जलनिधी

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे समुद्र किनाऱ्यावर गेले फिरायला. तू सोबत नाहीस असा कालचा आठवा दिवस होता. परत कधी येशील माहीत नाही आणि मी तुला येण्याचा आग्रहही करणार नाही. पण मनाला तुझी ओढ आहे हे तुला माहीत आहेच. ही ओढ नावाची गोष्ट अशी का असते? एकदा लागली की अस्वस्थ करून जाते मनाला. मग ती एखाद्या व्यक्तीची असो वा वस्तूची वा निसर्गाची. आत्ताही बघ ना…या समुद्राच्या, पाण्याच्या ओढीनेच इथे येऊन पोहोचले आहे. समुद्र…हा स्वतः तर वेडा आहेच पण स्वतःच्या प्रेमात पाडून इतरांनाही वेड लावतो. इथं आलं की वेळ कसा निघून जातो कळतही नाही; तरी सूर्याचा अस्ताला जाण्याचा प्रवास समोर बघत असतो बरं का.  

कालची संध्याकाळ कशी होती सांगू? कालच्या त्या वेळेला तरी कातरवेळ म्हणावं वाटलं नाही. कातरवेळ म्हटलं की हुरहूर, उदासी हे शब्द येतात तिचं बोट धरुन. पण कालची सांजवेळ अगदी वेगळी होती. किनाऱ्यावर उभं राहून सूर्यास्त पाहताना मन एकदम शांत होतं. कोणत्याही विचाराला आत शिरायला अटकाव होता. तो किनारा, त्या लाटा, तो सूर्य आणि मी एवढंच भान होतं. नाही म्हणायला अधूनमधून ढग येत होते माझ्या आणि सूर्याच्यामधे. काही त्रास नाही रे पण बिचाऱ्यांचा. स्वतःचं सौंदर्य वाढवायला या निसर्गाकडे किती सुंदर आभूषणं आहेत नई…आणि काल त्या ढगांनाही जरा मिरवायचं होतं वाटतं. या ढगांनी किरणांकडून आपल्या कडा सोनेरी रंगात रंगवून घेतल्या होत्या. कित्ती छान दिसत होतं ते! आयलायनर लावल्यावर एखाद्या सुंदरीचे डोळे कसे उठून दिसतात ना तसे…. विचारांना कितीही अटकाव केला तरी कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या ओळी मनात रुंजी घालायला लागल्या बघ. 

“क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी”

मग काय…. संपूर्ण कविता लाटेसारखी कधी लहरत आली कळलंच नाही. आठवतेय ना गाजेला सोबत घेऊन आपण ही कविता म्हटली होती. 

कालच्या संध्याकाळचा आज विचार करताना सारखं मनात येतंय या समुद्राच्या प्रेमात कशी काय पडले मी…एक गमंत सांगितली तर हसशील तू. लहान असताना मी याच समुद्राला खूप म्हणजे खूप घाबरायचे. कायम किनाऱ्यावरच्या मर्यादवेलीच्या सोबतीने मी उभी असायचे. बरोबरीची मंडळी लाटेने वाळूवर काढलेल्या नक्षीपर्यंत जरी गेली तरी माझा आरडाओरडा सुरू व्हायचा. मग अचानकच काय झालं कोण जाणे…. एका समुद्रकिनाऱ्याने मला भुरळ घातली आणि माझ्या मनातली भीती घालवून टाकली. तरी पाण्यात भिजायला, दंगा करायला अजिबातच आवडत नाही मला…तुला माहित आहेच. किनाऱ्यावर जाताना कायम मनात येतं की, तिथं शांतपणे नक्कीच आपल्याला काहीतरी लिहायला विषय सुचेल. पण तिथं पोहोचल्यावर मात्र.. सगळं सगळं कोरं होऊन जातं. काही सुचणं तर दूरच, पण आपलं असणंही विसरुन जातं ना… आणि परतताना इतकं काही भरुन घेतलेलं असतं की, लिहिता न आल्याचं रितेपण उरतच नाही. तिथं जे भरलं गेलेलं असतं ते बाकी कोणासाठी नाही फक्त माझं माझ्यासाठी असतं. जाणवलं असेल ना तुलाही हे असं?

समुद्राचं ते भव्यदिव्य रुप तर कितीही साठवून ठेवलं तरी अपुरंच पडतं, हो ना? काही केल्या समाधान होत नाही. त्यातही सकाळचा समुद्र वेगळा, अस्ताला दिसणारा वेगळा आणि पौर्णिमेचा तर काय भन्नाटच. आकाशातली चमचम पहावी की पाण्यातली…अशा द्विधेत पकडणारा. पण…पण किनारा शांत हवा त्यासाठी. इतर आवाजांच्या दंग्यात जर समुद्राची गाज विरुन गेली तर त्यात काय मजा! प्रत्येक लाटेची वाळूवरची हलकी, फेसाळती किनार जर भरपूर पायांखाली दबून गेली तर त्यात काय मजा! ओल्या वाळूतल्या छोट्या छोट्या बिळातून बाहेर येऊन वेडीवाकडी पळापळ करणारे खेकडे जर आतच लपून राहिले तर त्यात काय मजा! हळूहळू अस्ताला जाणारा सूर्य आणि त्याच्या किरणांनी लाटांवर सांडलेला सुवर्णसडा प्रत्यक्ष न पाहता कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी बघितला तर त्यात काय मजा! मला माहितेय तू म्हणशील प्रत्येकाची आवड वेगळी. मान्य…पण माझ्या या आवडींमुळेच मला वेगळं म्हणतोस ना तू… असो.

एक सांगू…समुद्रावर जीवापाड प्रेम आहेच माझं; पण एकूणच पाण्याचं हर एक रुप आवडतं मला. पाणी... नुसतं पाणी असं म्हटलं तरी डोळ्यापुढं पाण्याची वेगवेगळी किती रुपं त्या प्रवाहासारखीच झर्रकन् सरकून जातात. कधी शांत जलाशय ध्यानमग्न साधू सारखा भासतो आणि मन शांतावतं, उंच डोंगरकड्यावरून झेपावणारं पाणी कधी बिनधास्तपणाची जाणीव करुन देतं, छोट्या छोट्या दगड-गोट्यातून वाहणारं पाणी दिसताच एखाद्या अवखळ बाळाची आठवण मनाला गुदगुल्या करुन जातं. शांत, विशाल सागर बघून कधी एकदम कोषात गुरफटून घ्यावं वाटतं. तर तोच खवळलेला समुद्र कुठंतरी पोटात गोळा आणून जातो. कोसळणाऱ्या सरी बघून लग्गेच मनात आठवणींच्या सरी बरसायला लागतात. पाणी तेच...पण त्याची रुपं मात्र अगदी वेगवेगळ्या मूडमध्ये घेऊन जाणारी..
आपलं यावरही बोलणं झालं होतं ना एकदा. या प्रत्येकाला लांबून न्याहाळताना कसं कोण जाणे भोवताल विसरुन जातो आपण. या पाण्याचं वागणं आवडतं बघ मला. ते जिथून वाहत असेल तिथलं रंग-रुप धारण करतं. झाडीतून वहात असेल तर तिचा हिरवा रंग घेईल, किंवा विस्तीर्ण मोकळ्या पठारावरून वहात असेल तर आकाशाचा निळा रंग धारण करेल. पण बाहेरुन जरी वेगळं दिसत असलं तरी आतून मात्र ते आपलं स्वत्व टिकवून असतं असं कायम वाटतं मला. आत्ता समोर नाहीयेस म्हणून बरं…नाहीतर तशीच मान तिरपी करुन, हाताची घडी घालून ऐकत बसला असतास, हो ना? 

तुला कपिला नदी आठवतेय का? तिच्या काठानं जंगलात किती फिरलो होतो आपण…आणि त्यावरचा तो साकव…त्यावर बसून जंगलाचा तो विशिष्ट वास श्वासात भरुन घेत कपिलेचा अगदीच शांत, छोटा प्रवाह बघत कितीतरी वेळ तसेच शांत बसून होतो ना. मान वर न करताही आसपास काय काय घडतंय ते नदीच्या पात्रात बघत होतो आपण. इतकं स्वच्छ पाणी की प्रत्येकाचं प्रतिबिंबही स्वच्छ दिसत होतं. आणि त्यातले ते आकारानं प्रचंड मोठे महाशिर…झुंडीने जवळ आल्यावर आधी पोटात गोळाच आला माझ्या. पण किती प्रेमळ होते ते! त्यांच्या मऊ मऊ अंगावरुन हात फिरवताना काय आठवत होतं सांगू? सावरीच्या फुलातली मखमल…किती वेळ घालवला होता आपण त्यांच्यासोबत ना…किती जणांना प्रेमानं जवळ घेतात ना या नद्या! या नद्या तरी कशा बघ ना… समुद्राचं वेड असणाऱ्या… ‘तुझ्यासारख्याच‘ म्हटलेलं ऐकलं बरं का मी. पण बघ ना स्वतःचं मधुर पाणी खाऱ्या पाण्यात मिसळून टाकायला आतुर झालेल्या. त्याच्या ओढीनं किती लांबचा, खडतर प्रवास करतात त्या. कधी स्वतःला उंच कड्यावरुन लोटून देऊन, कधी दगडधोंड्यातून वाट काढत…पण प्रवाह काही थांबवत नाहीत. एवढे कष्ट घेऊन आता नक्कीच समुद्राशी मीलन होणार याची शाश्वती मिळाली की मग शांतपणे वाहत पुढे जाणार. एवढ्या अथांगतेत सामील व्हायचं म्हणून त्या आपलं आकारमान किती वाढवतात ना मुखापाशी. नर्मदेचं पात्र आठवतंय मला. नजरेत मावत नव्हतं. पाण्याच्या प्रेमात पडायला हे ही एक कारण. नावं तरी किती छान असतात ना बऱ्याचशा नद्यांची. नर्मदेचंच बघ ना…रेवा. कित्ती गोड नाव आहे. तशीच कालिंदी. हे नदीचं नाव ऐकल्यावरच आवडून गेलं होतं आणि त्यात माझ्या आवडत्या गौरी देशपांडेंच्या पुस्तकातही हे नाव आहे याची जाणीव करून दिली होतीस तू. तेव्हापासून तर जास्तच जवळचं वाटायला लागलं ते. 

नदीच्या वळणावळणाच्या प्रवासाबद्दल कुतूहल वाटतं मला. कुठून कुठून वाट काढत पाणी वाहत असतं. ते ही सोबत आसपासचा परिसर समृद्ध करत. नदीचा हा प्रवास पक्ष्यांना उडताना किती छान दिसत असेल नई! कधी कधी त्यासाठी पक्षी असायला हवं होतं असं वाटतं आणि असं वाटायला लागलं की कल्पनेच्या भराऱ्या कुठपर्यंत जातील सांगता येत नाही. तुला माहिती आहेच ते. वेडेपणा म्हणतोस ना त्याला! पण खरंच मला एकदा उगमापासून मुखापर्यंतचा नदीचा प्रवास वरुन बघायची खूप इच्छा आहे. अधूनमधून झाडीतून लपून वाहणारं पाणी, मधेच उघडपणे वाहणारं पाणी, कधी फेसाळणारं पाणी बघायला कसं वाटेल ना…आपल्या घरट्यामधून बाहेर पडल्यावर नदीने कसं, कुठं जायचं हे ठरवलेलं नसतंच ना. वाटेत येईल त्याच्याशी मग ते जंगल असो नाहीतर डोंगर, खडक गोड बोलून ही आपला मार्ग रेखत पुढं जातच राहते. अजून एक गमंत बघ ना…वाटेत दुसरी नदी भेटली तर त्यांची मैत्री लगेच होत असेल का? मला वाटतं काहीजणी सुरुवातीला जरा लांब, फटकून वागत असतील एकमेकींशी. दिसतात ना पाण्यात दोन प्रवाहांचे दोन रंग वेगळे. मग आता एकत्र जाण्याशिवाय पर्याय नाही म्हटल्यावर मैत्रीचा हात मिळवत असतील त्या. दोघींचं ध्येय एकच असतं ना…वाट मिळेल तिथून, वाट काढत वाहत राहणं. पण बहुतांश नद्या समुद्राला मिळत असल्या तरी सगळ्या काही मिळतातच असं नाही. अशा नद्यांना धराशायी म्हणतात ना? तूच सांगितलं होतंस एकदा. धराशायी नदी…धरेवरच विसावणारी…किती छान वाटला होता हा संदर्भ मला! 

मला माहितेय…तू इथं असतास तर घरामागच्या नदीबद्दल किती बोललो असतो आपण. अर्थात ती नदी तर कधी विसरली जाणार नाहीच. अगदी लहानपणापासून त्या पाण्याची एवढी ओळख की, नदीवर गेल्यावर पाणी हळूच हसून आपलं स्वागत करतंय की काय वाटायचं. डोंगरांमधून खळाळत येणारं पाणी, त्यातल्या त्या मोठमोठ्या शीळा, त्यावर बसून पाण्यात पाय सोडले की पायाला गुदगुल्या करणारे इटुकले मासे, तिथेच बसून मूकपणे घेतलेला निसर्गाचा आस्वाद, पावसाळ्यात रोरावत येणारं मातकट पात्र सगळं सगळं अजून आठवणीत आहे. नदीच्या पलीकडे असणारे ते हिरवेगार डोंगर… काय दृश्य असायचं ते! आता नदीकडे जायला लागल्यावर या आठवणीच पायघड्या बनून स्वागताला हजर असतात. माझ्यासारखंच त्या डोंगरानेही नदीची वेगवेगळी रुपं पाहिली असतील नई. पावसाळ्यातली लाल पाणी घेऊन वाहणारी, एरवीची शांत, तिच्या तिच्या वेगाने वाहणारी आणि उन्हाळ्यातली कोरडीही. पाण्यानं संपन्न असलेली नदी कोरडी पडलेली बघवत नाही रे. आपल्या घशाला कोरड पडली की कधी एकदा पाणी पितोय असं होतं. त्या कोरड्या पात्रालाही तसंच वाटत असेल ना. पाण्याशी गेल्यावर मी जशी खुश होते तसं या नितळ पाण्यातला प्रत्येक दगडही खुश झालाय की काय असं वाटतं मला त्यांच्याकडे बघून. किती नितळ असावं ना एखाद्यानं…या पाण्याशी काय नातं आहे कोण जाणे…

आत्ता का कोण जाणे पण बोरकरांच्या “गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले”…कवितेची आठवण आली आणि पाठोपाठ पाऊसही मनात बरसायला लागला. पाऊस या शब्दातच कशी जादू आहे ना! लगेच मनात सरीवर सरी हळुवार बरसायला लागतात, पावसाचा नाद कानात घुमायला लागतो. पाऊस म्हणजे सृजन…पाऊस कधी कविता होऊन शब्दांसोबत हातात हात घालून येतो, कधी संगीत होऊन सुरांबरोबर आलाप गुणगुणत येतो. तो त्यावर्षीचा पहिला पाऊस आठवत असेल ना तुलाही… बाहेर पाऊस पडत होता आणि आपण झोपाळ्यावर बसून पावसाच्या कविता, गाणी म्हणत होतो. कोण जिंकतंय अशी जणू पावसाशी स्पर्धाच लावली होती. तेव्हा पहिल्या पावसात भिजायचा आग्रह करत होतास मला. का माहीत नाही पण मला कधी पावसात भिजावं वाटलं नाही. पाणी संथ असो वा खळाळणारं असो, मला त्याच्याशी कधीच मस्ती करायला आवडत नाही. उलट त्याच्या संगतीत मी शांत होऊन जाते. तुला सवय नव्हती तेव्हा माझं असं वागणं विचित्र वाटायचं ना? पण आता बघ ना… तुलाही असंच शांत बसायला आवडायला लागलं आहे. फक्त पाणीच नाही तर सगळा निसर्गच असा आहे रे! आपल्याला आतून शांत करणारा! विचार करायला लागलं की, कधी कोण पटकन मनात डोकावून जाईल काही सांगता येत नाही. आठवतंय का पूर्वी एकदा आमच्या कोकणातल्या पावसाची मला खूप आठवण आली म्हणून त्याला मी पत्र लिहिलं होतं. माझं मलाच हसू आलं होतं नंतर. तुला माहित आहेच की माझा हा वेडेपणा. पण माणसांची जशी आठवण येते तशी मला यांची येते…काय करु मी… एकदा तर अचानक दुपारी नर्मदेची आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं होतं. काहीतरी ऋणानुबंध असतील का रे? कोकणातला पाऊस आठवण येण्यासारखाच आहे हे तू ही कबूल करशील. ओटीवरच्या झोपाळ्यावर बसून तिथला पाऊस न्याहाळणं यासारखं सुख नाही. सगळा परिसर एकदम ताजातवाना करून टाकतो हा पाऊस. न्हाऊन शुचिर्भूत झालेल्या एखाद्या नवविवाहितेसारखी भासायला लागते ही सृष्टी. 
“दिशा दिशातून आषाढाच्या श्याम घनांना पूर 
तृणाप्रमाणे मनेही झाली चंचल तृष्णमयूर”...असा हा आषाढातला पाऊस. उसंत न घेणारा… अशावेळी कौलावरून ओघळणाऱ्या पागोळ्या बघत बसणं हा तर माझ्या प्रेमाचा विषय. या पागोळ्यांच्या माळा ल्याव्या वाटतात. पावसाचा जोर कमी होत तो थांबत आला की, अंगणात साचलेल्या पाण्यात टुपुक टुपुक आवाज करत पडणारे थेंब…सुरुवातीला द्रुत लयीत पडणारे थेंब हळूहळू विलंबित लयीत रेंगाळत थांबतात. हा आवाज म्हणजे म्हणजे थकलेल्या पागोळ्यांचे हुंकार असतील असं वाटतं. इतक्या जोरात कोसळला तर थकणारच ना! 

आषाढातला पाऊस आणि श्रावणातला पाऊस दोघांच्या स्वभावात किती फरक आहे ना! आषाढातला पाऊस एखाद्या नवतरुणासारखा जोशात येतो. आकाशात काळया ढगांची गर्दी पावसाची वर्दी घेऊन येते. दिवसाच रात्र झाली की काय अशी शंका यावी इतका काळोख पसरतो. सोबत गडगडाट, विजांचे ढोल आणि फटाके. आत्ता मनात आलंय ना कोसळायचं…मग टाकू कोसळून. नंतर काय होईल याचा विचार न करता बिनधास्त कोसळून घेतो. विशी पंचविशीमधले तरुणही असेच ना…पण कधी कधी भीती वाटावी असा कोसळतो. मग त्या पाण्याचं प्रेम कुठल्या कुठं जातं आणि ह्या कोसळधारा कधी एकदा थांबताहेत असं होतं. अशावेळी वारा तरी काय कमी आगाऊपणा करतो होय! उभ्या झाडांनाही कमरेत वाकायला लावतो शहाणा. त्यात तू सोबत नसलास तर काय झालंच…जीव आपला मुठीतच. एक रात्र कोकणात अनुभवली होती आठवतेय का? जोराचा पाऊस, लाईट गेल्यामुळे मिट्ट काळोख आणि समोर.. अगदी रस्ता ओलांडून पलीकडे सुरुच्या बनातून घुमणारी वाऱ्याची शीळ आणि त्यापुढं भरतीमुळे उधाणलेला समुद्र… पहिल्यांदा छानच वाटलं रे हे सगळं. पण नंतर ती गाज ही चिडल्यासारखी वाटायला लागली होती. त्यावेळी कधी एकदा दिवस उजाडतोय असं झालं होतं मला. जरा वेळानं पाऊस बंद झाल्यावर मी ‘हुश्य…उघडला बाई एकदाचा पाऊस’ म्हटल्यावर काय हसायला लागला होतास…का तर तुमची विनोदबुद्धी जागी झाली होती रात्री. पाऊस बंद झाल्यावर ‘उघडला’ असं का म्हणतो आपण असा पीजे मारला होतास. कुठून काय आठवायला लागतं बघ विचार करत बसलं की. काय करणार…एकटा जीव रमतो आपला त्यातच. तर मी काय सांगत होते…आषाढ आणि श्रावणातला पाऊस… श्रावणातला पाऊस म्हटलं की, रिमझिम सरी, ऊन पावसाचा खेळ, आकाशातले सप्तरंग मनात शिरकाव करतात लगेच. हा पाऊस कसा समंजस वाटतो. आषाढातल्या पावसासारखा बेधुंद नसतो हा, तर एक शिस्त असते त्याच्या अंगात. मोहिनीच्या रुपातच येतो हा जणू. कवींनी कितीही कविता केल्या तरी याला मात्र अजून अजून आपलं कौतुक करवून घ्यायचं असतं त्यांच्याकडून. म्हणून सुंदर आविष्कार दाखवत असतो. 
“लपत छपत हिरव्या रानात
केशर शिंपित श्रावण आला
इंद्रधनुच्या बंधित कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला”...वर्णन करू तेवढं थोडंच! 
कसा आहे ना हा पाऊसही! एक वेगळीच नजाकत आहे यात. हा रिमझिम पाऊस थांबला की पानांवरुन ओघळणारे थेंब असतात ना ते गोळा करुन त्यांचे मला पैंजण करावेसे वाटतात. ते घालून नाजुकतेने चालायला लागलं की त्यातून पावसाच्या सरींचा रिमझिम नाद ऐकू येईल वाटतं. ते घालून मऊशार गवतावरुन चालताना जर त्यावर कोवळ्या सूर्यकिरणांची नजर पडली तर…सप्तरंगांची एक नाजुकशी लहर उमटेल नई त्यात! होईल का ही इच्छा कधी पूर्ण? 

तू सोबत नाहीस असा कालचा आठवा दिवस होता. परत कधी येशील माहीत नाही आणि मी तुला येण्याचा आग्रहही करणार नाही. असं मगाशी म्हटलं खरं…पण आता मात्र तीव्रतेनं आठवण यायला लागली आहे तुझी. हे पाणी आहेच बघ असं खट्याळ! एकटीनं त्याला आठवत बसावं म्हटलं, त्याच्या काठावरुन कल्पनेत फिरुन यावं म्हटलं तर ते तुझीही आठवण घेऊन येतं सोबत. तेच तू सोबत असताना, प्रत्यक्ष याच्या काठावर बसलेलं असताना मात्र अगदी अबोल होऊन जातं आणि आपल्यालाही तसंच करतं…अबोल. अशावेळी आपण पंचतत्त्वाचा भाग आहोत याची जाणीव होऊन गंभीर होतं ते की काय कोण जाणे. आपणही पाण्याकडे खरंतर गंभीरतेनं बघायची गरज आता वाढायला लागली आहे. पाण्याचं निर्मळ, नितळ सौंदर्य कुरुप होताना बघवत नाही रे. बिचाऱ्याच्या जीवावर किती जीव पोसत असतात आणि आपण त्याच्याच जीवावर उठतो. ओरडून सांगावं वाटतं…समुद्रालाही बघू द्या की नदीच्या पाण्याचं सात्त्विक रुप. पण नाही…किती वाईट! बघ ना…प्रत्येकवेळी हा विषय निघतोच ना शेवटी. पण आज यावर बोलायला, निराशा बाहेर काढायला तू नाहीस सोबत… ऐक ना…कधी येशील रे परत? 

