चैत्र वैशाख....वसंत ऋतू
चैत्र वैशाख… वसंत ऋतू
“ऋतुराज आज वनी आला” हे नाट्यपद ऐकलं की कायम मन वसंतात जाऊन नाचून येतं. किंवा वसंत बहरलेला पाहिला की रोजच हे गाणं ओठांवर येतं. या वसंताची ओळख कधी झाली आठवतंय का? लहान असताना शाळेत म्हणवून घ्यायचे ना…चैत्र वैशाख…वसंत ऋतू, ज्येष्ठ आषाढ…ग्रीष्म ऋतू... आपली पिढी तरी हे शिकत मोठी झालेय. पण तेव्हापासून चैत्र वैशाख आणि वसंत ही जोडी कायमची लक्षात राहिली.
चैत्रात अवघ्या सृष्टीवर रंगांची बरसात करणारा हा वसंत खरंच ऋतूंचा राजा आहे. हा अगदी लोभसवाणा आहेच, पण याला जास्त लोभस केलंय ते शिशिरानं. बघा ना…शिशिरात जर पानगळ झाली नाही तर वसंताचं वैभव खुलेल का? हे गळणारं प्रत्येक पान जणू नाचत सांगत असतं आपल्याला…वसंत येणार आता वसंत येणार. तेव्हाची माघ फाल्गुनातली ती बोचरी थंडी, पानगळ होऊन सिद्धावस्थेकडे झुकलेला तो निसर्ग…हे अर्थातच सृष्टीचं थोडं वेगळं सौंदर्य आहे. पण त्यानंतर येणारी चैत्रपालवी सृष्टीला आणि तनामनाला देखील किती टवटवीत करते! चैत्रपालवी म्हटलं की पटकन डोळ्यासमोर येते ती पिंपळाची गुलाबी, लालसर निरागस बाळपालवी. त्यांचा मुलायम स्पर्श झाला की वाटतं एखाद्या बाळाच्या गालावरुन हात फिरतोय की काय… वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबरची त्यांची नाजूक सळसळ बघत बसावी अशीच.
या वसंताचं स्वागत करायला पहिल्यांदा सजूून येतात ती सावरीची फुलं. मला आठवतंय लहानपण. हे झाड त्याच्या हिरव्या पानांचा भार जेव्हा वाहत असायचं तेव्हा काही फारसं याच्याकडे लक्ष जायचं नाही. पण एकदा का पानगळ होऊन हे लालचुटूक फुलांनी मिरवायला लागलं की यांच्यावरून नजर हटायची नाही. मागे निळंभोर आकाश असेल तर मजा औरच! फुलांनी डवरलेल्या झाडावर मग कितीतरी पक्ष्यांची ऊठबस सुरू व्हायची. ते वैभव पाहून जीव वेडा व्हायचा अक्षरशः! झाडाखाली गळून पडलेली फुलं गोळा करणं तर उद्योग असायचा. पाकळ्यांच्या मुळात हिरव्या भागाच्या आत एक गमंत असायची. फूल सुटं केलं की त्या हिरव्या भागाच्या आत सुंदर पिवळसर सोनेरी रंगाची मखमल असायची. ती हलक्या हातानं त्या हिरव्या भागापासून वेगळी केली की तिचा मागचा भाग गोंदासारखा चिकट असायचा. ते वहीच्या पानावर चिकटवत त्याच्या वेगवेगळ्या आकारांनी आम्ही वही सजवायचो. नंतर सावरीची बोंडं फुटली की त्यातून निघणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करायचो. काय काय गमतीजमती होत्या. मग जरा मोठं झाल्यावर कळलं की या सावरीला संस्कृतमध्ये शाल्मली म्हणतात. किती छान नाव आहे ना! त्या फुलांच्या स्पर्शाइतकंच मृदू, मुलायम. याच्या प्रेमात पडायला अजून एक कारण…कसं ना.. वसंत म्हटल्यावर एकेका आठवणींचे रंगही खुलून यायला लागतात….म्हटलं ना…हा वसंत आहेच टवटवीत करणारा…
वसंतातल्या पळस, गुलमोहर, बहावा, तामण, शिरीष, जॅकरांड्रा या मंडळींचं सौंदर्यही एकमेकांपेक्षा वेगळं. कित्ती रंगबिरंगी असावं या सृष्टीनं! तामणच्या फुलांची रंगसंगती तर काय! चुण्या चुण्या असलेल्या झालरीसारख्या जांभळ्या रंगाच्या शेडमधल्या पाकळ्या आणि त्यांच्या मध्यात कॉन्ट्रास्ट रंगाचे पिवळेधम्मक पुंकेसर…फूल पाहिल्यावर एकदम शांत वाटून जाणार. उगाच नाही राज्यपुष्प म्हणून त्याला नावाजलं… फुललेला पळस म्हणजे तर उत्सवच असतो फुलांचा…. फ्लेम ऑफ दि फॉरेस्ट… नावातच काय जादू आहे! बहाव्या बद्दल काय बोलणार… काही गोष्टी अशा असतात की त्यांच्याबद्दल काssही न बोलता फक्त त्यांच्यावर भरभरून प्रेम करावं…बहावा तसाच. सोबतच मोगरा, कुंद, सुरंगी… कोणाकोणाबद्दल किती काय काय लिहिणार! हा वसंत आणि वसंतातला निसर्ग म्हणजे फक्त नि फक्त वेड, सुख, आनंद…चैत्र संपून वैशाख सुरु झाला तरी यांची रंगांची उधळण सुरूच राहते. वैशाखी दुपार कितीही तापली तरी हे मात्र यांचा दिमाख सोडत नाहीत. पण त्यामुळंच तर तो काळ थोडा सुसह्य होतो.
पण हा वसंत फक्त नेत्रसुखच देत नाही… तर जीभ आणि पोटालाही सुखच सुख देतो. चैत्र संपून वैशाखाच्या आगमनासोबत येतात ते आंबे, फणस, जांभूळ, करवंद…पाणी सुटतं ना नुसती नावं ऐकूनही. वैशाख जरी वणव्यानं पेटला तरी सजतो या फळांनी. रंगांच्या बरसातीबरोबरच वेगवेगळ्या रसांचीही लयलूट. ही नावं लिहिता लिहिता परत बालपणीच्या आठवणी सरकायला लागल्या डोळ्यांसमोरुन. डोंगरात जाळ्या शोधून खाल्लेल्या करवंदांची चव रेंगाळली जीभेवर. त्यातही एकमेकाला कोंबडा की कोंबडी विचारत, काय आहे बघत खाल्लेली करवंद म्हणजे तर…अहाहा! आधी पोटभर खायची. मग अरे…घरच्यांना पण नेली पाहिजेत थोडी म्हणून अजून काढायची आणि पानांचे द्रोण करत जपून घरी आणायची. सोबत त्याचा तो चीक…मजा होती. वैशाख तापून तापून दमला आणि ज्येष्ठ आलो आलो म्हणत आला की नंतर मग ही मंडळी काढता पाय घेणार आणि आपण यांना पोटभर खाऊन तृप्त झालो असलो तरी पुढच्या वर्षीपर्यंत यांची आतुरतेने वाट पाहत बसणार.
आणि वसंत म्हटलं की एक आवाज हवाच…. कुहू कुहू…त्याशिवाय वसंत हा वसंत वाटतच नाही. या आवाजाचा मालक कोकिळ असतो बरं का…कोकिळा नव्हे. पण एक खरं सांगू…सुरुवाती सुरुवातीला हे कुहू कुहू लांबून येत असेल तर ऐकायला छान वाटतं. पण जर हे महाराज कानाशीच सारखा गजर करायला लागले तर मात्र….अरे वसंता, गप्प कर ना याला. असंच वाटायला लागतं. त्यापेक्षा किती मधुर गाणारे पक्षी आहेत. वसंतात फुलांचा सोहळा सुरू झाला की छोट्या जीवांची चंगळ असते. फुलांचा, पक्ष्यांचा मेळा बघायला मजा येते. प्रत्येकाचे रंग वेगळे… मधेच वेड्या राघूंची तारेवर कसरत चालू असते. खरंतर हिवाळा संपता संपता कोतवाल दृष्टीआड होतात. पण तो ही सामोरा येतो कधीतरी. संध्याकाळी गार वाऱ्याबरोबर बाभळीवरुन अचानक ऐकू आलेला सातभाईंचा दंगाही आवडून जातो. उन्हाला पाठ दाखवत उभे असताना जर समोर छोटा सनबर्ड आला तर त्याच्या उन्हात चमकणाऱ्या रंगानं हरखून जायला होतं. त्यासोबतीने फुलांभोवती भिरभिरणारे छोटे छोटे कीटक आणि भुंगे. एकूणच चैतन्याने भारलेली असते सृष्टी.
पण वैशाखातली दुपार मात्र या सगळ्यांपासून थोडी अलिप्त वाटते. एकदम स्तब्ध…कोणाशीच कसला संबंध नसल्यासारखी. दुपारही वामकुक्षी घेत असते की काय जाणे. नुसती शांतता भरुन राहिलेली असते भोवतालात. वारा नावाची काही चीज आहे की नाही असा प्रश्न पडायला लागतो. झाडांची इवली इवली पानं तापलेल्या दुपारला घाबरून अजिबात न हलता गप्प असतात. पक्षी झाडांच्या आडोश्याला लपून बसतात…हुं की चुं नाही. एखाद्या वर्गाला शिक्षक ओरडले तर कशी शांतता असते. मग बराच वेळ पहिलं कोण बोलतंय याची वाट बघत प्रत्येक विद्यार्थी बसलेला असतो. एकदा का कोणी सुरुवात केली की अख्खा वर्ग परत सुरू होतो. तसं पक्ष्यांमध्येही असतं बहुतेक. यात बुलबुल आधी चुळबुळ करतात. त्यांचा आपापसात डोंगर की पाणी खेळ सुरू होतो. या झाडावरून त्या झाडावर… त्या झाडावरून या तारेवर. मग हळूहळू सगळी जनता बाहेर यायला लागते. तोवर दुपारही थंड व्हायच्या दिशेने निघालेली असते. काय ना एकेकाचा स्वभाव.
वसंतात हा निसर्ग खुश होऊन वेगवेगळे रंग लेऊन आपल्या समोर येत राहतो. पण फक्त सौंदर्य हाच विषय नाही बरं का. जर त्याच्याकडे नीट पाहिलं, पूर्वीच्या लोकांचे ठोकताळे नीट ऐकले तर हा निसर्ग खूप काही शिकवत असतो. त्याच्या फुलण्यातून, फळण्यातून आधीच काही सूचना देत असतो आपल्याला. आता हेच बघा ना….ही पळस, पांगेरा, गुलमोहर, बहावा वगैरे जर त्यांच्या नेहमीच्या वेळेआधी फुलले तर त्यावर्षीचा उन्हाळा तीव्र असतो…जर जांभूळ, करवंद चैत्राच्या शेवटीच लगडले तर त्यावर्षी पाऊस लवकर येतो. वैशाख ज्येष्ठाच्या सीमेवर आले तर पाऊस उशिरा. निसर्गातला बारीक सारीक प्रत्येक घटक खूप आपुलकीनं काही ना काही देत असतो आपल्याला. जपलं पाहिजे हो या निसर्गाला….
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा