भाग एक
भाग एक
त्यादिवशी संध्याकाळी इरा बागेतून घरी आली तीच अगदी गप्प गप्प. रोज भयंकर दंगा करत येणारी, गेटमधूनच आई, आई चा जप करत येणारी इरा, घरी परत आलेली आज आईला कळलंच नाही. इराच्या आजोबांना जेव्हा आत शिरताना पाहिलं तेव्हा आईला कळलं की आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय. इराचा स्वभाव आईला माहीत होता. अशावेळी काही विचारायला गेलं तर ती उत्तर द्यायची नाही. म्हणून तिला काही न विचारता आईने आजोबांकडे मोर्चा वळवला.
'आज बागेत काही झालं का?' सूनबाईंचा तो प्रश्न ऐकून आजोबा म्हणाले, 'तसं तर काहीच झालं नाही. गेल्या गेल्या घसरगुंडीवर तर मस्त मजेत खेळत होती इरा. मित्र-मैत्रिणींशी नेहमीसारखा दंगा करून झाला. पण नंतर बाकी मंडळी घरी गेली आणि ही झोका घ्यायला गेल्यावर थोड्या वेळाने जरा अस्वस्थ दिसत होती खरं. मी विचारलंही तिला, पण आपल्याच तंद्रीत होती. काहीच बोलली नाही.' सांगेल जरा वेळाने म्हणून आई तिच्या कामाला लागली.
रात्री सगळं आवरून आई जेव्हा झोपायला खोलीत आली तेव्हाही इरा आढ्याकडे बघत गप्प पडली होती. आज जेवतानाही एकदम शांतता होती. इराला तसं पाहून आईच्या मनात थोडीशी कालवाकालव झाली. पण इराकडूनच काही कळण्याची ती वाट बघत होती आणि झालंही तसंच. आई जेव्हा तिच्याजवळ येऊन पडली तेव्हा एकदमच इराच्या डोळ्यात पाणी आलं. मग आईने बोलणं सुरू केलं. इराच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवत तिने काय घडलं याची चौकशी केली. आता इरा सांगू लागली….
'आई आज मी बागेत जेव्हा झोपाळ्यावर बसले होते, तेव्हा मला आजूबाजूला कोणीतरी बोलतंय असं वाटलं. म्हणून मी सगळीकडे पाहिलं, पण तिथे तर कोणीच नव्हतं. मग नीट लक्ष देऊन ऐकल्यावर कळलं ज्या झाडाला तो झोपाळा बांधला होता ते झाड झोपाळ्याशी गप्पा मारत होतं चक्क. खरंतर दुसऱ्यांचा गप्पा ऐकू नयेत असं सांगतेस तू मला. पण ती दोघं काय बोलत असतील याविषयी मला उत्सुकता होती म्हणून मी ऐकायला लागले आणि धक्काच बसला मला. अगं ते झाड ना खूप दुःखी झालं होतं. त्या झोपाळ्याला सांगत होतं की, 'या मुलीचा स्पर्श, तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद नीट अनुभवून घे आणि नंतर आठवणीत ठेव. मगाशी मी बागेच्या माळ्याला कोणाशी तरी बोलताना ऐकलं. उद्या जेसीबी येऊन ही सगळी बाग मोकळी करून टाकणार आहेत म्हणे. या जागी मोठी टोलेजंग इमारत उभी करणार आहेत.' त्यावर त्या झोपाळ्यालासुद्धा धक्का बसला. तो झाडाला म्हणाला, 'अरे काय सांगतोस काय….ही सगळी झाडं तोडून टाकणार? इतकं डेरेदार व्हायला तुम्ही किती कष्ट घेतले असतील, ते काही वेळात उजाड करून टाकणार?' 'अरे मला आमच्या कष्टाचं एवढं काही वाटत नाही रे. पण आम्हाला तोडल्यावर इतरांचं काय होईल ही काळजी लागली आहे. तो दयाळ पक्षी किंवा त्या चिमण्या, बुलबुल आमच्या आधाराने घरटी बांधतात रे. त्यात त्यांचा संसार फुलतो, नवीन पिल्लं इथे जन्माला येतात. त्या सगळ्या इवल्या जीवांचं आता कसं होणार? रोज संध्याकाळी या आजोबांचं मित्र मंडळ इथं येऊन आमच्या सावलीत चार क्षण निवांत काढतात, त्यांचं आता कसं होणार? या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरच्या या आनंदाचं आता कसं होणार? आणि मुख्य म्हणजे सिमेंटच्या या जंगलात हाच भाग तर भरगच्च हिरवाईने नटलेला होता. त्यामुळे परिसरही एकदम ताजातवाना होता ना…त्याचं रूप आता कसं होणार? खूप खूप प्रश्न पडलेत रे आणि खूप काळजीही वाटतेय या लोकांची.'
'अरे या स्वार्थी लोकांची तू का काळजी करतो आहेस? तुम्हाला तोडून टाकायचं पाप ते करताहेत ना, भोगतील त्याची फळं ते.' झोपाळा चिडून असं बोलला खरं, पण आई तुला एक सांगू त्या झाडाला आपली खरंच मनापासून काळजी वाटत होती गं…इरा आईला सांगत होती आणि आईला आता तिच्या गप्प होण्याचं कारण कळत होतं.
'असं कसं म्हणतोयस अरे.' झाड काय बोलतंय ते इरा लक्षपूर्वक ऐकत होती. 'या लोकांना आत्ता कळत नाहीये रे झाडांचं महत्त्व. जास्तीतजास्त पैसा मिळवण्यासाठी हे असं वागत आहेत. तोच पैसा पुढं जाऊन हॉस्पिटलमधल्या कृत्रिम ऑक्सिजनसाठी खर्च करावा लागेल हे कसं यांच्या लक्षात येत नाही. झाडं तोडली तर नंतर यांच्यापुढे किती प्रश्न उभे राहतील ही दूरदृष्टी का नाहीये यांच्याकडे? पर्यावरणाच्या साखळीतले इतर घटक काय देवाने उगाच निर्माण केले आहेत का? खरंतर माणसांपेक्षा तेच जास्त महत्त्वाचे आहेत. पण लक्षात कोण घेणार. हे काय आयुष्य आहे का?'
झाड अजून खूप काही बोलत होतं आणि इरा ते नीट ऐकत होती. तिचं वय लहान असला तरी झाडाचा प्रत्येक शब्द तिला पूर्णपणे पटत होता आणि तेच आता आईलाही तिच्या बोलण्यातून जाणवलं होतं. माणूस असं का वागतो? हा प्रश्न इराने ज्या उद्विग्नतेने विचारला होता त्यावरून इरा कसा आणि कोणत्या रीतीने विचार करू शकते हे आईला कळलं होतं. पर्यावरण या महत्त्वाच्या विषयाची तिची अजून ओळख करून द्यायचं आईने मनोमन ठरवलं आणि इराच्या विचारांच्या गाडीला ब्रेक न लावता ती तिला हळुवार थोपटत राहिली.
(क्रमशः)जस्मिन जोगळेकर
निसर्गाशी तादात्म्य पावलेले सहृदय मन
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 🙂.
उत्तर द्याहटवा