एक सांगू? पाण्याच्या सहवासात जशी आतून शांतता अनुभवते ना मी…तशीच ती तुझ्या सहवासातही जाणवते. म्हणूनच कदाचित एकाच्या आठवणीसोबत दुसऱ्याचीही आठवण येते. समुद्राला ओहोटी लागली, नदीचं पात्र कोरडं पडलं किंवा कधी पाऊसच पडला नाही तरी पाणी आणि तू…तुमच्या दोघांच्या आठवणीला मात्र कधी ओहोटी लागत नाही. कारण या आठवणींवर कोणाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा ताबा नसतो ना… आणि तुमच्या आठवणींच्या बाबतीत मी माझ्या मनावर कधीच ताबा ठेवला नाहीये. पाण्याच्या प्रवाहासारखी ती कुठूनही कशीही धावत राहिली तरी तिला मी मुक्तच ठेवलं आहे. बघ ना…आत्ताही दोन्ही आठवणी समांतर, एका लयीत येताहेत. “जिथे गवताची हिरवी पाती डोलतात आणि वाहते पाणी असते, त्या निसर्गात मला गाणी स्फुरतात.” असं बोरकर म्हणतात. तसं मी म्हणेन जिथं वाहतं पाणी असेल तिथं माझ्या मनात तुझ्या आठवणी डोकावतात. पाऊस कसा कोणत्याही वेळी आणि कितीही वेळ बरसतो, तुझ्या आठवणीचं तसंच आहे. त्या कोणत्या वेळी आणि किती वेळ बरसत राहतील सांगता येत नाही. पावसाच्या चक्रासारखंच आहे आठवणीचं चक्र. मनात खोलातून उगम पावतं, मनसोक्त वाहत जाताना अनेक आठवणींचा मिळून सागर तयार होतो, मग विरहात पोळून वाफ होऊन परत सरींच्या रुपात आठवणी रेंगाळायला लागतात. अर्थात त्यातही एक वेगळी मजा आहेच. आत्तातरी शांत आहे मी. पण जास्त वेळ तग धरु शकेन असं वाटत नाहीये. ये ना लवकर. हिरव्यागर्द झाडीतला एखादा निर्झर कसा गोड आणि थंडगार पाण्यानं खळखळत असतो, तुझी सोबतही तशीच. बघ… सूर्यास्ताच्या वेळचं लखलखणारं सोनसळी पाणी असो वा पौर्णिमेच्या रात्रीचं चमचमतं चंदेरी पाणी असो ओढ लावतंच ना मनाला…तू ही तसाच…ओढ लावणारा! ही ओढ नावाची गोष्ट अशी का असते हा प्रश्न उरतोच परत… आणि गमंत अशी की, प्रत्येक भेटीनंतर ही ओढ वाढतच जाते. मग ती पाण्याची असो वा तुझी…आत्ताही तेच झालं… समुद्रावरुन लहरत येणाऱ्या पश्चिम वाऱ्यानं हाक मारली की काय असं वाटून त्याच्या ओढीनं आलेय इथं किनाऱ्यावर. पण आता शंका येतेय ती हाक मनात येणाऱ्या तुझ्या आठवणीनं मारली होती की काय. ओढ तर मला तुम्हां दोघांबद्दलही वाटतेय. पण फरक काय आहे सांगू? पाण्याच्या ओढीनं मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकतेय. पण तुझ्या ओढीनं? ये ना लवकर….


जस्मिन जोगळेकर















    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक