पानगळ
कधी चालली आहेस या अशा वाटेवरुन? अगं अगं….इतक्या भरभर चालून या वाटेचा, आसपासचा अनमान नको गं करु. जरा बघ ना आजूबाजूला. गर्द हिरवाई आणि तेव्हाचा तो ओलेता वास जरी येत नसला तरी हे सौंदर्यही घे ना टिपून.
त्या गळून पडलेल्या पानांच्या पिवळसर तपकिरी छटा पाहिल्यास का? मातीच्या अधीन झाली आहेत गं ती…मातीत मिसळून जायचंय त्यांना. जणू सामंजस्याचा करार झालाय त्यांच्यात. पाळायला तर हवा ना तो! म्हणून ही पानं मातीशी एकरुप व्हायला बघताहेत….‘मी’ पण सोडून. जमेल असं आपल्याला? जाऊ दे…हा विचार नको करू आत्ता. फक्त नि फक्त आनंद घे याचा…भोवताल विसरून. सगळा साजशृंगार उतरवल्यावर उरणारं हे साधेपण देखील छान असतं गं. जरा प्रेमानं बघ ना त्यांच्याकडे. नीट लक्ष देऊन ऐक त्यांचे हुंकार. उद्या कदाचित ते ऐकून शब्द उमलतील तुझ्या मनात.
एखाद्या निष्पर्ण झाडाखाली शांत उभी रहा क्षणभर. ही स्तब्धताही अनुभवता यावी लागते गं. झाडाच्या त्या खडबडीत खोडाला टेकून डोळे मिटून उभी रहा आणि घे अनुभव या स्तब्धतेचा…श्वासाकडेही दुर्लक्ष करुन. कदाचित सुरुवातीला एक सरलेपण दाटून येईल मनात.. मारव्याचे सूर ऐकून वाटत ना तसं. पण उघडू नकोस डोळे. बघ हळूहळू आतून वाटेल शांत… हे सरलेपण जाणवलं तरी एक सांगू….ही उधळत येणाऱ्या वैभवशाली वसंताची चाहूल आहे गं. निसर्ग जसा या अवस्थेचा आनंद घेतोय… घे ना तसा तू ही. कसं सांगू तुला…प्रत्येक अवस्थेची एक वेगळीच मजा असते गं.
आणि ते निळंभोर आकाश बघतेयस…. एरवीच्या हिरव्यागार गर्दीतून दिसलं असतं का? त्या कॅनव्हासवर ही निष्पर्ण झाडं, वेडीवाकडी चाल असलेल्या या फांद्या, एकमेकांची विचारपूस करणाऱ्या या लहान लहान डहाळ्या काय सुरेख दिसताहेत! आणि कुठूनतरी येणारे पक्ष्यांचे गोड बोल ऐकतेयस ना…असं वाटतंय या डहाळ्याच सृजनाचं गाणं म्हणताहेत. जणू झाडांसाठी डोहाळे गीत गाताहेत. ऐक जरा!….
अजून कित्ती कित्ती सांगता येईल गं. पण खरंतर काही गोष्टी सांगायच्या नसतात, त्या फक्त स्वतः अनुभवायच्या असतात.
सांगून कळणं आणि अलवार भावणं यात फरक आहेच ना…संगीत नाही का…कळण्याच्या मागे धावतो का आपण? ते भावण्याच्या दृष्टीनं ऐकलं की झालं काम. फक्त एक नजर….एक प्रेमाची नजर फिरव गं यावरुन. हा निसर्गच तुला भरभरून सांगेल सगळं काही. बघ जमतंय का….
जस्मिन जोगळेकर
डोहाळे गीत... किती छान कल्पना.. सुंदर
उत्तर द्याहटवा🙂 थँक्यू
उत्तर द्याहटवा