ज्येष्ठ आषाढ... ग्रीष्म ऋतू
ज्येष्ठ आषाढ…ग्रीष्म ऋतू
वसंत ऋतूला आपण ऋतूंचा राजा म्हणतो. पण समोर प्रजा असेल तर राजाला महत्त्व ना. तसंच इतर ऋतू आहेत म्हणून वसंत ऋतूचं महत्त्व वाढलंय. शिशिरात पानगळ झाली नाही तर पुढं वसंताला सजायला आभूषणं सहज मिळणार नाहीत. ग्रीष्माच्या झळा बसल्या नाहीत तर वर्षा ऋतू दिलखुलास बरसणार नाही. पर्यायानं वसंताचा दिमाख उठून दिसणार नाही. एकमेका साह्य करू असं हे सृष्टीचं चक्र आहे. त्यामुळं वसंतानंतर येणारा ग्रीष्मही तेवढाच महत्त्वाचा आहे.
तर हा ग्रीष्म येतो तो ज्येष्ठ आषाढ महिन्यांचे हात धरुनच. वैशाख वणवा आणि ग्रीष्माच्या झळांनी या काळात धरती तापलेली असते. वैशाखातल्या मधुर फळांनी आणि बहावा, गुलमोहोरासारख्या बहरलेल्या फुलांनी ज्येष्ठाचं स्वागत तर जोरदार होतं. पण पोट आणि डोळे यांना जरी सुख मिळालं तरी अंगाची लाही लाही करतच ग्रीष्म येतो. वातावरणातला कण अन् कण तापलेला असतो. सूर्य उगवतानाच पेटून येतो. ग्रीष्मातली त्याची कोवळी किरणं देखील भाजून काढणारी असतात. मग कोवळी का म्हणावं त्यांना? त्यात दिवस मोठा…म्हणजे अशा तप्त सूर्याचा सहवास जास्त. अवघ्या चराचरावर याचा परिणाम झालेला दिसतो. चैत्र पालवी आता वयानं वाढलेली असते. पण अंगणातली नाजूक झाडं पाणी मिळालेलं असलं तरी हळूहळू मलूल व्हायला लागतात. चाफ्यासारखी जरा मोठी झाडं दुपार धरायला लागतात. तरी मला मोगरा, कुंद यांचं कौतुक वाटतं बरं का…तिकडे त्या सूर्याचं काहीही चालू असो, आपण आपलं ठरवलेलं काम करणारच. उष्णतेनं फुललेल्या श्वासाला ही चिमुरडी फुलं त्यांच्या मंद सुगंधानं शांतवण्याचा इतका गोड प्रयत्न करत असतात ना की बस... त्यातच ती वेडी बकुळ. किती किती दरवळावं एखाद्यानं! ‘आषाढघनांशी झुंजे वादळ वात' …अशी या दोघांची झुंज सुरू झाली की बकुळ फुलं घाबरुन जमिनीच्या मिठीत जाऊ पाहतात. एवढासा जीव… कसा तग धरणार न त्या वाऱ्यापुढं! आणि सुकून गेली तरी दरवळ मागं ठेऊन जाणार, मग ती वाकून गोळा करताना कंबर मोडली म्हणून आपण का आई उई करायचं असा विचार करून मी मनसोक्त फुलं गोळा करायचे. कोकणात आमच्या घरामागच्या गल्लीत टोकाला मोठा वृक्ष होता बकुळीचा. कितीही पदरी गजरा केला तरी मन काही भरायचं नाही. मग तो गजरा वेणीत माळायचा, नंतर गादीवर उशी शेजारी ठेऊन द्यायचा…पुढं कितीतरी वेळ वेणीला आणि गादीला बकुळीचा सुगंध येत रहायचा. काय कमाल आहे ना या निसर्गाची!
दिवसा जरी उष्णतेचा कहर असला तरी रात्री मात्र तशा बऱ्यापैकी शांत असतात. संध्याकाळचं गार वारं ही उष्णता सहन करायला जरा मदत करतं. आकाशही स्वच्छ असल्यामुळं ताऱ्यांची खचाखच गर्दी वर लक्ष वेधून घेते. शर्मिष्ठा मावळत असताना सप्तर्षी आपले उत्तर दिशेची वाट दाखवत उभे असतात. पुष्य नक्षत्राचा पुंजका मध्यमंडलावर विराजमान असतो आणि सप्त मातृका म्हणून वैदिक आर्यांनी नावाजलेली कृत्तिका मावळत असते. ताऱ्यांचं असं येणं जाणं बघत अंगणात पडून राहिलं की कधी ध्यान लागतं कळतही नाही. मधेच कधीतरी वाऱ्याच्या मंद झुळुकेबरोबर आलेली पारिजातकाची हाक या तंद्रीतून जागं करते. कसं असतं बघा ना…आपली आवडती गोष्ट करत असताना त्या तंद्रीत माणसाच्या आवाजानं व्यत्यय आला तर चिडचिड होऊ शकते, पण निसर्गातल्या कुठल्याच गोष्टीवर आपण कधी चिडू शकत नाही. मग कायम निसर्गासोबतच राहायला पाहिजे ना? रात्रीच्या अंधारात पारिजातकाच्या या सुंदर दुरंगी फुलांनी लक्ष वेधलं नाही तरच नवल! इतक्या नाजूक फुलांना बहुतेक दिवसाचा गोंगाट सहन होत नसावा. रात्रीच्या शांततेत ही कधी उमलून कधी ओघळून जातात कळतही नाही. जरा हातात घेऊन कौतुक करावं म्हटलं तरी लगेच बावरुन जातात. पण काय ते वेड लावणारं सौंदर्य आणि मंद सुगंध! काही काही मंडळी अक्षरशः अधिराज्य गाजवतात.
पण एकूणच ग्रीष्मातलं दिवसाचं वातावरण जरा थकलेलं, आळसावलेलं असतं असं वाटतं. इटुकले पक्षी तर कसं सहन करत असतील वाटतं. सकाळी सुरू असलेली त्यांची चिवचिव दिवस आणि गरमी जशी चढत जाईल तशी कमी कमी होत जाते. दुपारी तर झाडांच्या फांद्यांवर पानांशी उन्हाबद्दल गॉसिप करत बसत असतील असं वाटतं. या काळातच चिमण्या, मैना, कावळे, पारवे, दयाळ या आणि अशा नेहमीच्या कलाकारांबरोबरच मुनिया, सिल्व्हरबिल, ॲशी रेन वॅबलर यांचा वावर पण आसपास दिसायला लागतो. मुनिया तर बिचाऱ्या एवढासा जीव…पण घरटं बांधायला एक एक काडी गोळा करत फिरताना दिसल्या की, आपण बांधून द्यावं का यांचं घर असं वाटायला लागतं. घरट्याच्या नियोजित जागी पोहोचण्याआधीच इवल्या चोचीतून जर काडी खाली पडली तर त्या परत दुसऱ्या काडीची शोधाशोध सुरू करतात. पण मला कायम प्रश्न पडतो की खाली पडलेली तीच काडी त्या का उचलत नसतील? पुढचा जन्म मुनियाचा मिळाला तर कळेल याचं उत्तर. हे म्हणजे ना. धों. ताम्हनकरांच्या गोट्याने विचारलेल्या प्रश्नासारखे झाले. गणपतीचं डोकं उडवल्यावर त्याला परत जिवंत करताना तिथेच पडलेलं डोकं उचलून लावण्याऐवजी एवढ्या लांब जंगलात जाऊन हत्तीचं डोकं का आणलं असेल शंकरांनी? किती यातायात करावी ना जीवाची! आमच्या घराच्या खिडकीत सलग दोन तीन वर्ष मुनिया घरटं करायचा प्रयत्न करत होती. पण का कोण जाणे ते पूर्ण कधी झालं नाही. वसंत ऋतू आला की जशी कोकिळची आठवण येते, तसंच या ज्येष्ठ आषाढ महिन्यात कान वेधून घेतो तो पावशा. यावर्षीही त्याच्या ठरलेल्या वेळी त्यानं हजेरी लावली होतीच. पण आल्या आल्या सुरुवातीला त्याचे फक्त आलाप ऐकू येत होते. त्याची ओळख असलेले “पेरते व्हा” हे शब्द त्याच्या तोंडून लवकर ऐकू आले नाहीत. जरा मुरवणीचा पाऊस सुरू व्हायची चिन्हं दिसायला लागल्यावर मात्र त्यानं तो सूर लावला. असे काही ठराविक आवाज ऐकल्याशिवाय तो तो ऋतू आलाय असं वाटतच नाही.
वैशाख, ज्येष्ठ महिन्याच्या काळात पाण्याची पातळी उष्णतेमुळे खूपच खाली जाते. वनस्पतींबरोबरच पक्षी आणि प्राण्यांसाठीही हा काळ कठीण. जंगलात पाण्याच्या शोधात किती फिरावं लागतं प्राण्यांना! अभयारण्यांमधून काही ठराविक ठिकाणी पाण्याचा साठा असतो तिथं मग या प्राण्यांची ऊठबस सुरू होते आणि तेव्हाच मग त्यांना झुंडीनं आलेल्या मनुष्यप्राण्यांचं दर्शन होतं. प्राण्यांच्या दर्शनानं मनुष्य खुश होत असला तरी मनुष्याच्या दर्शनानं प्राणी नक्कीच खुश होत नसणार. पक्ष्यांचं तसंच…उडून बागडून थकले की येतात मग पाण्याच्या जागी. आमच्या अंगणात कमळासाठी केलेला एक पॉट आहे, तिथं पाणी प्यायला येतात पक्षी. लाल रंगाच्या ह्या पॉटच्या कडा नंतर नंतर पांढऱ्या होऊन जातात पक्ष्यांच्या शी मुळे. पण त्यांची नाजूक हालचाल बघायला आणि आवाज ऐकायला छान वाटतं. मग उन्हाच्या तीव्र झळांनी तापलेली जमीन शांत करायला येतो तो मुरवणीचा पाऊस. शेतीसाठी अगदी उपयोगी असा पाऊस. निसर्गाच्या चक्राकडून कितीतरी गोष्टी शिकत आपल्या पूर्वजांनी बांधलेले आडाखे अगदी बिनचूक आहेत. निसर्गाप्रती प्रेम आणि निसर्गाचं बारीक निरीक्षण यामुळंच हे साध्य होऊ शकतं. आता आपण यापासून दूर चाललो आहोत. पण पूर्वजांचे आडाखे कधी चुकले नव्हते हे खरं.
ज्येष्ठातल्या या पावसानंतर हळूहळू पश्चिमेकडून ढग वर वर यायला लागतात आणि खरा पावसाळा सुरु होतो. आषाढात कोसळायला लागतो तो. काळया मिट्ट ढगांनी आभाळ भरून गेलं की दिवसा संध्येचा भास व्हायला लागतो. झाडांवर, कौलांवर, पत्र्यांवर ताशे वाजवूनच मग तो शांत होतो. पण या काळातच वारंही इतकं जोरदार असतं की, कधी कधी भरुन आलेलं आभाळ खाली बरसायचं विसरुन वाऱ्याशी गप्पा मारत नादात पुढं निघूनही जातं. आपण आपलं आता हा जोरदार कोसळणार म्हणून खिडक्या वगैरे बंद करुन 'आता येऊ दे' म्हणत जय्यत तयारी करून बसणार आणि हे महाशय सरळ दुर्लक्ष करुन निघून जाणार… काय अर्थ आहे का याला! सुरुवातीला याचं कौतुक वाटतं बरं का…पण जर हा सारखाच कोसळायला लागला तर मात्र आता बास कर की म्हणायची वेळ येते. आषाढ घनातून कधी एकदा सप्तरंगी इंद्रधनू बाहेर येतंय अशा विचारात आपण श्रावणाची वाट बघायला लागतो. पण त्याआधी आषाढ वारी, विठू नामाचा गजर यामुळंच तर पुढच्या सृजनाच्या, सणांच्या राजाच्या स्वागताची आपली भक्तिमय सुरुवात होते ना!
जस्मिन जोगळेकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा