इच्छा धरणं वगैरे. असं काही मी करणार नाही हे तुला देखील माहीत आहेच. पण खुश का झाले सांगू? मला आठवला तो आपण पाहिलेला उल्का वर्षाव…मे महिन्यातलाच. म्हणजे अक्वारिड्सचा ना? नाही रे विसरु शकत असे प्रसंग. बघ मगाशी सप्तर्षी आणि आता उल्का आली तुझी आठवण करून द्यायला. पण हिचा मात्र राग नाही हं आला…

रात्रीचं वातावरण कसं वेगळंच नई. उन्हाने पेटलेला कण अन् कण हळूहळू शांतवत रात्रीपर्यंत सुसह्य होऊन जातो. दिवसभराची दगदग सोसून आपला जीवही आता शांत झालेला असतो. ही आपली विश्रांतीची वेळ असते, तेव्हाच रातराणी मात्र ताजीतवानी होऊन नटूनथटून अंगणात मिरवायला लागते. मग शिणलेल्या आपल्या जीवालाही तिच्या सहवासात थोडा वेळ रमावं वाटतं. मी ही अशीच रमले आज तिच्यात. तिच्या सहवासात जसजसा वेळ गेला तसं वाटायला लागलं वारा आणि रातराणीचा सुगंध आपल्याभोवती फेर धरून नाचताहेत. इतकं छान वाटत होतं ते. पण वेळ पुढे जायला लागली तसं त्या सुगंधाचा आपल्यावर अंमल होतोय की काय असं वाटायला लागलं. मग रातकिडे आले त्यातून जागं करायला. रात्रीच्या शांततेत त्यांचा आवाज म्हणजे…..त्या रात्री पण नाही का…आपण छान बासरीवर बिहाग ऐकत तल्लीन झालो होतो आणि एका रातकिड्याने अचानक दंगा सुरू केला होता. किती शोधलं त्याला रात्री! पण पठ्ठया काही सापडला नाही. पाहिलंस….आता हा रातकिडा घेऊन आला तुझी आठवण…

या रातकिड्यांच्या दंग्यात अजून एक आवाज येतोय आताही…त्या अष्टमीच्या रात्री बघ…आपण एक चक्कर मारायला बाहेर पडलो होतो. तेव्हा ऐकला होता ना तो आवाज. रातवा रे…तूच तर त्याचं नाव सांगितलं होतंस. किती हळुवार आहे त्याचा आवाज. या रातकिड्यांना सांगायला पाहिजे त्याच्याकडून शिकायला. पण घरटं न बांधता मातीत अंडी घालणं म्हणजे धीटच म्हणायला पाहिजे याच्या मादीला. तेव्हा तू म्हणाला होतास…हा निशाचर आहे आणि याला एकट्याला राहायला आवडतं…आणि आज बघ ना…मी ही एकटी. त्याला आठवण येत असेल का कोणाची? काय माहित. पण मला तुझी आठवण करून द्यायला आलाच बघ हा ही. 

या अशा लोभस रात्री तशीही तुझी आठवण येणार होतीच. पण आज काही विशेष आहे वाटतं. कोण कोण आलं बघ ना. आता अजून बघते कोण येतंय. तुझी आठवण घेऊन…


जस्मिन जोगळेकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक